Friday, 31 March 2023

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 एप्रिल रोजी आयोजन

  जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 3 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

        

तरी जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                                      00000

Wednesday, 29 March 2023

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

          जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

          शासनाने शिवछत्रपती पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21, व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून घ्यावा. व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सदर करावा.

          शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 मार्च, 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्या-या खेळाडूंनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

परिवहन विभागाच्या 14 फेसलेस सेवा नागरीकांना घरबसल्या मिळणार

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाने परिवहन विभागाच्या एकूण 58 सेवा फेसलेस पध्दतीने नागरिकांना देणेबाबत निर्देश दिले आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव कार्यालयात एकूण 14 फेसलेस सेवा कार्यान्वीत झाल्या असल्याची माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

          वाहन 4.0 संगणकीय प्रणालीवरील देण्यात येत असलेल्या फेसलेस सेवा - डिलर पॉईट नोंदणी, ना-हरकत प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्रामधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, तात्पुरती वाहन नोंदणी सेवा, वाहनावरील कर्ज बोजा रद्द करणे,  वाहन मालकीचे हस्तांतरण या सात सेवा देण्यात येत आहेत. तर सारथी 4.0 संगणकीय प्रणालीवरील देण्यात येत असलेल्या फेसलेस सेवा- शिकाउ अनुज्ञप्ती, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहन चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे या सात सेवा देण्यात येत आहे.

          या वाहन विषयक फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी www.Parivahan.gov.in या संकेत स्थळावर भेट देवून ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी क्लिक करून वाहन संबंधित सेवा हा पर्याय निवडावा. तर सारथी विषयक फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी www.Parivahan.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी क्लिक करून अनुज्ञप्ती संबंधित सेवा हा पर्याय निवडावा. या फेसलेस सेवांसाठी आता नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. या सेवांचा नागरिकांनी घरबसल्या संगणक/मोबाईलचा वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. लोही यांनी केले आहे.

00000

मुंबई येथे 31 मार्चला विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळण्यासाठी मुंबई येथे 31 मार्च, 2023 रोजी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

          विभागीय हातमाग कापड स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार व तृतीय 15 हजारांचे बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता हातमाग कापडाचे नमूने प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोट हाऊस, 5 वा मजला, 128- ब पुना स्ट्रीट मस्जीद (पूर्व) 400009 Email- rddtextiles3mumbai@rediffmail.com दूरध्वनी क्रमांक 022-23700611 या कार्यालयात 31 मार्च, 2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पाठवावेत.

          नमुन्यावर संपूर्ण नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धागेचा प्रकार, डिझाईन, रंग व कापडाची विशेषात: अशा प्रकार कापडाचे विवरण किंमतीसही देणे आवश्यक राहील. वेळेनंतर आलेले नमुने स्विकारले जाणार नाही. विभागीय हातमाग कापड स्पर्धां प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, येथे 31 मार्च, 2023 रोजी दूपारी 1 वाजता होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Tuesday, 28 March 2023

जळगावात 29 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील  सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी 29 मार्च, 2023 रोजी एक दिवसाच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील कंपन्यानी या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकाराची 129 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

 या मेळाव्याचा 10 वी नापास/पास, 12 वी पास, आय. टी. आय पदवीका व पदवीधारक ईच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा. विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी नांव नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अप्लाय करावा. तसेच ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा.  

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

निवृत्तीवेतन धारकांचे वेतन 6 एप्रिलपर्यंत होणार

 जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- माहे मार्च, 2023 अखेरची कामे चालू असल्याने तसेच एप्रिल -2023 च्या सुरुवातीला सार्वजनिक सुट्टया असल्याने जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या वेतनास 6 एप्रिलपर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांचा आयकर कपात माहे एप्रिल -2023 पासून नियमित करण्यात येणार असल्याने सर्व निवृत्तीवेतन धारकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सु. ह. गुंजाळ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. 

                                                                     ०००००

Monday, 27 March 2023

परदेशात नोकरी मिळविण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :- उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 27 मार्च, ते 26 मे, 2023 या दरम्यान एनएसडीसीमार्फत आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये (JOB FAIR) सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर ऑनलाईने नोंदणी करावी. असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

          तसेच आस्थापना/कंपन्या, उद्योजक यांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ या लिंकवर नोंदणी करावी.

          भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार तसेच कंपन्या, उद्योजक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असेही श्री. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी 15 एप्रिल 2023 पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे

          धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज या मध्यम प्रकल्पांसह 12 मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे 22 व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्पासह एकूण तीन मध्यम प्रकल्प, 33 लघुप्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधारे, 20 वळण बंधाऱ्यांसह एकूण 62 तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 1 मार्च 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत एक मार्च 2023 पासून सुरू झालेल्या उन्हाळी हंगाम 2022- 23 मध्ये  भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना उन्हाळी हंगामाच्या पिकांना व बिगर सिंचनाचे पाणी वगळून उर्वरित पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          त्यानुसार बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल 2023 पर्यंत देण्याचे करावे.

          पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा दहा टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे, विहीरीवरील पिकास कालत्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

          टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेला आहे. आरक्षित पाणीसाठी वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधित उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

Friday, 24 March 2023

कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

      जळगाव, दि. 24  (जिमाका वृत्तसेवा) :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता   1 एप्रिल,2022 ते 15 जुलै, 2022 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

                प्रवेशासाठी अटी :-

                उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा,

                वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स,  दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला  इ. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष 10 ते 2 वाजेपर्यंत सपर्क साधावा,

तसेच  प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल,           संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक – 02584-251906, भ्रमणध्वनी क्रमांक – 8668817893   असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.जा. मुकणे रावेर, यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.                                                                              0000000

Tuesday, 21 March 2023

जळगावात 24 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

       जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करीअर सेंटर (एमसीसी) तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे 24 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण 245 रिक्तपदांची मागणी कळविली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास, आयटिआय पास, डिप्लोमाधारक, पदवीधर (ग्रॅज्युएट) पदव्युत्तर अशी आहे.

          या मेळाव्यास येताना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी देखिल शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे. आणि नाव नोंदणी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर करुन घ्यावी. नांवनोदणी केलेल्या किंवा नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना प्राप्त झालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा लाभ देखील उमेदवारांना घेता येतो.

          तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन

           जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : सन 2022-23  मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे विद्यार्थी आणि सन 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने समितीला सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त राकेश महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

          एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट व्दितीय वर्षाला प्रवेशात्सुक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.

          जात प्रमाणपत्र पडताळणी कशासाठी? मागासवर्गीय विद्याथ्यांना शिक्षण नोकरीत आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करावी लागते. त्यासाठी हे प्रमाणपत्र द्यावे लागते. 

          प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपतेय सन 2022-23 मध्ये आकरावीत व बारावीत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिंग आदी प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुध्दा त्वरीत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.

          प्रस्ताव लवकर सादर करावे जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत झाली असून, अर्जदार जात प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर पडताळणीचा शासकीय (www.bartievalidity.maharashtra.gov.in) जावून ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करु शकतो. त्यामुळे संबंधीत अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाइन भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे लवकरात लवकर सादर करावा.

          कागदपत्र काय लागतात अर्जदार, अर्जदाराचे वडील, आजोबा व पंजोबा यांचे शालेय दाखले किंवा जन्म नोंदी, मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे, अर्जदार शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड, शिफारस पत्र, व नमुना-3 व नमुना 17 प्रतिज्ञापत्र हे सर्व कागदपत्रांचा एक बंच करून त्यांचा ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरावाच हार्ड कॉपी राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव या समिती कार्यालयात सादर करावे. असे राकेश महाजन, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 24 मार्चपासून महोत्सवाचे आयोजन नागरीकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

        जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, जळगावमार्फत बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत यशोदाई हॉल, रिंग रोड, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलयामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

          या प्रदर्शनाचे उद्घाटन 24 मार्च, 2023 रोजी दु. 3.00 वा. खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया असतील. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक (आत्मा) कुर्बान तडवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ वनिता सोनगत, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मनोहर चौधरी, संदीप मराठे, विभागीय संसाधन व्यक्ती, माविम, नाशिक विभाग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

          नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिलांमध्ये विक्री कौशल्य विकसित व्हावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रदर्शनात बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी असतील तसेच त्यामध्ये PMFME अंतर्गत व इतर योजनांमधील गटांना स्टॉल देण्यात येणार आहे. प्रदर्शनात खान्देशी मसाले, विविध प्रकारचे तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, गारमेंट, हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर तृणधान्याचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणीयुक्त पदार्थ, राजगिरा यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे. प्रदर्शनात आरोग्य विषयक माहिती सुद्धा देण्यात येणार असून सांस्कृतिक व जाणीव जागृतीचे कार्यक्रम होणार आहे.

          तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून बचत गटामार्फत निर्मित शुद्ध व दर्जेदार उत्पादन खरेदीचा आनंद घ्यावा. असे आवाहन व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलय, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

00000

Monday, 13 March 2023

रोजगार मेळाव्यात 699 उमेदवारांची झाली प्राथमिक निवड

         जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 11 मार्च, 2023 रोजी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी, जळगाव व प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर यांचे प्रमुख उपस्थितीत पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला.

            या मेळाव्यात एकूण दहा औद्योगिक/खाजगी आस्थापनांनी १० वी पास/ १२ वी पास, आयटिआय., डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. या मेळाव्याचा एकूण 715 उमेदवारांनी लाभ घेतला. विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्यात. त्यापैकी एकूण 699 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून अंतिम निवडीची कार्यवाही उद्योजकांचे स्तरावर सुरु आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Friday, 10 March 2023

स्वाधार योजनेसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवु शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १० व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयात व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलामुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

            सन २०२२-२३ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च, २०२३ आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

            पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.

            जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम - भोजन भत्ता - २५०००/-, निवास भत्ता-१२०००/-, निर्वाह भत्ता- ६०००/- असे एकुण-४३०००/-,  आहे. या रक्कमेव्यतिरीक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी रुपये ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.

            या योजनेचे निकष- विद्यार्थी हा अनु. जाती व नवबौद्ध घटकांतील असावा. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच जळगाव महानगर पालिका हद्दीपासुन ५ कि.मी. परीसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थाच्या पालकांचे वार्षीक उत्पन्न रु.२.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी करीता प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण (अनु. जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांगाकरीता ४० टक्के) घेऊन उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

            अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव, मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड, जळगांव येथे उपलब्ध होईल. स्वाधार योजने अंतर्गत लाभासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण अर्ज भरून सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगांव येथे दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

 

            जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) जळगाव प्रकल्पांतर्गत जळगाव शहरामध्ये साईबाबा मंदिर, मेहरुण येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

            क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवातीस स्वागतगीत व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महिला दिन शपथ व बेटी बचाओ, बेटी पढाओ शपथ घेण्यात आली. बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे हस्ते माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. क्रीडा अधिकारी श्रीमती गुल्हाणे यांनी क्रीडाविषयक माहिती दिली.

            जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी महिलांसाठीच्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती सांगितली. योगमार्गदर्शिका श्रीमती अनिता पाटील यांनी योग विषयक माहिती सांगुन योग प्रात्यक्षिक घेतले. श्री बी.बी.पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयीची माहिती दिली. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महिला दिनाविषयी मार्गदर्शन करुन सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमामध्ये जागतिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्याच्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन लावण्यात आले होते. महिलांच्या संगीत खुर्ची, रस्सी खेच, लिंबु चमचा स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत अभिनय गीत सादर केले.

            कार्यक्रमास प्रमुखपाहुणे म्हणुन नगरसेवक श्री. नाईक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, क्रिडा अधिकारी श्रीमती गुल्हाणे, क्रिडा मार्गदर्शक श्री.राजेंद्र चव्हाण, योगमार्गदर्शिका श्रीमती अनिता पाटील, कृषी विभागाचे मार्गदर्शक श्री.बी.बी. पाटील, श्रीमती मेतकर, परिविक्षा अधिकारी श्री. महेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षिका श्रीमती आर.जी.चौधरी, श्रीमती एस.वाय. सोनवणे, श्रीमती पी. आर.तडवी, श्रीमती एच.एस. पाटील यांचेसह सर्व सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्रीमती आर. जी. चौधरी यांनी तर आभार श्रीमती. एस.वाय.सोनवणे यांनी मानले.

00000

जळगावात 11 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

            जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे ११ मार्च, २०२३ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे सकाळी १०.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

            या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण २०५९ रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी पास, आयटीआय., डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

            मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नांवनोंदणी न केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर त्वरीत नावनोंदणी करुन घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येईल.

            तरी या मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा  असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केलेले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या. ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा.असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत.

00000

रावेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार

  

            जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, ता. रावेर, जि. जळगाव या संस्थेत तासिका तत्वावर गणित/चित्रकला निदेशक व शिल्पनिदेशक संधाता या व्यवसायाकरिता जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी 15 मार्च, 2023 पर्यत अर्ज करावेत.

            याकरिता शैक्षणिक पात्रता याप्रमाणे-गणित/चित्रकला निदेशक- बी.ई. मेकॅनिक/कॉम्प्युटर व एक वर्ष शिकवण्याचा अनुभव. शिल्पनिदेशक संधाता- आय.टी.आय उत्तीर्ण, ॲप्रेटिसशिप एक वर्षाचा अनुभव. मानधन 14 हजार 400 च्या आत मिळेल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

पाचोरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याचा 15 मार्च रोजी लिलाव

             जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा, जि. जळगाव येथील निर्लेखित साहित्याची 15 मार्च, 2023 रोजी जाहिर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खरेदीदार यांना साहित्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुना सारोळा रोड, पाचोरा येथे लिलावाच्या दिवशी प्रत्यक्ष पाहता येईल. महत्तम बोली बोलणाऱ्यास साहित्य खरेदी करता येईल. लिलाव दुपारी 1.00 वाजता होईल. अधिक माहितीसाठी 8788323131 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Saturday, 4 March 2023

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यात 40 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

 







             जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या 40 कोटी रुपयांच्या 901 कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांना वितरीत करण्यात आले.

            येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले शासकीय प्रशिक्षण संस्था, नागपूर यांनी आयोजित केलेल्या निंबध स्पर्धेत सन २०२०-२१ मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळवून कु. माधुरी सुनिल पाटील यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर संविधान दिनानिमित्त महाज्योती, नागपूर यांनी आयोजित केलेल्या राज्य निबंध स्पर्धेत भाग घेतला व त्यात राज्यातून तृतीय क्रमांक मिळविला आहे त्यांना त्यांचे बँक खात्यात रोख स्वरुपात ३० हजार व सन्मानचिन्ह महाज्योती, नागपूर यांचे कडून देण्यात आले. त्याचे वाटप आज करण्यात आले.

            त्याचबरोबर इ. १० वीच्या परीक्षेत ६०% पेक्षा जास्त मार्क मिळवून उतीर्ण झालेले व पुढील वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण असे घेता यावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७९४ विद्यार्थांना टॅब (टॅबलेट संच) प्राप्त झाले आहेत. त्यातील कु. आंकाक्षा साहेबराव पाटील, चि. पराग गणेश पाटील, चि.वेन्दात विनोद पाटील यास महाज्योती कडून प्राप्त 3 विद्यार्थ्याना प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री यांचे हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदि उपस्थित होते.

00000

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जळगावात 11 ते 15 मार्च दरम्यान आयोजन स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन करावे - क्रीडामंत्री गिरीष महाजन

 




 

            जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव  जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्यात. 

            छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 दरम्यान सागरपार्क मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, शाम कोगटा, नितीन बरडे, डॉ प्रदिप तळवेलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            क्रीडामंत्री पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला कबड्डीची चांगली परंपरा आहे. जिल्ह्यातील कबड्डीपट्टूनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.

            छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 या कालावधीत सागरपार्क मैदान येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धांसाठी राज्यातील विविध जिल्ह्याचे पुरुषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण बत्तीस संघ सहभागी होणार आहे. या संघामध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघातील 12 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 14 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 384 कबड्डीपट्टू, 100 सरपंच, पंच व पदाधिकारी, अधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 550 जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सागरपार्क मैदानावर चार  कबड्डीचे मैदान तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला 1 लाख 50 हजार रुपयांचे तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी व इतर संघानाही बक्षिसे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी सागरपार्क मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी बैठकीत दिली.

            या स्पर्धेच्या आयोजनासाठी जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत खासदार श्री. पाटील, आमदार श्री. पाटील, भोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडामंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

00000

शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 



            जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

        शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना जळगव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आज या चित्ररथांना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व्हावी, याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण व विशेष घटक योजनेतून या चित्ररथांची निर्मिती केली आहे.

        या चित्ररथांचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्धघाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. बावीस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी फिरता चित्ररथ आणि एलईडी ही चांगली संकल्पना आहे. चित्ररथ व एलईडीच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिक सुलभपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी चित्ररथ व एलईडी चित्ररथाची संकल्पना सांगितली.

            या चित्ररथावर शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन, हर घर जल, ई-पीक पाहणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, महाराजस्व अभियान,  हिंदूह्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, महाराष्ट्र राज्यगीत, मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय निधी, माझी कन्या भाग्यश्री, सुहिता तुमच्यासाठी, महाआवास योजना, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना एसटी मध्ये मोफत प्रवास आदिंसह सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजना (घरकुल), गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे, भारत सरकार शिष्यवृत्ती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन, सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथाद्वारे व जिंगल्सद्वारे ग्रामीण भागात पोहोचवली जात आहे. हे चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील अधिकाधिक लोकवस्ती असलेल्या प्रमुख व बाजारपेठेच्या गावांमध्ये जाणार आहे.

        यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चित्ररथ, एलईडीबरोबरच कलापथके, आकाशवाणी, एफएम रेडिओवर ऑडियो जिंगल्स, व्हिडीओच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

00000