Tuesday, 31 January 2023

परिवहनेतर वाहनांचा समुच्चयन उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध

        जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : शासन अधिसूचना (गृह विभाग) यांच्या दिनांक 19 जानेवारी, 2023 च्या अधिसूचनेनुसार परिवहनेतर संवर्गातील (जसे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी) या वाहनांच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गंभीर स्वरुपाच्या व्यावहारिक समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांच्या रस्ता सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच परिवहनेतर वाहनांचा वाहन समुच्चयन करण्यासाठी उपयोग होण्याची व त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील वैध परवाना प्राप्त करुन वाहतूक करणा-या वाहनांच्या आर्थिक व्यवहार्यवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          राज्यातील नागरिक व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता परिवहनेतर वाहनांचा समुच्चयनाच्या उद्देशासाठी वापर करण्यास मनाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे परिवहनेतर वाहनांना (दुचाकी, तीनचाकी व चारचाकी) या वाहनांसह समुच्चयनाच्या व राईड पुलींगच्या उद्देशासाठी वापर करण्यास अधिसूचनेद्वारे शासनाकडून प्रतिबंध करण्यात आले आहे. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

          तरी अशाप्रकारे परिवहनेतर वाहनांद्वारे अॅपच्या आधारे राईड पुलींग (भाडेतत्वावर प्रवासी वाहतूक) प्रकारचा व्यवसाय करतांना आढळून आल्यास संबंधितांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

                                          00000

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

        जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

          सन 2022-23 शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने बाकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी रजिस्ट्रेशन 69% दिसून येत आहे. त्यामागील वर्षाचे तुलनेत 31% विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत. तरी अनुसूचित जातीच्या भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर करावे, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                       00000

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा जिल्हाधिकारी अमन मित्तल : जिल्हा नियोजन समितीची बैठक




                               जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन मित्तल यांनी आज येथे दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले, शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीत विकास कामे पूर्ण होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास कामे करतांना पायाभूत सोयीसुविधांच्या बळकटीकरणाबरोबरच वीज, आरोग्य, शिक्षण, दळण- वळणाच्या सुविधांना प्राधान्य द्यावे असे सांगितले. त्याचबरोबर ज्या विभागांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेले नाही. त्यांनी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करावे, प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या कामांची वर्क ऑर्डर देऊन कामे सुरु करावीत. मागील वर्षातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच नवीन कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील याचेही नियोजन करावे, उपलब्ध निधीचे व्यवस्थित नियोजन करुन  कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाहीत याचीही सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण, आदिवासी घटक कार्यक्रम, विशेष घटक योजना आदिंचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले, ज्या विभागांना प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन कामे सुरु झालेली त्यांनी निधीची मागणी करावी, ज्या विभागांचा निधी विहित कालावधीत खर्च होणार नाही त्यांनी निधी परत करावा, जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासकीय यंत्रणांनी तातडीने सादर करावे. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रस्ताव पाठविताना I-PASS या संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत सांगितले. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                     00000       

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा

जिल्हाधिकारी अमन मित्तल : जिल्हा नियोजन समितीची बैठक

          जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन मित्तल यांनी आज येथे दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले, शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीत विकास कामे पूर्ण होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास कामे करतांना पायाभूत सोयीसुविधांच्या बळकटीकरणाबरोबरच वीज, आरोग्य, शिक्षण, दळण- वळणाच्या सुविधांना प्राधान्य द्यावे असे सांगितले. त्याचबरोबर ज्या विभागांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेले नाही. त्यांनी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करावे, प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या कामांची वर्क ऑर्डर देऊन कामे सुरु करावीत. मागील वर्षातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच नवीन कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील याचेही नियोजन करावे, उपलब्ध निधीचे व्यवस्थित नियोजन करुन  कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाहीत याचीही सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण, आदिवासी घटक कार्यक्रम, विशेष घटक योजना आदिंचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले, ज्या विभागांना प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन कामे सुरु झालेली त्यांनी निधीची मागणी करावी, ज्या विभागांचा निधी विहित कालावधीत खर्च होणार नाही त्यांनी निधी परत करावा, जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासकीय यंत्रणांनी तातडीने सादर करावे. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रस्ताव पाठविताना I-PASS या संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत सांगितले. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                     00000      

Friday, 27 January 2023

जळगावात राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न मुलांच्या गटात अमरावती विभाग तर मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाची बाजी

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने व जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. 24 ते 25 जानेवारी, 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय सन 2022-23 शालेय कबड्डी क्रीडा (14 वर्ष मुले/मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            या स्पर्धेतंर्गत 25 जानेवारी, 2023 रोजी स्पर्धांतील अंतीम सामना व तृतीय क्रमांकाचे सामने पार पडले. मुलांच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यामध्ये लातुर विभागातील भगतसिंग विद्यालय, भिसे वाघोली, ता. जि. लातूर यांनी नाशिक विभागातील माध्यमिक विद्यामंदिर ब्राम्हणवाडे, नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात 57-38 अशा 19 गुणांच्या फरकाने लातूर विभागाने सामना जिंकून तृतीय क्रमांकाचे स्थान मिळविले. तर अंतिम सामन्यामध्ये अमरावती विभागातील श्री. मैनागिरी महाराज विद्यालय, टो जुमडा फाटा, ता. जि. वाशिम यांनी औरंगाबाद विभागातील विद्यानिकेतन हायस्कूल, गंगाखेड, ता. गंगाखेड, जि.परभणी यांच्यात झालेल्या सामन्यात 44-19 अशा 25 गुणांच्या फरकाने अमरावती विभागाने सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले.

            मुलींच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यामध्ये मुंबई विभागातील अवर लेडी ऑफ नाझरेथ हायस्कुल, भाईदर यांनी अमरावती विभागातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा फसी, ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती यांच्यात झालेल्या सामन्यात 60-37 अशा 23 गुणांच्या फरकाने मुंबई विभागाने सामना जिंकून तृतीय क्रमांकाचे स्थान मिळवले. तर अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर विभागातील शिवाजी हायस्कुल, बावची, ता. वाळवा, जि. सांगली यांनी पुणे विभागातील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पूणे यांच्यात झालेल्या सामन्यात 54-20 अशा 34 गुणांच्या फरकाने कोल्हापूर विभागाने सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले.

            राज्यस्तरील शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल याप्रमाणे- (प्राविण्य- संघाचे नाव, मुले/मुली) प्रथम-अमरावती, कोल्हापूर, द्वितीय-औरंबागाद, पुणे, तृतीय-लातुर, मुंबई. याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा कबड्डी असोसिएशन, जळगांव यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जळगाव येथे 30 जानेवारी रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव द्वारा दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 16.00 वाजता त्यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            या अदालतीत टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव 425001 यांच्या नावे अतिरिक्त प्रती सह दिनांक 30 जानेवारी, 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असेही अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

औरंगाबाद येथे 31 जानेवारी रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद येथे 31 जानेवारी, 2023 रोजी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

          या अदालतीत टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री क. शेषराव, सहायक निदेशक डाकसेवा (ज शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद - 431002 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 30 जानेवारी 2023 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाइट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे. असेही पोस्टमास्टर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त दहा कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरणार

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर त्यांच्या मताधिकार वापरण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र, जे मतदार त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सादर करू शकणार नाहीत त्यांनी त्यांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी खालील दहापैकी कोणताही एक पुरावा सादर करता येईल. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

            आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापिठाद्वारा वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले यूनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) आदि सादर करुन मतदान करता येईल. असे श्री. मित्तल यांनी कळविले आहे.

00000

Thursday, 26 January 2023

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान करतांना मतदारांनी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंट पेन किंवा अन्य साहित्याचा वापर करु नये, असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

            या निवडणूकीसाठी मतदान हे पसंतीक्रमानुसार (Order of Prereference) असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात 1 हा अंक लिहून मतदान करावे, 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा, यापुढील पसंतीक्रम जसे 2,3,4… नोंदविणे ऐच्छिक आहे. जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील, मतपत्रिकेवर नमुद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकांमध्ये व एकाच भाषेत (देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमुद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमुद करावयाचा आहे. (उदा. १,२,३,४,५ किंवा 1,2,3,4,5 किंवा I,II,III,IV,V) असा पसंतीक्रम नोंदवावा. शब्दात (एक, दोन, तीन…. इ.) असे लिहू नये, आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे X किंवा ‘’ अशी खुण करु नये, मतपत्रिकेवर नाव/कोणताही शब्द, सही/ अंगठा करु नये. असेही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ, नाशिक अमन मित्तल यांनी कळविले आहे.

00000

भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क रहावे

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. 27/01/2023 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

            याबाबत प्रशासन सतर्क असून नागरीकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

            भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक 0257- 2223180 व 0257- 2217193 या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा.

 भूकंपा दरम्यान काय कराल ?

जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?

            घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा. 

जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?

            पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका.उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

भूकंपादरम्यान काय करावे ?

 

            जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे ?

            रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.

            नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.

00000

Monday, 23 January 2023

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी नियुक्त भरारी पथक, व्हिडीओ देखरेख पथक प्रमुख विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित

           जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ अमन मित्तल यांनी या निवडणूकीसाठी व्हिडीओ देखरेख पथक (Video Surveillance Team) भरारी पथक (Flying Squad) तसेच क्षेत्रीय अधिकारी (Zonal officer) यांची नियुक्ती केली आहे.

          त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी  नियुक्त  केलेले भरारी पथक  (FIying Squad) व व्हिडीओ देखरेख पथक  (Video Surveillance Team) यांच्या प्रमुखांना शासन अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून निवडणूक कालावधीपर्यंत तसेच क्षेत्रीय अधिकारी (Zonal officer) (विशेष कार्यकारी दंडाधिकारी  यांचे अधिकार बहाल नाहीत असे अधिकारी) यांना दिनांक  28 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपासून ते दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम  129, 133. 143 व 144 अन्वये शक्ती प्रदान केल्या आहेत. असेही जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000


 

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



 



          जळगाव, दि. 23 :- नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासोहब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते,  उपजिल्हाधिकारी (महसुल) शुभांगी भारदे, रवींद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे,  तहसिलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, नायब तहसिलदार अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


Tuesday, 17 January 2023

नागरीकांच्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करावी-विभागीय आयुक्त गमे

             जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : प्रशासकीय यंत्रणांनी नागरीकांची कामे अधिक जलदगतीने करावी. अपवादात्मक परिस्थितीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली महसुल विभागाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख एम. पी मगर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे, प्रसाद मते, किरण सावंत पाटील, राजेंद्र वाघ, जिल्हा सुचना अधिकारी मंदार पत्की यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे तहसीलदार उपस्थित होते.

            यावेळी बोलताना श्री. गमे म्हणाले की, अनोंदणीकृत व तक्रार नसलेल्या ई-फेर फार नोंदीचा कालावधी 30 दिवसांवरुन 25 दिवसांपर्यत आणण्यासाठी महसुल यंत्रणेने स्वयंस्फुर्तीने प्रयत्न केले पाहिजेत.  त्याचबरोबर शर्तभंग झालेल्या प्रकरणांसाठी शोध  मोहीम राबवावी. तसेच अर्धन्यायीक प्रकरणातील आदेशांची गुणवत्ता तपासणी करण्याची मोहिम राबवावी. त्याचबरोबर ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी ई-पीक पाहणी, गौण खनिज, ई-मोजणी, महाराजस्व अभियान, लोकसेवा हमी कायदा, महसुल अधिकारी, कर्मचारी यांचया सेवाविषयक बाबी, शिस्तभंग कार्यवाही, रिक्त पदे, शासकीय जमीन महुसल व गौण खनिज महसुलाचाही आढावा घेतला. बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाशी संबधित माहिती दिली.

00000

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सूक्ष्म नियोजन करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

 




      जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे  विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

            महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. गमे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे, प्रसाद मते, किरण सावंत पाटील, राजेंद्र वाघ आदि  उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, या निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. मतपेटया तपासून घ्याव्यात. मतदान साहित्य ताब्यात देतना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घ्येण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

             जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी विधान परिषद निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता पालनाच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. पोलीस अधिक्षक यांनी निवडणूकीसाठी पोलीस बंदोस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले, तर उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी सांगितले, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्गही पार पडला आहे. मतदान साहित्य वाटप व मतपेट्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

00000

Monday, 16 January 2023

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ; सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात

         नाशिक, दि.16 जानेवारी,2023 (विमाका वृत्तसेवा) - नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी  अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे  अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले,श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास  डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9834874768 असा आहे.

                                           0000000000

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

                   जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.

          शासनाने नुकत्याच 14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू. क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू. दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे, व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

          शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 30 जानेवारी, 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे, पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यानी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. 

                                                            ०००००

Thursday, 12 January 2023

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

                   जळगाव, दि. 12 – जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

             जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन , निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी ( महसूल) श्रीमती शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000     




मकर संक्राती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा होणार

        जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, 2023 म्हणून घोषित केले आहे. या वर्षाच्या निमित्ताने मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन" म्हणून कृषि विभागामार्फत राज्यात साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.    

          आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांपर्यत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती येणार आहे.      

          या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यक त्यांचेकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहारतज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

         जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे, यांचे अधिनस्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत नागरीकांना पुरविण्यात येत असलेल्या विविध लोकसेवा बाबत नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलिय आणि व्दितीय अपिलिय प्राधिकारी या बाबी  अधिसूचित केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी      डॉ. वनिता सोनगत यांनी दिली आहे.

            केंद्र शासनाच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच्या वसतीगृहाच्या योजनेतंर्गत अशासकीय संस्थांच्या शिफारशी करणेसाठी 75 दिवसांची  कालमर्यादा विहित केली आहे. त्यासाठी  पदनिर्देशित अधिकारी म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जळगाव, प्रथम अपिल अधिकाऱी म्हणून उपआयुक्त महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक, व्दितीय अपिल अधिकाऱी म्हणून  सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांना तर  समुपदेशन केंद्र चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना निधी उपलब्ध करुन देणे तर यासाठी 180 दिवसांची कालमर्यादा विहित केली आहे.  अधिकारी म्हणून  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव, प्रथम अपिल अधिकाऱ्यारी म्हणून. उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक, व्दितीय अपिल अधिकाऱी म्हणून सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे,  यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. असे डॉ. वनिता दि. सोनगत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव. यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                       ०००००

करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

         जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत शुक्रवार  13 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटर द्वारा जॉब रिलेटेड करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

        या मार्गदर्शन सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे मॉडेल करिअर सेंटर द्वारा, कु. सीमा शर्मा, यंग प्रोफेशनल या  मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन  meet.google.com/jnx-hjrr-mfb  या गुगल मिटवर करण्यात आले आहे.

        तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                ०००००

जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी नांवनोंदणी करावी

         जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 – रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवाराकरिता नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता वाढ, अनुभवाच्या प्रमाणपत्राची नोंदणी, नुतनीकरण इत्यादी सेवा विभागाच्या वेबसाईटवर विनामुल्य उपलब्ध आहे.

         जळगाव जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रतेची नोंद विभागाच्या वेबसाईट www.mahaswayam.gov.in  या वेबसाईट वर जावून आपल्या नावाची नोंद करण्यात यावी, या विभागाच्या इतर सेवाचा ( रोजगार मेळावे, ईपीपी प्रशिक्षणार्थी, कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी) यांनी देखील लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वि.जा. मुकणे यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15  या वेळेत कार्यालयाशी  कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मुकने यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                            ०००००

उद्योजकांनी रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा

         जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 – रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी दहावी पास ते पदवीधारक उमेदवारासाठी सहा महिने  कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते उदयोजकाच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात / कंपनीमध्ये  प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देऊन या योजनेतुन तीनशे ते एक हजार रुपये पर्यत शैक्षणिक पात्रतेनुसार  विदयावेतन शासनामार्फत देण्यात येते.

        जळगाव जिल्हयातील ज्या उदयोजकाना /  कंपन्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा   आहे. अशा उदयोजकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव वि. जा. मुकणे यांनी  केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी  सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790  वर संपर्क साधावा.   

                                                   ००००००

Monday, 2 January 2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

        जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) :-  लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे.  ही जबाबदारी पार पाडत असताना  प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

            मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्ताकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'मतदार मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. 10 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असेल हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरीत केले जातील.

            पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करु शकतात त्याकरता मतदार नोंदणी मतदान, निवडणुका यासंबधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज  democracybook@gmail.com  या ई मेल आयडीवर दिनांक 7 जानेवारी, 2023 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी  प्रणव सलगरकर – मो. क्र. 8669058325 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी  शरद दळवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००