जळगाव.दि.30:- महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2020 साठी ज्या विद्यार्थ्याना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरून
परिक्षेसाठी प्रविष्ट व्हावयाचे असेल त्या विद्यार्थ्यांनी दि.24 ऑगस्ट 2019 पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत. ऑनलाईन भरलेले अर्जाची प्रिंट काढून दिनांक
26 ऑगस्ट पर्यंत संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडे जमा करवेत. प्रत्येक
विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळांचा वापर करावा.
विद्यार्थ्याने अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, मुळ प्रत नसल्यास द्वितीय
प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ
ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
स्कॅनर / मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत विद्यार्थ्यांचा
मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जांची
प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमुद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज विहित शुल्क व मुळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद
केलेल्या शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत. फार्म क्रमांक 17 भरून खाजगीरित्या परिक्षेस
प्रविष्ठ होणाऱ्या इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क
आणि शंभर रुपये प्रक्रीया शुल्क असे एकूणे 1 हजार 100 रुपये तर इयत्ता 12 वीच्या
विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 500 रुपये व प्रक्रीया शुल्कसाठी 100 रुपये असे
एकूण 600 एवढा शुल्क लागेल.
तरी
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद
घ्यावी, असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
******