Thursday, 2 March 2023

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे

             जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात येणा-या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी 13 मार्च, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयात वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधन व साहित्य क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तीं व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरून या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्त, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे येतील. याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणार आहेत.

            तरी सन 2022-23 या वर्षांचा पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्था यांनी रितसर प्रस्ताव सादर करावेत. या पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर संबंधित शासन निर्णय उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522  असा आहे.

            तरी इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव या कार्यालयाकडे 13 मार्च 2023 पर्यंत सादर करावे. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी, असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment