Friday, 30 April 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 

             जळगाव, (जिमाका) दि. 1 - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

            याप्रसंगी महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धुन वाजविली.

 

लसीकरणासाठी तरूणांनी घाई न करण्याचे आवाहन

            राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण आजपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी आपली नोंदणी कोविन ॲपवर करावी. ज्यांची नोंदणी होईल त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.   45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यांनी केंद्रावर जाऊन लस घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हावासियांना केले.

            जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनावर मात करेल असा विश्वासही त्यांनी कार्यक्रमानंतर बोलतांना व्यक्त केला.

00000

आता टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

             जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत.

            आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमाब (Tocilizumab)  या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी  त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी.

            जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमाब (Tocilizumab) या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

             जळगाव, दि. 30 - महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी (BREAK THE CHAIN) व सदर विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्व्ये दि. 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बध लागु केलेले आहेत.

            कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने साजरा करणेबाबत प्राप्त सुचनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापनदिन समारंभ 1 मे, 2021 प्रशासकीय इमारत टप्पा क्र-3 च्या प्रांगणात साजरा करण्यात येणार नाही.

            तरी प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहु नये. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले

             जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 14 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी दिनांक 1 मे, 2021 रोजी सकाळी 7 वाजेपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. तर 20 एप्रिल, 2021 अन्वये सुधारीत विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बध दिनांक 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपावेतो वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

            या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

            जळगाव, (जिमाका) दि. 30 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसीलदार सुरेश थोरात आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रम 1 मे, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

            सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांनी याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

            कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 15 मे, 2021 पर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8.00 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात येईल.

            या ठिकाणी केवळ पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

            इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशाही सूचनाही परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

00000

Thursday, 29 April 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

            त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 1 मे, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

            याठिकाणी केवळ पालकमंत्र्यांसह महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी आदि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिलेले असल्यामुळे या कार्यक्रमास नागरीकांनी गर्दी करु नये. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

कोविड संक्रमित नागरीक शोध मोहिम कक्ष स्थापन बाहेर फिरत असलेलया गृह विलगीकरणातील रुग्णांवर होणार कारवाई माहिती देणाऱ्याचे नाव ठेवले जाणार गोपनीय

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोविड विषाणू संक्रमित नागरिकांचा शोध घेऊन त्यांचेवर जिल्हा आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमित नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटन, जळगाव यांच्या स्वयंसेवकांचा सहभाग असलेला कोविड संक्रमित नागरिक शोध मोहीम कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

            कोविड संक्रमित नागरिकांच्या शोध मोहिम कक्षात 7620170659 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यरत राहणार आहे. या मोबाईल क्रमांकावर जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिसरात आढळणारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिकांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती पाठवावी. जे नागरिक अशा संक्रमित रुग्णांची माहिती पाठवतील त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या मोबाईल क्रमांकावर येणारे कोणतेही इन्कमिंग कॉल स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर केवळ व्हॉट्सअप अथवा एसएमएस द्वारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/ वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असल्यास तो पाठवावा. कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची माहिती, व्हिडिओ, अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास अशा प्राप्त मोबाईल क्रमांक धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

            जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सुजाण व जागृत नागरिकांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आपल्या परिसरातील विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव पत्ता व उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक आदि माहिती प्रशासनास देऊन विषाणूचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

 


          जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - महाराष्ट्र राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production, IIP) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त, नियोजन) अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात आज ऑनलाईन संपन्न झाले.

         याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

         राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्यिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउतारांचे मोजमाप आवश्यक असते.  महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पादनामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणा-या संस्था यांना नेहमी यांची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

         जिल्ह्यांमधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार असल्याचे प्रमोदराव पाटील, जिल्हा अर्थ व सांख्यिकी अधिकारी, जळगांनी यांनी कळविले आहे.

00000

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

       जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे होणार आहे. या लोकशाही दिनात नागरीकांना तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात वेळेतवर उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                              00000

Wednesday, 28 April 2021

नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - कारागृहातील बंद्यांना कोरोना (कोव्हिड -19) विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच दररोज कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना अलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, जळगाव परिसरातील प्रशिक्षाणार्थी वसतीगृहामधील एकूण 4 खोल्या (3 खोल्या पुरुष कैदी व 1 खोली महिला कैदी) हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी तात्पुरते कारागृह हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करीत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. 

            याठिकाणी पोलिस अधिक्षक, जळगाव शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग), जिल्हा शल्य चिकीत्सक आणि अधिक्षक, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी आरोग्य सुविधा, आवश्यक त्या सोईसुविधांसह सुरक्षेच्या योजना करुन आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची आहेत. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.

00000

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2021-22 फळबाग लागवड कार्यक्रमातंर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेत आंबा, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, बांबू, मोसंबी, चिक्कु, डाळिंब, पेरु, कागदी लिंबु, शेवगा, साग, औषधी वनस्पती,  इत्यादी  घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुदान देय राहील,

            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे रोजी ऑनलाईन होणार

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

            त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                    00000

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

       जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 - महिला कर्मचारी यांचा कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत Sexual Harassment electronic Box (SHEBOX) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर महिलेने आपली तक्रार नोंद करावी. तसेच कार्यालय प्रमुखाने अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करुन त्याचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांना 30 एप्रिल, 2021 पर्यंत सादर करावा. याबाबत कार्यवाही न केल्यास कलम 26 क प्रमाणे 50 हजार रुपये इतका दंड संबंधित कार्यालय प्रमुखांवर आकारण्यात येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

            जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा यांची शासनाने स्थापन केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा अशंत: प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, एन्टरप्राईझेस अशासकीय संघटना, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार, विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठाधारक रुग्णालय सुश्रृषालये, क्रिडासंस्था, प्रेक्षागृहे, क्रिडासंकुले इ. नियमात नमुद केलेल्या शासकीय व खाजगी  क्षेत्रातील कार्यालयाच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छाळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 कलम 4 (1) अन्वये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावणे तसेच अधिनियमातील कलम 6 (1) अन्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करणे कायद्याने बंधनकारक आहे.

            या अधिनियमानुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा कार्यालयात अतंर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. आणि ज्या कार्यालयात 10 हून कमी कर्मचारी आहेत. उदा. असंघटीत क्षेत्र, शासकीय, खाजगी, लहान अस्थापना किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरुध्द लैगिक छळाची तक्रार आहे. अशा कार्यालयातील लैगिक छळाची तक्रार जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावी.

            अधिक माहितीसाठी Jalgaon.nic.in व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केद्राजवळ, जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2228828 अथवा dwcwjal@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

00000

Tuesday, 27 April 2021

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा - आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील

 


            जळगाव (जिमाका) दि. 27 - कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशा सुचना आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिल्यात. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी डॉ पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे आदि उपस्थित होते.

            डॉ पाटील पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा 48 तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणेकरुन त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का याचीही तपासणी करावी. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामाचे समान वाटप करा. तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.            

ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा

            सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी दैनंदिन करावी. लसीकरण करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देतांनाच कोरोना सोबतच डिलीव्हरीचे पेशंट, अपघात व दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन कामाची माहिती कोविन व ईविन पोर्टलवर अपडेट करण्याच्या सुचनाही डॉ पाटील यांनी सर्व यंत्रणांना दिल्यात.

00000