Tuesday, 27 March 2018

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न



        

        जळगाव, दि. 27 - बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलातील सदस्यांकरीता नियोजन भवन सभागृह, जळगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रमेश काटकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री बी.जे. पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव, श्रीमती सरस्वती बागुल, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री. खुशाल गायकवाड, उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद (माध्यमिक) श्री. विकास पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रमेश काटकर यांनी केले.
            या प्रशिक्षण कार्यशाळेत श्रीमती शुभागी चौधरी यांनी PC & PNDT कायद्याबद्दल मार्गदर्शन करतांना सांगितले की, सोनोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गर्भलिंग निदानकरुन मुलींना जन्मास न येवू देण्याचे प्रमाण समाजात वाढत आहे. असे करणा-या डॉक्टर तसेच गर्भलिंग निदान करणारे जोडपे (नातेवाईक) यांनाही जबाबदार धरण्यात येते. गर्भलिंग निवड करणेस आळा घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान अधिनियम (लिंग निवडीस प्रतिबंध) 2003 या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यातंर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 349 सोनोग्राफी केद्रांची अधिकृत नोंदणी करण्यात आलेली आहे. 349 सोनोग्राफी केंद्रापैकी महानगर पालिकाक्षेत्र वगळून उर्वरीत जिल्ह्यात एकूण 300 नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी 127 केंद्र कार्यरत असून अधिनियमाची अंमलबजावणी न करणा-या केंद्राधारकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष तपासणी करण्यात येत आहे. अद्याप पर्यत 3 प्रकरणांमध्ये निकाल लागून संबंधितांना शिक्षा झालेली आहे. जिल्ह्यात कायद्याचे उल्लंघन करणारे एकूण 36 केंद्र आढळून आली होती. त्याविरुध्द न्यायालीन प्रक्रिया चालू असल्याचीही माहिती श्रीमती शुभांगी चौधरी यांनी दिली.
            बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास शासनाने www.amachimulgi.com हे संकेतस्थळ सुरु केले असून 18002334475  या क्रमांकावर सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास सदर क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येते. तसेच तक्रार योग्य असल्यास संबंधितांविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येवून तक्रारदारास बक्षीसही देण्यात येत असल्याची माहिती दिली.
     मुलींच्या शिक्षणाबाबत उपशिक्षण अधिकारी श्री विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करतांना त्यांनी मुली जगल्या पाहिजे व जगलेल्या मुलींना सुरक्षित वातावरण व शिक्षण मिळाले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. माध्यमिक शाळेत शिकणा-या मुलींचे शाळा सोडल्याचे प्रमाण जास्त असल्याने शाळेतील शिक्षक दरवर्षी शालेय सुट्टीच्या कालावधीत गावांमध्ये तसेच शहरांमध्ये मुलींच्या पालकांना भेटून तसेच मुलींचे समुपदेश करुन त्यांना परत शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शालेय स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करुन स्पर्धामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांचे सत्कार करण्यात येतात. त्यामुळे भावी पिढीला मुलींच्या बाबतीत जागृतता निर्माण होण्यास मदत होते. असे प्रतिपादन उपशिक्षण अधिकारी श्री. पाटील यांनी केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परीविक्षा अधिकारी श्री. एस. आर. पाटील यांनी केले. परीविक्षा अधिकारी श्रीमती सारीका मेतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
०००

No comments:

Post a Comment