Friday, 21 April 2023

समाजकल्याण विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

जळगाव, दिनांक 21 (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 1 एप्रिल ते 1 मे, 2023 या कालावधीत राज्यभरात सामाजिक न्याय पर्व उपक्रम साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगांव व इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगांव येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.  

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. यावेळी शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक, रामानंदनगर पोलीस स्टेशन, जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रक्तदानाचे महत्व सांगून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. या शिबिरात 18 पुरुष व 2 महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.  

यावेळी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक चेतन चौधरी यांनी तर आभार श्रीमती वैशाली पाटील, गुरुयान, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह, जळगांव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे, गृहपाल श्रीमती शाली पाटील, गृहपाल एस. आर. पाटील, बाळू बोरसे, दिपक सोनवणे, तालुका समन्वयक यांचेसह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. असे सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                000000

No comments:

Post a Comment