Wednesday, 2 September 2020

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांसाठी ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन

         जळगांव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) - उखाणा घेणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटल तर वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेवून कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

            ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करुन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक 10 सप्टेंबर, 2020 पर्यंत पाठवावा.

उखाणे निवडीचे निकष खालीलप्रमाणे असतील

            उखाणे नाविण्यपूर्ण असावेत, त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा, उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे तरी स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. आपण सर्वसाधारणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपणाला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्याभोवती गुंफणे अपेक्षित आहे, उखाणा स्त्री पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा, उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लांब असावा. 6) उखाणा मुखोदगत/पाठ असावा,

            जिल्हयातील प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावरील परीक्षकांकडून छाननी करुन त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व माविमेत्तर महिलांचे तीप क्रमांक काढून सहा व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा सहा याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील. ज्यामधून परीक्षकांकडून छाननी करुन त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व माविमेत्तर महिलांचे तीन क्रमांक काढून सहा व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. सहा विभागांचे मिळून 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व माविमेत्तर महिलांचे तीन असे सहा क्रमांक काढले जातील. मात्र विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. राज्यस्तरीय विजेत्या सहा महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्यात येईल. याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9405200222 वर संपर्क साधावा. व्हीडीओ महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, व्दारा-पी. डी. कोळी, सर्व्हे नं. 292/293, प्लॉट नं. 21, भिकमचंद जैन नगर, यश लॉन मंगल कार्यालय मागे, पिंप्राळा रोड, जळगाव यांचेकडे पाठविण्यात यावा असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment