Tuesday, 28 February 2023

लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमावर कार्यशाळा संपन्न

 

        जळगाव, दि. 28 (जिमाका) - महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (Protection of Child Sexual Offences Act 2012) (POCSO) वर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे संपन्न झाली.

            महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर व सौ. सायली पालखेडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्दिष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या मनोगतात POCSO कायद्यासंदर्भातील सर्व बाबी समजून घ्याव्यात. कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी व समस्या दूर करून घ्याव्यात व प्रभावी कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

            कार्यशाळेच्या सुरुवातीला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य व बालकांच्या विषयाबाबत तज्ञ असलेले संजय सेंगर यांनी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे कायद्याच्या सर्व तरतुदी तसेच पोलीस विभाग व इतर यंत्रणा यांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कार्य करतांना येणाऱ्या अडचणी व सदर कायद्याच्या तांत्रिक बाबी अतिशय सोप्या शब्दात  समजून सांगितल्या. प्रशिक्षण सत्राच्या शेवटी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका व समस्यांचे निरसन केले. या कायद्याशी संबंधित असलेले मार्गदर्शनपर पीपीटी व इतर संदर्भ साहित्य सर्वांना उपलब्ध करून दिले.

        बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. देवयानी गोविंदवार व सदस्य संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बालकांचे योग्य पुनर्वसन करताना पोलीस यंत्रणा, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील बालगृहातील अधिकारी/कर्मचारी तसेच चाईल्ड लाईन व समतोल संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे सहकार्य व समन्वय मिळत असल्याचे सांगितले. पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अधीक्षिका सौ. जयश्री पाटील, मुलींचे बालगृह व परिविक्षा अधिकारी सौ. सारिका मेतकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी मानले.

        लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कायद्यातील तांत्रिक बाबी व तरतुदींच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यास्तरावर कार्यरत बाल कल्याण समिती तसेच बाल न्याय मंडळ यांचे सदस्य, विशेष बाल पोलीस पथक, सर्व बाल कल्याण पोलीस अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, अधीक्षक आर.पी. पाटील, परीविक्षा अधिकारी महेंद्र पाटील व इतर अधिकारी/कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी, बालगृह/निरीक्षणगृहातील सर्व अधीक्षक व कर्मचारी, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या एकदिवसीय कार्यशाळेस उपस्थित होते.

00000

Friday, 24 February 2023

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 करिता प्रवेशिकांना 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 नाशिक, दि.२४ फेब्रुवारी, २०२३ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 च्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

                                                                           ००००

Thursday, 23 February 2023

खरेदीदार-विक्रेता संमेलनात जिल्ह्यात 68 सामंजस्य करार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाकूर यांची माहिती

      जळगाव, (जिमाका) दि. 23 - प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक / महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा, खाजगी उद्योग व अन्न प्रक्रिया एस.पी.व्ही इ. च्या उत्पादनांच्या प्रचार, प्रसिध्दीसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत खरेदीदार-विक्रेता (Buyer-Seller Meet) संमेलनाचे खासदार उन्मेष पाटील यांचे अध्यक्षतेखाली व अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत 20 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

          या खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यातील प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभाची, भागीदार संस्था, युवक महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयंसहाय्यता गट, पुरस्कार प्राप्त शेतकरी/प्रगतशील शेतकरी व मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले.  तद्नंतर तृणधान्यामध्ये विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा/गटांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी उपस्थित सर्वांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग अंतर्गत खरेदीदार-विक्रेताबाबत महत्व, उत्पादन, विपणन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. उद्योजकांनी खरेदीदार-कृषि उत्पादनाबाबत अटी व शर्ती व आवश्यक त्या माहितीमाहिती सविस्तर माहिती दिली.

          प्रकल्प संचालक (आत्मा-2) कुर्बान तडवी यांनी स्मार्ट योजनेच्या खरेदी-विक्री कार्यप्रणाली मधील महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आत्मा योजनेच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध खरेदीदारांसोबत 9 नविन सामंजस्य करार करण्यात आले. तसेच या वर्षात झालेल्या विविध सामंजस्य करारातून विविध खरेदीदारांनी खरेदी केलेल्या शेतमालाचे 15 धनादेश वितरण शेतकरी/ गटाना खासदार उन्मेष पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यात एकूण 68 सामंजस्य करार करण्यात आले. खासदार श्री. पाटील यांनी उपस्थितांना खरेदीदार व शेतक-यांना एकमेकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा व खरेदीदार विक्रेताबाबत महत्व, उत्पादन, विपणन व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्प विशेषज्ञ (पोक्रा) संजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

                               00000

Wednesday, 22 February 2023

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





 जळगाव, दि. 23 (जिमाका) – संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार (सामान्य) सुरेश थोरात, नायब तहसिलदार (महसुल) अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.

०००००

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

   जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने यांनी त्यांच्याकडील माहे 31 डिसेंबर, 2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र सादर/अद्ययावत करणे बंधनकारक आहे. याअनुषंगाने माहे 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता (Employer) या मथळयावर क्लिक करुन आपल्या नियोक्ता लॉग-इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी कळविले आहे.

00000

Tuesday, 21 February 2023

नाशिक विभागात लोकसहभागातून 6 हजार 134 बंधारे पूर्ण, 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली येणार

 नाशिक, दि. 21 फेब्रुवारी, 2023 (विमाका वृत्तसेवा): पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील  पिकासाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते.  तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला,कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1227 टी.सी.एम.जलसाठा अडविला असून  12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. एका वनराई बंधाऱ्याद्वारे सरसरी 2 हेक्टर क्षेत्राला संरक्षित  सिंचन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे  विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी तथा विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली 

नाशिक विभाग राज्यात प्रथम 

विभागात आजपर्यंत नाशिक 3 हजार 755, धुळे 608, नंदूरबार 1 हजार 340, जळगाव 431 असे एकूण 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत.  राज्यात नाशिक कृषि विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

                                                                   0000000

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी स्थानीक सुट्या जाहीर

      जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर, 2022 च्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सन 2023 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) तीन स्थानिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.  

  जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी सोमवार दिनांक 6 मार्च, 2023 रोजी  होळी निमित्ताने, बुधवार, दिनांक 30 ऑगस्ट, 2023 रोजी रक्षाबंधन व सोमवार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2023 रोजी दिवाळीचा दुसरा दिवस याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                            00000

Monday, 20 February 2023

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास 2 मार्चपर्यंत मुदतवाढ

   जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी, 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च, 2023 हा राहिल. 

  दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.aharashtra.gov.in  या संकेतस्थळावर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.gov.in या व http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य उपलब्ध होतील. 

  प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 2 मार्च, 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 2 मार्च, 2023 पर्यंत पाठवावे. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. 

  लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाप्यावर/ पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असेही सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

चोपडा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 28 फेब्रुवारी रोजी होणार लिलाव

  जळगाव, दि.20 (जिमाका वृत्तसेवा) :- चोपडा तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहे. 

  या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. तथापि, संबंधित वाहन मालकांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 से 184 मधिल तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून नमुद तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातून येणारा महसूल शासनास जमा करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आले आहे. 

  त्यानुसार खालील वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया 28 फेब्रुवारी, 2023 रोजी करण्यात येईल, असे तहसीलदार, चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

  वाहन क्रमांक MBNAV53ACKCH32138, ट्रॅक्टर ट्रॉली - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचेकडील ट्रॅक्टर व ट्रॉली याचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 10 हजार रुपये. वाहन क्रमांक MH19CY4359 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19P3394 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 1 लाख 80 हजार रुपये, MH19CZ9527 (चेसीस क्र. MBNAV53ACMCD80238) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19CZ0543 ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19DV1553EK) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 5 लाख 10 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. DZVST683072S3) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 40 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. 97E3690112) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 20 हजार रुपये याप्रमाणे आहे.

00000

‘दपर्ण’कार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




           जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : आद्य मराठी पत्रकार ‘दपर्ण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, तहसिलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार अमित भोईटे यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Friday, 17 February 2023

जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार - जिल्हाधिकारी अमन मित्तल



       जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) :  येत्या 21 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या 12 वी व त्यानंतरच्या दहावीच्या परिक्षेच्यावेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून याकरीता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कॉपीमुक्त परिक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. नितिन बच्छाव यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. मित्तल म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या नाहीत. तर शाळास्तरावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी परीक्षेत कॉपी करण्याचे व कॉपी पुरवण्याचे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व विभागांकडून एकत्रीतपणे प्रयत्न केले जाणार आहेत. यास पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, माध्यमे व शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी केले.

          हे अभियान राबविताना परीक्षा केंद्राचे अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात येणार असून कॉपीचे प्रकार होणा-या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक परिक्षा केंद्रावर बैठे पथक तसेच भरारी पथकही नियुक्त केले जाणार आहेत.  शिवाय ठराविक पेपरच्या दिवशी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हेही परिक्षा काळात विविध परिक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची झडतीही घेतली जाणार आहेत. गोपनीय परिक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर जास्त कॉपीचे प्रकार घडतील त्या परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकांवर कारवाई करण्यात येणार आहेत, जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहेत. या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्याठिकाणी पोलीस व इतर पथक पोहचणार आहेत. परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशास बंदी राहणार असून परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्हीचीही नजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 12 संवदेनशील परिक्षा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.

          परिक्षेत कॉपी करणारे व पुरविणारे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी पोलीसांबरोबरच होमगार्डही कार्यरत राहणार आहेत. असे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितले.

          जळगाव जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 76 परीक्षा केंद्रावर 47 हजार 370 तर दहावीच्या परीक्षेसाठी 138 परीक्षा केंद्रावर 56 हजार 865 विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्री.  बच्छाव यांनी सांगितले.

          परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच पालकांनीही कोणी पास करुन देतो अशा भूलथापा देत असल्यास त्यांना बळी पडू नये. कोणी याप्रकारच्या भूलथापा दिल्यास याबाबत त्वरीत प्रशासनास कळवावे व जिल्हा प्रशासनाच्या या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी केले.

00000


Thursday, 16 February 2023

रोजगार वाढीसाठी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार - उद्योगमंत्री उदय सामंत

 






          जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून जळगाव जिल्ह्यातही उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात आयोजित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर आणि जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, उद्योजकता परिषदेचे सुधाकर देशमुख, संदीप भोळे, किरण बच्छाव, उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील, संगिता पाटील आदि उपस्थित होते.

          मंत्री सामंत पुढे म्हणाले की, उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून उद्योजकांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक एम.आय.डी.सी मध्ये स्वत:चे फायर स्टेशनबरोबरच कामगार रुग्णालय उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात नवीन 5 ठिकाणी एम.आय.डी.सी उभारण्यात येवून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य राहील. जिल्ह्यात केळीपासून धागा व कपडा निर्मिती करणारे उद्योग सुरु करण्याची तयारी काही उद्योजकांनी दर्शविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लहान, मोठे उद्योजक, व्यापारी तसेच समाजातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित काम केल्यास जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असेही ते म्हणाले.

          आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, ललीत गांधी, महेंद्र रायसोनी यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना व उद्योगांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींचा उहापोह केला. या अडचणी सोडविण्याची मागणीही त्यांनी केली. शेवटी आभार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी यांना मानले.

                                                            00000

 


जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

 




















          जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात दिले.

          जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पूलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा मंत्री व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, श्रीमती लताताई सोनवणे, माजी आमदार स्मीताताई वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह शासकीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

          मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू माणून हे सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य सरकार प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सरकारने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पा मध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वाना वरदान ठरणारा आहेत. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगरी, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव  जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

          यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून  नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहरात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

          ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहे. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभगााच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

* भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)

*  शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. *  मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.

* म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी.

* जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपूजन- रु. 42 कोटी.

*  बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.

*  धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.

*  जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

*  धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

                                                           00000


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

 

          जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेही होते.

जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील आदि उपस्थित होते.

00000


तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

   जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन घेण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार, 20 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या आयोजन करण्यात आले आहे.

  तरी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेवून तालुकास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमात आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Wednesday, 15 February 2023

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

    जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :-  रेल्वे स्टेशन, भुसावळ मेन बुकींग, मुसाफिर खानाचे उत्तर बाजुस असलेल्या पायरीच्या दादऱ्याखाली झुडूपामध्ये निराधार अवस्थेमध्ये बालीका आढळुन आली आहे. कु. दामिनी या बालिकेचे वय अंदाजे 5 ते 7 दिवस आहे. या बालिकेस रेल्वे पोलिस, भुसावळ यांनी ताब्यात घेवून प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले आहे. त्यानंतर या बालिकेस अध्यक्ष/सदस्य, बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशाने भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद या शिशुगृहात पुर्नवसनाकरीता दाखल करण्यात आले आहे. 

  बालिका दाखल झाल्यापासून ते आजतागायत बालकाचे कोणी आई, वडिल, नातेवाईक भेटीस आले नाही त्याविषयी कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. तरी मुलगी कु. दामिनी बालिकेचे पालक, नातेवाईक ओळखत असलेले व्यक्तींना माहिती होणेबाबत कुटूंबाचा शोध घेणेबाबत तसेच पुढील पुर्नवसनाची प्रक्रिया सुलभ होणेसाठी 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, जळगाव फोन न 0257-2239851, भारतीय समाज सेवा केंद्र व बाल कल्याण समिती, औरंगाबाद फो.न 0240-2381473,2453922 तसेच पोलिस निरीक्षक, भुसावळ 0258-2222200 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव फोन 0257-2228825 येथे सर्पक साधावा. 

  या बालिकेचे कोणी पालक, नातेवाईक यांनी ताबा घेण्यास अथवा संपर्क न केल्यास   अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने बालिकेच्या पुढील पुर्नवसनाची प्रक्रिया करण्यात येईल. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष योगेश एस मुक्कावार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जळगावात जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा संसद चे आयोजन

    जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र, जळगाव व जिल्हा प्रशासन, जळगाव व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा आणि जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा आयोजन KCE’s IMR College, Jalgaon मध्ये दि. 17 फेब्रुवारी, 2023 रोजी केवळ नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी केले जाणार आहे. 

  सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे जिल्ह्यामधील सर्व युवकांसाठी खुले आहे. अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र, गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, 425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल : qnykjalgaon@gmail.com वर कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जळगाव नरेंद्र डागर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

   जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 फेब्रुवारी, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

  गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2.30 मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. 

  दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व पुढीलप्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण 1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. 2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख. 3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी. 4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी. 5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी. 6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी. 8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. 9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

  सायंकाळी 5.15 वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.55 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे आगमन. सायंकाळी 6.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा. सायंकाळी 7.30 वाजता राखीव, रात्री 8.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

                                                                  00000

जळगावात 20 फेब्रुवारी रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन

  जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :-  प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक/महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा, खाजगी उद्योग व अन्न प्रक्रिया एस.पी.व्ही. इ. च्या उत्पादनांच्या प्रचार प्रसिध्दीसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत (Buyer-Seller Meet) ही बाब राबविण्यात येत आहे.

  त्याअनुषंगाने खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, 20 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयं सहाय्यता गट, पुरस्कार प्राप्त शेतकरी/प्रगतशील शेतकरी व मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत लाभ घेतलेले लाभार्थी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फै अभिवादन

 



  जळगाव, दि. 15 (जिमाका) :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

  याप्रंगी तहसिलदार (सामान्य) सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईटे यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                     00000

Tuesday, 14 February 2023

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मंगळवार 14 फेब्रुवारी 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

 •          राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग)

          धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ

 (अन्न व नागरी पुरवठा विभाग)

• डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत

(सार्वजनिक आरोग्य विभाग)

• पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

(जलसंपदा विभाग)

• पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा.

जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.

सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा

• राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन.  राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव

00000000

आशियाई पाणपक्षी गणनेत 149 पक्षी प्रजातींची नोंद




          जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) :- वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर व चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हतनुर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना 12 फेब्रुवारी, 2023 रोजी पार पडली. या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर कृपाली शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, शिल्पा गाडगीळ, उदय चौधरी, सौरभ महाजन, सत्यपालसिंग, समीर नेने, संजय नेने, राहुल चव्हाण, पार्थ बऱ्हाडे यांचेसह 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला असे उपवनसंरक्षक श्री. होशिंग यांनी कळविले आहे.

          उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या पाणपक्षी गणनेच्या दिवशी 149 पक्षी प्रजाती आढळून आल्या. त्यामध्ये हतनूर धरणाचे मानचिन्ह असलेले मोठी लालसरी, त्याचप्रमाणे वारकरी, वैष्णव, तलवार बदक, शेंडी बदक, भिवई बदक, दलदली हरीण पक्षी, ठिपकेदार होला इ. पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून आले.

          चांगदेव, खामखेडी, मेहून, चिंचोल, हतनूर, तांदलवाडी या 5 ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमधून भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्थलांतरित देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला गेला. देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची मोठी संख्या पाहता हतनूर धरण जलाशयास 'महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र' (IBA) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

                00000