Tuesday, 4 January 2022

कृषी कर्ज प्रक्रिया उद्योगासाठी 18 जानेवारीपर्यंत कर्ज मंजूर पंधरवड्याचे आयोजन

         जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना   (PMFME) सन 2020-21-ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के व कमाल रुपये 10 लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी केळी पिकावर नवीन प्रक्रिया करुन उत्पादन घेणे किंवा सध्या कार्यरत असलेल्या कृषी अन्न प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तरासाठी प्रकल्प पात्र असतील, वैयक्तिक लाभार्थ्यांचा जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एकूण 15 प्राप्त आहेत. त्यात सर्वसाधारण 14 व अनुसूचित जाती 1 अशा प्रकारे देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने विकसित  केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन 18 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशासाठी 3 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

                या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ / शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था / स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहनांना (S.P.V) ब्रँडिंग व मार्केटिंग या घटकांतर्गत कच्चा मालाची खरेदी ते विक्री पर्यंत टप्प्या- टप्प्याने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील, महत्वाचा नियंत्रणाच्य बाबी गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम, सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविण्याचा तपशील असणे अपेक्षित असून प्रस्ताव सादर करण्यासाठी सदर घटकाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील. त्यात अंदाजे रक्कम रुपये 50 लाख पर्यंतचा प्रस्ताव अपेक्षित आहे.

                या योजनेंतर्गत सामाईक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघ / सहाकरी उद्योजक संघ/ सहकारी उत्पादक संस्था / शासन यंत्रणा/ खासगी उद्योग आदी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा जसे शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडिंग, कोठार आणि कोल्ड स्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा इत्यादिसाठी या घटकांतर्गत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. सदर घटकाच्या कर्जाशी निगडित 35 टक्के अनुदान देय राहील.

                या योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज सादर करण्याविषयी माहिती कृषी विभागाच्या http://pmfme.mofpl.gov.in व एम आय एस ॲप्लिकेशन  http://pmfme.mofpi.gov.in/mis/#logon या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा व आपला अर्ज सदरील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करुन त्याची टपाल पोहोच घ्यावी. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून संसाधन व्यक्तीचा संपर्क क्रमांक घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.                     

                                                                                                 000000

No comments:

Post a Comment