जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 3 – राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या शीर्षकातंर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
ही सुविधा कार्यान्वित केल्याचे सन 2020-21 हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दि. 11 जानेवारी, 2021 ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार 11 जानेवारी, 2021 अखेर प्राप्त सर्व अर्जासाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकरी बंधूना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश देण्यात आले आहे. निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकऱ्यांना / लाभार्थिना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 7/12, 8 अ, कोटेशन परीक्षण प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्र अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
आर्थिक वर्ष संपण्यास एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सदरची कार्यवाही तात्काळ राबविण्यात यावी. काही अडचणी आल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. वरील कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाहीबाबत लाभार्थिना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
००००
No comments:
Post a Comment