जळगाव, दि. 29 जुलै - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, 1989 व त्यामधील सुधारणा, 2016 अंतर्गत जनजागृती व प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष
प्रसाद यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर
रेड्डी, नयना बोदर्डे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती), अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,
जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा, सहायक आयुक्त नंदा रायते, शासकीय निवासी शाळांचे
विशेष अधिकारी राजेंद्र कांबळे, यशदा पुणेचे प्रशिक्षक सुभाष केकाण व बार्टीचे प्रकल्प
अधिकारी सचिन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त नंदा रायते
यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज आणि त्याचा समाजातील सकारात्मक प्रभाव विषद केला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सामाजिक सुधारणेसाठी या कायद्याचे
महत्त्व विशद केले. तर डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये
पोलिस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या, अडचणी व त्यावर उपाय यावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये पोलीस, महसूल, ग्रामविकास विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कायद्यातील महत्त्वाची कलमे, तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया, अंमलबजावणीत येणारे अडथळे आणि पीडितांना मिळणाऱ्या मदतीबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा आणि यशदा पुण्याचे प्रशिक्षक सुभाष केकाण यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार्टीचे तालुका
समन्वयक अनिल पगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र कांबळे यांनी केले. ही कार्यशाळा
अधिकाऱ्यांमध्ये कायद्यासंबंधी जाणिवा निर्माण करणारी, सामाजिक समतेचा आग्रह धरणारी
आणि प्रभावी अंमलबजावणीस चालना देणारी ठरली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक
आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह बार्टीचे समन्वयक यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यशाळेला विविध शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००००००
No comments:
Post a Comment