जळगाव, दि. 29 - शारिरीक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असून सर्वांनी आरोग्यासाठी किमान एक तास मैदानावरील खेळासाठी दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळेत शारिरीक शिक्षण तासिकेचा उपयोग करुन घेऊन मैदानी खेळ खेळले पाहिजे. जेणेकरुन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयच्यावतीने ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यपातळीवर विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविलेल्या जिल्हयातील खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणपतीराव पोळ, अशोक चौधरी, एकलव्य पुरस्कारार्थी कु. कांचन चौधरी, प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन, जळगावचे सचिव फारुख शेख, ॲथेलिटिक्स संघटनेचे पदाधिकारी राजेश जाधव, क्रीडा अधिकारी अनिल चांदूरकर, एम. के. पाटील, श्रीमती रेखा पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, गुरुदत्त चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकरांनी व्यायामाचे महत्व विशद केले. तसेच दररोज सकाळी नियमित व्यायाम करुन निरोगी राहण्याचा सल्लाही दिला. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हयातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध खेळामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेडाळूंचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे अभिनंदन केले. तर जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी चांगल्याप्रकारे होत असल्याबद्दल कौतूक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्राविषयी माहित देऊन क्रीडा दिनाचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हयातील विविध खेळात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या 160 खेळाडूंना व क्रीडा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅटमिटन कोर्टवर बॅडमिटन खेळून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशांत जगताप, दिपक आर्डे, प्रविण पाटील, इकबाल मिर्झा, निशा गायकवाड, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरेश सानप, पंकज ठाकूर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, जिल्हास्तरावर खेळलेले खेळाडू त्यांचे कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment