Monday, 11 August 2025

फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण

             जळगाव दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन,खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जे. के. चव्हाण, संजय गरुड, प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे,  कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

            गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली असताना पुतळ्याचे अनावरण होताच पावसाने दमदार हजेरी लावली, ज्यामुळे उपस्थितांनी महाराजांचे आगमन लाभदायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार असून पिकांना जीवदान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

            कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ युद्धाचा नसून तो लोककल्याण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मनिरपेक्षतेचा आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केवळ तलवारीच्या बळावर केली नाही, तर प्रजेला न्याय, सुरक्षा आणि स्वाभिमान दिला. आजच्या तरुण पिढीनेही त्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले पाहिजे. या शिवसृष्टीतून भावी पिढीला इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन होईल. शालेय विद्यार्थी, तरुण, नागरिकांनी येथे येऊन महाराजांचा संघर्ष, शौर्य आणि दूरदृष्टी यांचा अभ्यास करावा.

            ते पुढे म्हणाले, गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात उभारलेली शिवस्मारके ही एक ऐतिहासिक चळवळ आहे. ती गावागावात प्रेरणेचे केंद्र बनतील. पुतळा हा केवळ धातूचा नसतो, तर तो आपल्या विचारांचा, संस्कारांचा आणि वारशाचा जिवंत पुरावा असतो. पावसाने आजच्या सोहळ्यावेळी हजेरी लावली ही केवळ योगायोग नसून आपल्या भूमीवरील शिवमहाराजांविषयीचा आशीर्वाद असल्यासारखे वाटते.

            यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. निर्व्यसनी राहून आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. एकजुटीने समाजाच्या सेवेत राहावे. तसेच, जामनेर तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून गावागावात प्रेरणा पोहोचवण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

            शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जामनेर आगमनावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर तोंडापूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, नागरिक, शिवप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००००००००००

No comments:

Post a Comment