Thursday, 25 July 2019

महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल ‘प्रज्ज्वला’ योजना : विजया रहाटकर


        





             चाळीसगाव, दि. 25 :  केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यदायी विकासासाठी ‘प्रज्ज्वला’ योजना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे केले.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत येथील राजपूत मंगल कार्यालयात बचत गटांचे प्रशिक्षण व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार उन्मेश पाटील, राज्य महिला आयोगाच्या  माजी सदस्या देवयानी ठाकरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटराव भोळे, पंचायत समिती सभापती स्मितलताई  बोरसे, उपसभापती संजय पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे, नगरसेवक संजय पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील आदी उपस्थित होते.
            श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला आयोगाचे काम शासन आणि महिला यांच्यातील दुवा आहे. आयोगाच्या कामाला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आयोगाच्या माध्यमातून विविध महिला केंद्रित योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. महिलांनी राज्य महिला आयोगाकडे आपल्या समस्या, अडचणी मांडाव्यात. महिला आयोग महिलांची सुरक्षा, आत्मसन्मान व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबध्द आहे. महिला आयोगाच्या पाठपुराव्याने आणि शासनाच्या महिलांच्याप्रति असलेल्या सकारात्मक धोरणांमुळे महिलांना आता अडचणीच्या वेळेस, शिक्षण, आरोग्याच्या उपचारांसाठी जनधन योजनेच्या खात्यातून बँकेकडून 5 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हर ड्रॉप घेता येवू शकेल.
            महिला औद्योगिक धोरणामुळे महिलांना आपला स्वत:चा उद्योग सुरू करता येईल. त्यांना वीज, पाणी, दळण- वळण, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. महिला केंद्रीत लाभाच्या योजनांचा जास्तीत-जास्त महिला बचत गटांनी लाभ घ्यावा.
            खासदार श्री. पाटील यांनी अंत्योदय योजना, प्रज्ज्वला योजनेसह महिला केंद्रीत योजनांची माहिती दिली. महिला आयोगाकडून बचत गटांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी बचतगटाच्या सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी मातृवंदन योजनेचे फायदे आणि त्यात समाविष्ट होवू शकणारे घटकांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अर्चना वाणी, कपालिनी सिनकर, स्मितलताई  बोरसे, श्रीमती ठाकरे  यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल सापनर हिने स्वागत गीत सादर केले. प्रभारी उपसभापती संजय पाटील यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी विविध बचत गटांच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
                                                                       000

No comments:

Post a Comment