Thursday, 5 October 2023

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे रोजगार विभागाचे आवाहन

         जळगाव, दि.०५ ऑक्टोबर (जिमाका) - केंद्र व राज्य शासनांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच २५ किंवा त्यापेक्षा अधिक मनुष्यबळ कार्यरत आहेत अशा सर्व खासगी  आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय कारखाने यांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार  जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीचे विवरणपत्र मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www. rojgar. mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ ओपन करून एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करून 'एम्प्लॉयर लॉग इन' मध्ये नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून ईआर रिपोर्ट मधील 'ई-आर ' या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टया वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कार्यालयाच्या (०२५७) २९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई होऊ शकेल. याची नोंद घ्यावी. असे आवाहन ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

०००००००००००००००

No comments:

Post a Comment