Saturday, 17 February 2018

परिवहन विभागातर्फे ऑटोरिक्षा चालकांसाठी रावेर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



     जळगाव, दि. 15 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव तर्फे संजीवन हॉस्पीटल, रावेर येथे ऑटोरिक्षा चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरासाठी डॉ. दत्तप्रसाद दलाल,जनरल फिजीशियन व हदयरोग तज्ञ, मंगलम हॉस्पिटल, डॉ. शांताराम पाटील, नेत्ररोग तज्ञ, गणपती हॉस्पिटल, डॉ. चंद्रदीप पाटील, जनरल सर्जन, संजीवन हॉस्पिटल, रावेर, डॉ. सौ. मीनल दलाल, कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट, रेवा पॅथॉलॉजी लॅब, रावेर, डॉ. सौ. पूर्वा पाटील, नाक, कान, घसा तज्ञ, संजीवन हॉस्पिटल, रावेर, आणि डॉ. सुरेश घन:श्याम पाटील, खानापूर यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सर्व तपासण्या विनामूल्य करुन दिल्या. तसेच डॉ. चंद्रदीप पाटील यांनी ऑटोरिक्षा चालकांच्या तपासणीसाठी संजीवन हॉस्पिटल मोफत उपलब्ध करुन दिले. या शिबीराचा रावेर परिसरातील 50 पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी लाभ घेतला.
            या शिबीराचे उदघाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक कमलेश चव्हाण म्हणाले की, रिक्षा चालक हा रस्ते आणि प्रवासी दोघांच्या दृष्टीने महत्वाचा दुवा आहे. रिक्षाचालक दररोज अनेक प्रवाशांची ने-आण करीत असतो. तसेच विविध प्रसंगी विविध ठिकाणी समाजामध्ये वावरत असतो. त्याच्यावर स्वत:सोबत प्रवाश्यांच्याही जीवीताची जबाबदारी असते. यादृष्टिने रिक्षाचालकांची तंदुरुस्ती महत्वाची आहे. प्रवाशांसोबत रिक्षाचालकांच्याही घरी त्यांची वाट पाहणारे असतात. असे सांगून रिक्षाचालकांच्या आरोग्य तपासणीमागील उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी डॉ. दलाल म्हणाले की, अपघात प्रसंगी रिक्षाचालकांनी अपघातग्रस्तांना तातडीने हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्यास मदत केली पाहिजे. तर डॉ. सुरेश घन:श्याम पाटील, खानापूरकर यांनी रिक्षाचालकांना सर्वसाधारण आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या चांगल्या सवयींची व आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्यायामाची माहिती दिली.
            या शिबीरात रिक्षाचालकांची सर्वकष आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीदोष असणा-या रिक्षाचालकांचे प्रमाण आढळून आले. तसेच उच्च रक्तदाब, हद्यरोग, मोतीबिंदू आदि आजारांनी बाधीत रुग्ण आढळून आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
०००

No comments:

Post a Comment