Monday, 29 April 2024

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

 विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते

आयुष्यमान भारत कार्डचे वाटप 

 जळगाव दि.29 ( जिमाका ) महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य "सुधारणा व पुनर्वसन" अंतर्गत डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकतीच अतिसंवेदनशील जळगाव जिल्हा कारागृहास भेट दिली. सदरच्या भेटीदरम्यान समता फाऊंडेशन मुंबई व जळगाव जिल्हा कारागृह यांचे संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या शिबीरादरम्यान कारागृहात दाखल असलेल्या बंद्याचे आयुष्यमान भारत (गोल्डन) कार्ड बनविण्यात आले होते. आयुष्यमान भारत (गोल्डन) कार्ड डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे शुभहस्ते बंद्यांना वाटप करण्यात आले आहे.

  तसेच महोदयांनी कारागृह संचार फेरी घेवून कारागृह अधिकारी/कर्मचारी व बंद्यांच्या अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांचे निराकरण केले व नवनिर्मित भुसावळ जिल्हा कारागृह येथील जागेची पाहणी केली आहे. असे ओ.आर.वांडेकर अधीक्षक, जळगांव जिल्हा कारागृह वर्ग-२ यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

Saturday, 27 April 2024

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूकीतील मतदान टक्का वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा होणार कार्यान्वित

              जळगाव दि. 27 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासोबतच आरोग्याच्या कोणत्याही समस्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उद्भवू नये याकरिता आरोग्य विभागाचे पथकासोबतच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांना मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

                         जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरू असलेला उन्हाळा व मे महिन्यात तापमानाचा पारा वाढू शकतो हे लक्षात घेऊन उन्हाचा कोणताही परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे दक्षता घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 61 हजारगरोदर माता आहेत.वाढत्या उन्हाचा परिणाम गरोदर मातांच्या प्रकृतीवर होऊ नये व गरोदर मातांसह दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता सकाळ सत्रात ऊन वाढण्याच्या अगोदरच या तीनही घटकातील मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा पुरवण्याकरिता दक्षता घेण्यात येणार आहे. याबरोबरच अलीकडे बाळंत झालेल्या महिलांना आपल्या बाळासोबत मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदान केंद्रांवर पाळणा घर देखील स्थापन करण्यात येणार आहेत.

              घरगुती काम करण्यात व्यस्त असलेल्या महिलांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता काही वेळ सुट्टी देण्यात यावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन हजार अशा स्वयंसेविका व 3 हजार 941 अंगणवाडी सेविका या कामात सहभागी होणार आहेत. गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी उन्हाचा पारा वाढण्या आगोदर सकाळ सत्रात जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता घरोघर जाऊन आशा स्वयंसेवी का जनजागृती करणार आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना काही त्रास उद्भवल्यास लागलीच त्यांच्यावर उपचार करता यावे याकरिता आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात येणार आहे.वाढते ऊन ,आरोग्य आणि इतर कारणामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून अधिक प्रमाणात मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

00000

Friday, 26 April 2024

महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस, पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जळगांव दि.26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस समारंभ मुख्य शासकीय कार्यक्रम दिनांक १ मे २०२४ रोजी ठिक ०८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पाणी पुरवठा व स्वच्छता, तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील, यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी दि. १ मे २०२४ रोजी सकाळी ०७.१५ ते ०९.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी ०७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ०९.०० च्या नंतर आयोजित करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी ऐका प्रसिद्धी पत्राकान्वये कळविले आहे.

00000

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 जळगांव दि.26 (जिमाका) :- भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील जळगांव जिल्हयातील विदयार्थ्याचे सन 2023-24 चे विविध स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता त्याचप्रमाणे महाविदयालय स्तरावरील अडचणी उदा. फी निश्चित होणे, अभ्यासक्रमास मान्यता मिळणे इ. बाबी संबंधीत शैक्षणिक विभागाकडून प्रलंबित असल्यामुळे अशा अडचणी लक्षात घेऊन राज्यशासनाच्या मान्यतेने प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता 30 एप्रिल, 2024 पर्यत मुदतवाढ प्रदान करण्यात आलेली आहे.

तरी मुदतवाढ दिलेल्या कालावधीत सन 2023-24  तसेच त्यापूर्वीचे प्रलंबित असलेले अर्ज ऑनलाईनरित्या निकाली काढण्यात यावेत, सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास असे अर्ज ऑनलाईन प्रणालीतून कायमस्वरुपी रदद बातल (Auto Reject) होतील याची सर्वानी दखल घ्यावी.

तसेच विदयार्थी व महाविदयालयाच्या स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विदयार्थी शिष्यवृत्तीस वंचित राहिल्यास संबंधीत महाविदयालयचे प्राचार्य हे व्यक्तीशः जबाबदार राहतील याची गांभीर्यान नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त समाज कल्याण, योगेश पाटील यांनी ऐका प्रसिध्दी पत्रान्वये कळविले आहे.

00000

जळगाव व रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जळगाव लोकसभा मतदार संघात 20 उमेदवार वैध तर 04 अवैध तर, रावेर लोकसभा मतदार संघात 29 उमेदवार वैध तर 02 अवैध

 जळगाव दि. 26 (जिमाका) :- जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवार दि.25 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर रावेर लोकसभा मतदार संघात 31 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे जळगाव लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक डॉ. राहुल गुप्ता तर रावेर लोकसभेसाठीचे सर्वसामान्य निरीक्षक अशोक कुमार मीना हे उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची जळगांव लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर रावेर लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी छाननी केली.

जळगांव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार :- करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,) विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी ), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी ) ईश्वर दयाराम मोरे ( सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी( अखिल भारत हिंदू महासभा), युवराज भीमराव जाधव( वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे( अपक्ष), अहमद खान युसुफ खान( अपक्ष), करण संजय पवार( अपक्ष), पाटील संदीप युवराज( अपक्ष),  प्रदीप शंकर आव्हाड( अपक्ष), डॉ. प्रमोद हेमराज पाटील, ( अपक्ष),  महेंद्र देवराम कोळी( अपक्ष), मुकेश मूलचंद कोळी( अपक्ष), रोहित दिलीप निकम( अपक्ष), ललित गौरीशंकर शर्मा( अपक्ष), लक्ष्मण गंगाराम पाटील( अपक्ष), अडव्होकेट बाबुराव तुकाराम दाणेज( अपक्ष), संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी (पाटील) (अपक्ष), संजय एकनाथ माळी( अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जळगांव लोकसभा मतदार संघात चार अवैध ठरलेले उमेदवार :- अंजली करण पाटील, मोहसिन खान, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, ईशान राठोड असे आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार :- रक्षा निखिल खडसे,(भारतीय जनता पार्टी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), अशोक बाबुराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), नाजमीन शेख रजमान (सर्व समाज जनता पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)), अनिल पितांबर वाघ (अपक्ष), अमित हरिभाऊ कोलते (अपक्ष), प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष), एकनाथ नागो साळुंके (अपक्ष), कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष), नितीन प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष), प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), रऊफ युसुफ शेख (अपक्ष), राहुलरॉय अशोक मुळे (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम पाटील (अपक्ष), शेख आबिद शेख बशीर (अपक्ष), शेख कुर्बान शेख करिम (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            रावेर लोकसभा मतदार संघात दोन अवैध ठरलेले उमेदवार :- रविंद्र प्रल्हादाराव पाटील, गयासुद्दीन सदरोद्दीन काझी असे आहेत.

            अवैध ठरलेल्या उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.

                                                                                 000000

Thursday, 25 April 2024

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 अखेरच्या दिवसापर्यंत जळगांवसाठी 25 उमेदवारांनी 36 अर्ज तर रावेरसाठी 31 उमेदवारांनी दाखल केले 45 अर्ज

 जळगांव दि.25( जिमाका ) लोकसभा निवडणूक 2024 चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि.25 एप्रिल रोजी  जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 21 अर्ज भरले तर रावेर साठी 11 उमेदवारांनी 18 अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत जळगांव लोकसभा मतदार संघात एकूण 31 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले आहेत.

      गुरुवार दि 25 रोजी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 03 उमेदवारांनी 06 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  02 उमेदवारांनी 03 अर्ज घेतले. अखेरच्या दिवशी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी शैलेश यशवंत देसले यांनी रोहित दिलीप निकम (भारतीय जनता पार्टी) यांचेसाठी 02,अमोल निंबाजी वानखेडे यांनी राजेंद्र समाधान वानखेडे, भुसावळ (अपक्ष) यांचेसाठी 3, प्रतीक सुधाकर राजपूत, पारोळा (अपक्ष) 1 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदार संघांसाठी प्रभाकर पंढरी साळवे, जामनेर (अपक्ष) 1, ललित गुणाजी बोडे, रावेर (भारतीय जनता पार्टी) 2 अर्ज घेतले.

                                                                         00000

"मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी "

 "मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया

 लढा मलेरियाला हरविण्यासाठी "


जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२४


जळगाव (जिमाका) दि. 25 राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्गत 25 एप्रिल, 2024 रोजी जागतिक हिवताप दिन संपूर्ण जिल्हा भरात साजरा करण्यात येणार आहे. डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प जळगाव तथा डॉ. तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे.


सदरील कार्यक्रमात साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडणे, लहान डबकी बुजविणे, व्हॅन्ट पाईपला जाणी बसविणे, जि.प शाळेत मार्गदर्शन व प्रतिज्ञा वाचणे, व्हॉलगळती काढणे. बस स्टॅन्डवर माहीती देणे, हिवताप हा आजारचे प्रकार ४ असुन १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स, २ प्लाझमोडियम फॅल्सीपेरम, ३ प्लाझमोडियम मलेरी ४ प्लाझमोडियम ओव्हेल असुन यापैकी १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या दोन प्रकारचे रोगजंतु आपल्या विभागात आढळुन येतात. या रोगाचे प्रमुख खादय मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन होय. या रोग जंतुमुळे हिवताप हा आजार होते. सर्वप्रथम सन १८८९ मध्ये डॉ. सर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने रोग जंतुचा शोध लावला. तसेच वरील माहिती जनतेस पोहचविण्याकामी जिल्हा स्तरावरुन देण्यात येणार आहे.


हिवतापाचा प्रसार हिवतापाचा प्रसार अॅनाफेलीस या जातीच्या डासामार्फत होतो. या जातीच्या डासाची मादी घरातील वापरण्यासाठी साठविण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये, स्वच्छ पाण्याची डबकी, नारणाच्या करवंट्या जुनी टायर्स इ. वस्तुमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात व तेथे त्या अंड्यापासुन नवीन डास उत्पत्ती होऊन अशा प्रकारे डासांची संख्या वाढुन हिवतापाचा प्रसार वेगाने होण्यास मदत होते.


हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुषपरीणाम हिवतापाचे रोग जंतु मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशीमध्ये त्यांची वाढ होते तेथे त्यांचे जिवनचक्र पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो. त्यांनतर जेव्हा वरील रोगजंतु रक्तप्रवाहात मिसळुन रक्तातील तांबडया पेशीवर हल्ला करतात त्या रोगजंतुना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खुप वाढते. त्यामुळे त्याला भरपुर प्रमाणात थंडी वाजुन येते, रुग्णास मळमळल्या सारखे वाटते काही वेळेस उलट्या होतात, खुप डोके दुखते, नंतर भरपुर घाम येवुन ताप उतरतो व गाढ झोप लागत. पुन्हा २४ तासानंतर ताप येवुन वरील प्रमाणे त्रास होतो. खुप अशक्तपणा जानवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते गर्भवती व बालकांना हितापापासुन सर्वाधीक धोका संभवतो विशेषतः प्लाझामोडीयम फॅल्सीपेरम या जंतुमुळे होणारा हिवताप हा मेंदुज्वर होण्यास कारणीभुत ठरतो. वेळीच समुळ उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.


राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव यांच्यामार्फत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.


डास नियंत्रणासाठी उपाययोजना


> किटकनाशक फवारणी हिवताप पारेषण काळात ग्रामिण भागातीत हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावामध्ये केओथिन लॅम्डा पावडर किटकनाशकांची घरोघरी फवारणी करतो.


> जिवशास्त्रीय उपाय योजना किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासअळीभक्षक सोडण्यात येतात. सदर उपाय योजना ग्रामिण तसेच शहरी भागातही राबविण्यात येतात.


कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करु नका. हा तापहिवताप असु शकतो

> हा ताप हिवताप तर नाही, याबददल खात्री करुन घ्या.


> औषध विक्रेतांच्या अथवा स्वता च्या अल्प ज्ञानावर तापाकरीता परस्पर औषधी घेवु नका.


> हिवतापाच्या निश्चीत निदानासाठी प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र स्तरावर तापाच्या रुग्णांच्या रक्तनमुना घेवुन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी आवश्यक असते.


> हिवताप पसरविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात.


> पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होवु नये म्हणुन त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.


> दैनंदिन पाण्याच्या वापराकरीता घरामधील तसेच घराबाहेरील टाकी आठवडयातुन दोनदा पुर्णपणे रिकामी व स्वच्छ करुन पुन्हा भरणे व झाकुन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


> डासांचा उपद्रव पुर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व पिंपे, टाक्या इ. सर्व साठे डास प्रतिबंधक स्थीतीत आणी व्यवस्थीत झाकुन ठेवणे


> परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळी बुजवा किंवा वाहती करावी व वाहत नसल्यास साचलेल्या डपक्यात गप्पी मासे कींवा कुड ऑईल टाकावे.


वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, व डास चावणार नाही, म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.


000000

अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा फार्म ऑनलाईन भरावेत

 अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा फार्म ऑनलाईन भरावेत


जळगाव दि.25(जिमाका ) अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांना आवाहन करण्यात येते की, सन 2023-2024 या महसुल वर्षापसुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परतावा अर्ज करते वेळीचा युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. तसेच अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर युझरआयडी वा पासवर्ड माहित नसल्यास   https://foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर जावुन  forget password or login id  टाकुन नविन  login id व  password generate  करावा व त्यानंतर अन्न व्यावसायिकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी- १ सादर करावा. 

तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा helfdesk-foscos@fssai.gov.in  या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. डी -1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 मे, 2024 असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन 100 रुपये या प्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल याची सर्व उत्पादक आस्थापनांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त स. कृ. कांबळे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

Tuesday, 23 April 2024

जळगाव मतदार संघाचे सर्वसामान्य निरीक्षक आणि जळगाव जिल्ह्यासाठीचे पोलीस निरीक्षक दाखल तिन्ही निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर

जळगाव दि.22 (जिमाका )- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून 

गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी डॉ.राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे जळगावांत आगमन झाले आहे.   8275970667 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. तसेच प्रियंका मीना ( आय.पी. एस ) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याशी 8275970669 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू  शकतात.  निरीक्षकांसाठी अजिंठा विश्रामगृह येथे स्वतंत्र कार्यालय असणार असून राजकीय पक्ष उमेदवार व मतदार अजिंठा विश्रामगृह येथे असलेल्या कार्यालयात किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकता असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.

                                                                            00000

बोगस कृषि निविष्ठा विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हयात १६ भरारी पथकांची स्थापना

             जळगाव, दिनांक 23 एप्रिल (जिमाका) : खरीप हंगाम २०२४ जवळ येत असल्याने शेतकरी बांधवांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस कृषी निविष्ठांची विक्री होऊ नये याकरीता जिल्हयात १६ भरती पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व किटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे.

             कृषि विभागाकडून खरीप हंगाम २०२४ चे नियोजन करण्यात आले असून रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवता नियंणासाठी जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बाधवांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरित्या विक्री होणा-या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. या कालावधीत शेतक-यांची फसवणूक होऊ नये म्हणुन शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकीटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पहावा.

             पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पिक निघेपर्यंत जपून ठेवावे, अनधिकृत / बिनाबिलाने बियाणे खरेदी करू नये, किटकनाशक, तणनाशके खरेदी करतांना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, खत खरेदी करतांना रितसर बिल घ्यावे, जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीया सारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी ०२५७-२२३९०५४ किंवा मोबाईल क्रमांक ९८३४६८४६२० यावर माहिती द्यावी, असे आवाहन कु.मु.तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

0 0 0 0 0 0

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 पाचव्या दिवशी जळगावसाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज तर रावेरसाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले जळगांवसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज तर रावेरसाठी 04 उमेदवारांनी दाखल केले 06 अर्ज

             जळगांव दि.23 (जिमाका) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.23 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने 02 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी 01 उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ नागो साळुंखे,  (अपक्ष) कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष) जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. असे जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण 09 उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आले.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव (अपक्ष) 01, रोहन गणेश सोनवणे (अपक्ष) 01, राहुल शशी कुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 03, नंदू शामराव पाटील (अपक्ष ) 01, महेश सुपडू महाजन, जळगांव (अपक्ष) 01, प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष) 01, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव, (अपक्ष) 01 असे एकूण 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत.

            रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात युवराज देवसिंग बारेला,  चोपडा (बहुजन समाज पार्टी) 02, जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ,  नांदुरा (अपक्ष) 02, युनूस अब्दुल तळवी यावल यांनी ममता भिकारी तळवी यावल( अपक्ष)यांचेसाठी 02, अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड ( अपक्ष)02, दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी  श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष) 04, दीपक पद्माकर भालेराव, रावेरयांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर (अपक्ष) 04, अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष) यांच्यासाठी 04, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी) 02, आनंद जनार्दन तेलंग, मलकापूरयांनी सौ. अनिता योगेंद्र कोलते,मलकापूर (बहुजन समाज पार्टी) 02 असे एकूण 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.

            अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी  जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी ललित गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष )या उमेदवाराने 02 अर्ज तर करण बाळासाहेब पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 01 अर्ज दाखल केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार यांनी अ आणि ब फॉर्म (A B form) सादर केलेला नाही.असे मंगळवारी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 0 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर   रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. एकनाथ नागो साळुंखे,  (अपक्ष) कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष) जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दिनांक 23 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 03 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 06 असे एकूण 09 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

                                                                     00000

Monday, 22 April 2024








जळगाव दि.22 ( जिमाका ) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी 'मतदार सुविधा कक्ष' स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती द्यायची आहे.

त्यात मतदानापूर्वी आपली मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची,पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत.

  मतदान सुविधा केंद्र उभारून  जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

     याबाबत ०३ जळगांव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच दिनांक १३ मे २०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे.

मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणाऱ्यासर्व मतदारांना निवडणुक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्यातमतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अँप बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे.

                                                               00000 

विनापरवाना 4 लाख 10 हजारांचा सील बंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

 जळगाव दि. 22 (जिमाका ) :- विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शरद म. पवार, सहायक आयुक्त श्री. संतोष कृ. कांबळे  व मा.सह आयुक्त,(नाशिक विभाग) श्री सं.भा.नारगुडे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर धाड टाकण्यात आली.

सदर पेढीकडे आवश्‍यक अन्न परवाना नसताना सुद्धा जळगाव शहरात व जिल्हयात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्याची (उत्पादक प्रामुख्याने  गुजरात जिल्हयातील ) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढी मध्ये 4 लाख 10 दहा ऐंशी किमतीचा पाण्याच्या बाटल्यांचा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये साठा जप्त करण्यात आला.

जळगाव जिल्हयातील सर्व अन्न व्यावसाईकांना कळविण्यात येते की, कोणताही अन्न व्यवसाय  करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावी असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी ऐका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000

जळगांव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना छायाचित्राबाबत काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

जळगाव दि.22(जिमाका ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ०३ जळगाव व ०४ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र  दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे. नामनिर्देशनपत्रावर एक व त्यासोबत छायाचित्र सादर करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी छायाचित्र सादर करणेबाबत अलीकडील 3 महिन्यात काढलेले छायाचित्र सादर करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले निर्देश पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जा सोबत सादर केलेले छायाचित्र हे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमूना 7 अ मधील यादीवर व सर्व मतपत्रिका यावर सुद्धा छापण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी छापील छायाचित्रासोबतच छायाचित्राची सॉफ्टकॉपी ०३ जळगाव मतदारसंघाच्या बाबतीत collector.jalgaon@maharashtra.gov.in व राबेर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत adcjalgaon@gmail.com या ईमेल आईडीबर सादर करावी व सोबत उमेदवाराचे नाव नमूद करावे. सॉफ्टकॉपी स्वरुपात उमेदवारांनी ई मेलवर सादर केलेले छायाचित्र हे भारत निवडणूक आयोगाच्या विविध पोर्टलवर तसेच मतपत्रिकेवर छपाईकामी वापरात येणार असल्याने उमेदवारांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी.

छायाचित्राबाबतच्या महत्त्वाचे मुद्दे :

 नामनिर्देशनपत्रावरील छायाचित्र व सॉफ्टकॉपी सारखी असावी. छायाचित्र हे अलीकडील किमान तीन महिने कालावधीतील म्हणजेच अधिसूचनेच्या दिनांकाच्या ०३ महिन्यांच्या कालावधीपूर्वी काढलेले असावे. छायाचित्र हे २ cm x २.५ cm (२ cm रुंदी व २.५ cm उंची) आकाराचे असावे. छायाचित्र काढताना उमेदवाराचा संपूर्ण चेहरा कॅमेऱ्याकडे असावा, डोळे उघडे असावेत व चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसावेत. छायाचित्र हे रंगीन किंवा Black & White असेल तरी चालेल. छायाचित्र हे साधारण कपड्यात काढलेले असावे. कोणताही विशीष्ट पोषाख परिधान केलेला नसावा तसेच टोपी, काळ्या काचेचा चष्मा घातलेला नसावा. छायाचित्र सादर करताना विहित नमुन्यातील घोषणापत्र सोबत सादर करावे.  असे अवाहन आयुष प्रसाद, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.                                                                                     00000

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 चौथ्या दिवशी जळगावसाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 04 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

 जळगांव दि.22( जिमाका ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.22 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी  22 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  08 उमेदवारांनी  24 अर्ज घेतले. तर चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मुकेश मुलचंद कोळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. असे जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी एकूण 05 अर्ज दाखल झाले.

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव (अपक्ष) 02, प्रदीप भीमराव मोतीराया चांदसर ता. धरणगाव (अपक्ष) 02,प्रदीप भीमराव मोतीराया यांनी सुनंदाबाई भीमराव मोतीराया (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) 02, विलास देवराम कोळी, कळमसरे, ता. अंमळनेर (अपक्ष) 04, किरण ब्रिजलाल कोळी,  जळगाव (अपक्ष) 03, दीपक सुखदेव सोनार,जळगाव यांनी लीना शाम पाटील (अपक्ष) 04, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, जळगाव ( आम जनता पार्टी)  02, इनेश एकनाथ राठोड, लोंजे ता. चाळीसगाव (अपक्ष) 01, गौरव दामोदर सुरवाडे,  जळगाव (अपक्ष) 02  असे एकूण 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत.

 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात मनोज नामदेव चौधरी, भुसावळ (अपक्ष) 02, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, मलकापूर (अपक्ष) 04, श्रावण काशिनाथ डहाळे, राजुरा, मुक्ताईनगर (अपक्ष)  02, उमेश दत्तात्रय पाटील, ममुराबाद यांनी रवींद्र प्रल्हादराव पाटील, मानूर,बोदवड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी 02,राहुल बापू साळुंके, किनगाव यांनी जगन देवराम सोनवणे, भुसावळ (अपक्ष) यांचेसाठी 04, विजय मधुकर साळुंके, किनगाव यांनी सौं. पुष्पाताई जगन सोनवणे, भुसावळ (अपक्ष) यांच्यासाठी  04, गजानन रमेश रायडे, जामनेर (अपक्ष) 04, शेख रमजान शेख करीम, भुसावळ यांनी नाजमीनबी शेख रमजान (सर्व समाज जनता पार्टी) 02 असे एकूण 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.

 अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी मुकेश मुलचंद कोळी , शिरसोली, प्र. न, तालुका जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर  04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर,  मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला.  सोमवार दिनांक 22 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 01 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 04 असे एकूण 05 अर्ज सोमवारी दिवसभरात दाखल झाले.

00000

Sunday, 21 April 2024

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज ; अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य , 311 अमान्य

 जळगांव दि.21 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर,चाळीसगाव,भुसावळ, मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या कारणाची पडताळणीत करून 421 जणांची नेमणूक रद्द करण्यात आली तर 311 जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत.

       लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी जामनेर,चाळीसगाव,भुसावळ,मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 कर्मचाऱ्यांचे विविध गंभीर कारणास्तव निवडणूक ड्युटी रद्द करणे बाबतचे विनंती अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.त्यापैकी 421 कर्मचाऱ्यांचे निवडणूक ड्युटी आदेश पडताळणी केल्यानंतर रद्द करण्यात आले आहेत.तर 311 अर्ज प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. निवडणूक ड्युटी आदेश रद्द केलेल्या 421 जणांमध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग ऑफिसर (पीआरओ) 88, प्रथम निवडणूक अधिकारी 77 (एफपीओ) आणि 252 ओपीओ आणि 4 मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे.

00000

Saturday, 20 April 2024

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज तर रावेरसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल

जळगांव दि.20( जिमाका ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.20 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी

13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव ( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा यांनी श्रीमती तेजस्विनी ललित शर्मा जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी 4, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4,  अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी4, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव( अपक्ष)1, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष )1, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे तालुका जामनेर( बहुजन मुक्ती पार्टी)4, जितेंद्र भागवत केदार जळगाव( अपक्ष)1, दिलीप वसंत मराठे, जळगाव( अपक्ष)1, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव( अपक्ष)2, धरमपाल हरिभाऊ इंगळे,  मलकापूर( बहुजन समाज पार्टी)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण तेरा उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत.
       04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार,  बोदवड( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, भिवराज रामदास रायसिंगे,चोपडा (अपक्ष ) 2, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष )4, कुंदन टोपलू तायडे,  यावल( अपक्ष)2, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष )2, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर ( अपक्ष)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा ( बहुजन समाज पार्टी) 3 असे एकूण 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत.
 अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी संजय एकनाथ माळी, हनुमान नगर धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर शनिवारी 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
                                                                        0000000

Friday, 19 April 2024

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले एकही अर्ज दाखल नाही

 जळगांव दि.19 ( जिमाका ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले. तर दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 .उमेदवारांनी 60 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  रोप खान कादिर खान, मालेगाव यांनी आयुष्या सिद्धीका रऊफ खान,  मालेगाव (भारतीय टायगर सेना) 2, रौफ खान कादिर खान,  मालेगाव (भारतीय टायगर सेना) 1, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान,  मालेगाव (भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी 1, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर (प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी) 3, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव(अपक्ष) 4, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव(अपक्ष) 3, राजेश हरी सपकाळे, मोहाडी (अपक्ष) 1, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा (शिवसेना उ. बा.  ठाकरे) यांच्यासाठी 4 मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा (शिवसेना उ. बा. ठाकरे) यांच्यासाठी 4 अरुण रोहिदास जगताप धुळपिंपरी तालुका पारोळा, (अपक्ष) 4, युवराज प्रकाश बारी जळगाव (अपक्ष)2,               डॉ.प्रमोद हेमराज पाटील,  भडगाव (भाजपा 1, अपक्ष 1) निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा            (अपक्ष) 1, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी सौ. वैशाली निळकंठ पाटील (अपक्ष) यांच्यासाठी 1,  जळगाव   (अपक्ष-1,  बहुजन विकास आघाडी -1), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल (अपक्ष-1,  वंचित बहुजन आघाडी-1), नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार,  जळगाव (अपक्ष) 2, राहुल नारायण बनसोडे भुसावळ (बहुजन समाज पार्टी) 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी (अपक्ष ) यांच्यासाठी 2, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव (अपक्ष) 2, ऍड. वासुदेव धोंडू वारे,  कासोदा (अपक्ष) 2, मुकेश मुलचंद कोळी,  शिरसोली (अपक्ष) 1, विजय बाबुलाल दानेज, जळगाव (अपक्ष) 4, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव (अपक्ष) यांच्यासाठी 4, मांगो पुंडलिक पगारे,  भडगाव (बहुजन महा पार्टी) 2 असे एकूण 25 उमेदवारांनी 60 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.


       04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत. त्यात संजय कुमार लक्ष्मण वानखेडे,  भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल) 2, अनंत वसंत बागुल,  जळगाव (अपक्ष) 2, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, (अपक्ष) 4, प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील,  रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी 4, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर (अपक्ष) 4, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा (अपक्ष) 2, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा (अपक्ष) 1,  अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा   (भूमी मुक्ती मोर्चा) 4, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला (अपक्ष) यांच्यासाठी 2, हर्षल राजेंद्र जैन,  नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष) यांचेसाठी 2, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी) 3, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष) 2, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे,  भुसावळ (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 2, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर (वंचित बहुजन आघाडी) 2, शेख कुरबान शेख करीम,  फैजपूर(एम आय एम) 4, युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी,  रावेर (अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत.


अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

                                                             00000

Thursday, 18 April 2024

'ताबुला रसा' नवमतदारांना व्यक्त होण्याचे अभिनव व्यासपीठ - जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद









जळगाव दि. 18 (जिमाका) - राष्ट्रनिर्मिती कार्यात युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे लोकशाही राष्ट्रात मतदान ही गोष्ट मूलभूत आहे. त्यामुळे युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन सारासार विवेकबुद्धीचा सुयोग्य वापर करून मतदान जरूर करावे. हा विचार करायला प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे 'ताबुला रसा' ही संकल्पना असल्याचे सांगून आपले आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यास उद्युक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

आज कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'ताबुला रसा'  उपक्रमाप्रसंगी विदयार्थ्यांना केले.*

काय आहे ' ताबुला रसा '?

अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर 'ताबुला रसा' म्हणजे कोरी पाटी... कोणतीही व्यक्ति जन्माला येताना तशी कोरी असते. नंतर सामाजिक वातावरणात, सभोवतालातून अनेक अनुभवातून शिकते, विचार करते.  त्यातून त्याची एक धारणा निर्माण होते. ती विचार करण्याची कल्पना म्हणजे ' ताबुला रसा ' यात नवमतदाराला पांढरा स्वच्छ कागद देऊन तुमच्या डोक्यात त्यावेळी काय असेल ते लिहायला सांगितले जाते. मग तो त्यावेळी विचार करायला प्रेरित होतो. त्यावेळी त्याच्या मनात वैचारिक मंथन होतं त्यातून तो लिहतो. उदा. लोकशाही, स्वातंत्र्य, किंवा चित्र काढेल किंवा डोक्यात असेल ते विचार व्यक्त करू शकेल. त्याक्षणी त्याच्या मनात जो वैचारिक अविष्कार होईल, त्याला 'स्वातंत्र्य' म्हटले जाते ..... तेच स्वातंत्र्य तुम्हाला मतदान करतांना लोकशाहीने बहाल केले आहे.मतदान करण्याच्या बॉक्स मध्ये फक्त तुम्ही असता त्यावेळी तुम्ही काही वेळासाठी विचार करता...त्यातून जे मत निर्माण होतं ते अमूल्य आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 'ताबुला रसा ' संकल्पना सांगताना स्पष्ट केले.

यावेळी सर्वांना कोरे कागद देऊन वरील संकल्पने प्रमाणे प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्यात विद्यार्थ्यांना युमच्या मनात येईल ते निबंध,चित्र, व्यंगचित्र,लेख, कविता यांच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सांगितले. यातून एकच संदेश अभिप्रेत आहे की, लोकशाही मध्ये तुम्हाला विचार करण्याचे अनमोल स्वातंत्र्य आहे. त्या लोकशाहीचा आत्मा मतदान आहे. त्यामुळे तुम्ही तर कराच पण तुमच्या घरच्यांना, पाहुण्या- रावळ्यांना सांगा पण सांगा, मतदान कराच असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मतदानाचा दिवस सुटीचा दिवस न मानता देशाप्रती कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.तसेच देशात युवकांचा टक्का मोठा असल्याने युवकांना मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मतदान अवश्य करावे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी श्री.विनोद पाटील (कुलसचिव), श्री. अनिकेत पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी), श्री.योगेश पाटील (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे (संचालक विद्यार्थी विकास), डॉ.अतुल इंगळे व प्रा.श्री. राहुल वराडे (सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी), प्रा.डॉ.गोगाडे  यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

00000

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित जळगावसाठी कुमार चंदन,रावेरसाठी संदीपन खान

 जळगाव दि 18 ( जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. कुमार चंदन यांचे 18 एप्रिल 2024 रोजी जळगांव लोकसभा मतदार संघात व श्री. संदीपन खान यांचे रावेर मतदार संघात आगमन झाले आहे.श्री कुमार चंदन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत.त्यांचा निवास अभंग अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राहणार असून त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे.तर श्री.चंदन यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970670 हा आहे. तर संदीपन खान हे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहे. श्री. खान यांचा निवास पोवाडा अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. तर त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. श्री.खान यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970671 हा आहे.निवडणूक निरीक्षक यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनीवर अथवा कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधता येईल असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.

00000

उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही, फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार

 जळगाव दि.18 ( मीडिया कक्ष ) आज दि.18 एप्रिल रोजी जळगाव, रावेर लोकसभा लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या अधिसुचना प्रसिद्ध झाली असून 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

अर्ज निशुल्क आहे मात्र उमेदवाराला अर्ज भरताना अनामत रक्कम भरायची असून खुल्या वर्गासाठी ही रक्कम 25 हजार रुपये असून राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500 रुपये एवढी असल्याची माहितीही निवडणूक अधिकारी यांनी दिली.

000000

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 पहिल्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज तर रावेरसाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आजच्या तारखेत एकही अर्ज दाखल नाही

 जळगांव दि. 18 ( मीडिया सेंटर ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक 18 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी 44 अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गणेश कौतिकराव ढेंगे, अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव या अपक्ष उमेदवाराने स्वतःसाठी 2, संजय एकनाथ माळी हनुमान नगर,धरणगाव          (अपक्ष) 2, डीडी वाणी फोटोग्राफर रावेर( अपक्ष)2, भरत पंढरीनाथ सपकाळे, वाल्मिक नगर जळगाव( बहुजन समाज पार्टी)3, ललित गौरीशंकर शर्मा, पोलन पेठ जळगाव( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा पोलन पेठ जळगाव यांनी सुरेश पांडुरंग पाटील पांडव नगरी पाचोरा यांच्यासाठी( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, ईश्वर दयाराम मोरे,राधाकृष्ण नगर जळगाव ( सैनिक समाज पार्टी)1, ऍड.गोविंद जानकीराम तिवारी ( हिंदू महासभा)2, संदीप युवराज पाटील, प्रताप नगर गलवाडे रोड अमळनेर( अपक्ष)2, संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील गलवाडे तालुका अमळनेर( अपक्ष) यांचे साठी 2, योगेश सुखदेवराव बाविस्कर,  आसोदा तालुका जळगाव यांनी महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांच्यासाठी 1, विजय भीमराव निकम,  पिंप्राळा हुडको ( अपक्ष)2, मोहन सोमा जोगी, सबगव्हाण तालुका पारोळा( अपक्ष)2 असे एकूण 13 उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 29 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत. त्यात डी डी वाणी, ( फोटोग्राफर) रावेर ( अपक्ष)04, जितेंद्र पांडुरंग पाटील थोरगव्हाण तालुका यावल ( अपक्ष)04, अमित हरिभाऊ कोलते मलकापूर जि. बुलढाणा ( अपक्ष)03, रमेश रंगनाथ साळवे, अनिल नगर भुसावळ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक)03, शेख राऊत शेख युसुफ, रा. खडका ता.भुसावळ ( अपक्ष)02, प्रवीण लक्ष्मण पाटील, रा. मलकापूर. जि.  बुलढाणा ( अपक्ष)02, संजय प्रल्हाद कांडेकर,भोईवाडा,मुक्ताईनगर( अपक्ष)04, तुषार किसन राणे रा.  सालबर्डी ता. मुक्ताईनगर यांनी श्रीमती रक्षा निखिल खडसे, कोथळी, ता.  मुक्ताईनगर ( भारतीय जनता पार्टी)04, राहुल रॉय अशोक मुळे, किन्ही ता. जामनेर (अपक्ष )04, ऍड. नामदेव पांडुरंग कोळी, रा. असोदा ता. जळगांव ( अखिल भारतीय हिंदू महासभा)04, अ. आरिफ अ. गनी, जाम मोहल्ला, भुसावळ (अपक्ष )04, गुलाब दयाराम भिल, खडगाव ता. चोपडा ( भारत आदिवासी पार्टी)02, अनिल पितांबर वाघ, जळगाव, (अपक्ष )04 असे एकूण 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत.

 अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

000000

Tuesday, 16 April 2024

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन











जळगाव दि.16(जिमाका) :- जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध हे दयाळूपणाचे द्या. प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा. त्यांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नाते निर्माण करा. हेच सूत्र आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनवणार असल्याने महाविद्यलयातून बाहेर पडताना हा विचार नेहमीच डोक्यात असू द्या असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे  महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 

      जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला. यावेळी आपल्या व्हिडीओ संदेशात महामहीम राज्यपाल रमेश बैस बोलत होते.

     यावेळी दृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.  मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.

     विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  सांगितले की, आयुष्यात नक्कीच आपल्याला आपली ध्येय गाठायची आहेत. मात्र ही ध्येय गाठताना आपला विवेक शाबूत ठेवून व उत्कृष्ट माणूस म्हणून आपली समाजात प्रतिमा टिकून राहिली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्र हे आव्हानात्मक आहे. पण आपल्यामुळेच अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याचे काम होते. खरे तर ही देशसेवा आहे आणि या देशसेवेला आपण समर्पित झालो पाहिजे असे मत डॉ. कानिटकर यांनी व्यक्त केले.

       यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व रोजगाराकरिता सदिच्छा दिल्या. रुग्ण सेवा करताना डॉक्टरांना दडपण असते. मात्र समर्पित भावनेने काम करताना डॉक्टर हे रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी असतात असेही आयुष प्रसाद म्हणाले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकामध्ये अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी प्रथम बॅचचा आढावा घेऊन, ही बॅच यशस्वीरित्या निपुण वैद्यकीय कौशल्य घेऊन आता सामाजिक क्षेत्रात जाणार असल्याबाबत अभिमान व्यक्त केला.  रुग्णसेवा करताना सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांनी जपावी असेही त्यांनी आवाहन केले.

यानंतर यशस्वी सर्व  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांना निस्वार्थी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचा लोगो असलेले टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. अब्दुल राफे आणि डॉ. आस्था गणेरीवाल यांनी केले. तर आभार डॉ. विजय गायकवाड यांनी मानले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक या हृद्य सोहळ्याला पाहण्यासाठी देशभरातून आलेले होते. यावेळी महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी,परिचारिका आदी उपस्थित होते. सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

00000