Monday, 10 April 2023

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत समान संधी केंद्र व जातपडताळणीबाबत कार्यशाळा संपन्न

 

            जळगाव, दि.10 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात 1 एप्रिल ते 1 मे, 2023 पर्यंत सामाजिक न्याय पर्व उपक्रम साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे नशामुक्त भारत अभियानातंर्गत, शिष्यवृत्ती योजनांची माहिती समान संधी केंद्राची एकदिवशीय कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली. तसेच जिल्हा जातपडताळणी समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

            याप्रसंगी मंचावर उपायुक्त, जिल्हा जातपडताळणी समिती, जळगाव राकेश महाजन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, योगेश पाटील, संशोधन अधिकारी, जिल्हा जातपडताळणी समिती, जळगाव बी. यू. खरे तसेच जिल्हाभरातील विविध महाविद्यालयातील प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय पर्व अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देऊन व्यसनमुक्त समाज निर्माण होण्यासाठी तसेच विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वास चालना मिळावी या हेतूने समान संधी केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

            उपायुक्त, जिल्हा जातपडताळणी समिती, जळगाव राकेश महाजन यांनी आपल्या मनोगतात जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी असलेली प्रक्रिया, आवश्यक बाबी व कामात गतीशीलता येण्यासंदर्भात समिती राबवित असलेले विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बी. यु. खरे, संशोधन अधिकारी, जिल्हा जातपडताळणी समिती, जळगाव यांनी उपस्थित महाविद्यालयीन प्रतिनिधी यांना जात वैधता प्रमाणपत्राच्याबाबतीत विद्यार्थ्यांना येणा-या विविध अडचणीबाबत प्रश्नोत्तर स्वरुपात चर्चा करून समस्येचे निरसन केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी तर आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक शशांक जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयाचे तसेच जिल्हा जातपडताळणी कार्यालयाचे कर्मचारी, तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment