जळगाव, दि. १२ (जिमाका) : भारत सरकारच्या
अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत “राष्ट्रीय नमुना पाहणी ८० वी फेरी” अंतर्गत आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षण राबविले
जात आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत या पाहणीत सहभाग घेण्यात
येत असून, जळगाव जिल्ह्यात देखील हे सर्वेक्षण होणार आहे.
या
पाहणीअंतर्गत राज्यातील नमुना तत्वावर निवड करण्यात आलेल्या कुटुंबांकडून मागील ३६५
दिवसांत झालेल्या आरोग्यविषयक व देशांतर्गत पर्यटन खर्चासंबंधी सविस्तर माहिती संकलित
केली जाणार आहे. या सर्वेक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शासकीय व खाजगी रुग्णालये
व दवाखान्यांतून मिळालेल्या उपचारांवरील खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेल्या
सुविधा याबाबत माहिती गोळा करणे होय.
सदर
सर्वेक्षणासाठी अशा कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे ज्यांच्याकडे एक वर्ष किंवा
त्याहून कमी वयाचे मूल आहे, अथवा ज्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मागील ३६५ दिवसांमध्ये
रुग्णालयात दाखल झाली आहे. संकलित माहितीच्या आधारे राज्यातील लोकसंख्येसंदर्भातील
विविध अंदाज बांधले जातील, जे शासनाच्या आरोग्य धोरण आखणी व अंमलबजावणीस उपयुक्त ठरणार
आहेत.
सर्वेक्षणाच्या
प्रक्रियेत नियुक्त अधिकारी/कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या सर्वेक्षणाची
वस्तुनिष्ठता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, आरोग्य विषयक खर्चाची योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी
सर्व नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक श्री.
मनोहर चौधरी यांनी केले आहे.
००००००००००००
No comments:
Post a Comment