Sunday, 31 March 2024

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त_ मागच्या आर्थिक वर्षातील महसूल 25.10 कोटी तर यावर्षी 29.78 कोटी, 18 टक्यांनी वाढले

 

जळगाव दि. 31 (जिमाका) :- जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून 2022-23 या आर्थिक वर्षात 25 कोटी 10 लाख रुपये होता तो वाढून यावर्षी 29 कोटी 78 लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात 18 % वाढ झालेली असून सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट 28.51 कोटी पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी दिली.

    यात प्रामुख्याने नवीन अनुद्यप्ती मधून मिळणारे शुल्क, नुतनीकरण शुल्क, परदेशातून आयात मद्यावर लागणारे विशेष शुल्क आणि दंड वसुली मधून मिळालेले महसूल असल्याचे सांगून 28.51 कोटी एवढे वार्षिक उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पार करून 29 कोटी 78 लक्ष एवढा महसूल प्राप्त झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील इतर अधिकारी वर्गाचे सहकार्यमिळाल्याचे डॉ. व्ही टी. भुकन यांनी सांगितले.

हातभट्टी वर प्रभावी कारवाई

जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकूण 2025 गुन्हे नोंदविले असून 4 कोटी 17 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करत उच्चांकी कामगिरी केली आहे. या कालावधीत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 93 नुसार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत चांगल्या वर्तणुकीचे 234 बन्धपत्र घेण्यात आले.  जिल्ह्यात हातभट्टी वर नियंत्रण मिळवण्याचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथम च MPDA कायदा 1981 नुसार          2 गुन्हेगाराना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने अनुक्रमे अमरावती व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

00000

एरंडोल येथील मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचाही उत्साहात सहभाग

 




जळगाव दि.31 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. आज एरंडोल येथे सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला.

एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, मारवाडी गल्ली, भगवा चौक, मेन रोड (बाजार पेठ) मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी थांबून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना मतदान करायला सांगून इतरांनाही प्रेरीत करण्याचे आवाहन केले.

 या रॅलीत उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलीस निरीक्षक संतोष गोराडे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, न. प. पारोळा, राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी, तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   या रॅलीच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, नायब तहसीलदार, बी.एस. भालेराव, नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000


जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींची वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक ▪ मागील वर्षी एकुण वसुली 14 कोटी होती यावर्षी वसुली 58 कोटी

          जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

जळगाव दि.30 (जिमाका) :- जिल्ह्यात 1 'अ' वर्ग नगरपालिका, 5 'ब' वर्ग नगरपालिका 10 'क' वर्ग नगरपालिका व तसेच 3 नगरपंचायत अशा एकुण 19 नगरपालिका/नगरपंचायती आहेत. या 19 नगरपालिकांची सन 2023 24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता करांची एकुण मागणी 4724.93 लक्ष असून 5764.89 लक्ष (मागील थकबाकी सह) आतापर्यंत वसुली झालेली आहे. तसेच पाणीपट्टीची एकुण मागणी 2078.59 लक्ष असून 2256.93 लक्ष (मागील थकबाकी सह) आतापर्यंत वसुली झालेली आहे.  

   मागील वर्षी एकुण वसुली 14 कोटी होती यावर्षी वसुली 58 कोटी झाली आहे. मागील वर्षापेक्षा चालू वर्षी 400% पेक्षा अधिक वसुली झालेली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपालिकांनी माहे डिसेंबर पासून वसुलीवर अधिक भर दिला असल्याकारणाने एवढी भरमसाठ वसुली शक्य झालेली आहे. तसेच सर्व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी वसुली साठी चांगले प्रयत्न केलेले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. या वसुलीबाबत  जिल्हाधिकारी रोज स्वतः सर्व नगरपालिकांचा VC द्वारे आढावा घेत होते. त्याचे हे दृश्य परिणाम असल्याचे नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत यांचे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. याच आर्थिक उत्पन्नापासून नगरपरिषद /नगरपंचायत क्षेत्रात विविध विकास कामे केली जातात व तसेच नागरिकांना विविध मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना विनंती करण्यात येते की, सर्व थकबाकी लवकरात लवकर जमा करून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले असून या वसुलीच्या रक्कमेतून शहराच्या विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

00000

Saturday, 30 March 2024

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

 





'होय आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदानाला प्रवृत्त करणार' युवकांचा सूर

जळगाव दि. 30 ( जिमाका ) अठरा वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करून मतदान करणे हे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला झाली असून आम्ही ' होय,आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करणार असा समान सूर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी युवकांनी आज त्यांच्या भावना व्यक्त करतांना काढला.

राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक कार्यालय, पुणे आणि सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात  आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तथा मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी युवराज पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ. अजय एस. पाटील, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे, युवा आयकॉन रणजित राजपूत, रेडिओ जॉकी शिवानी, रेडिओ जॉकी देवा, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज आर. इंगोले उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांमध्ये उत्तम संवाद कौशल्य असते, त्यांच्यात लोकांमध्ये मिसळण्याचा गुण अंगी आलेला असतो, त्यामुळे मतदान जनजागृतीच्या कामात ते पुढे असतात. कार्यक्रमापूर्वी आपण जे पथनाट्य पाहिले ते अत्यंत प्रभावी होते. असले पथनाट्य मतदान जागृतीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम असल्याची भावना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या, सामाजिक शास्त्रे विभागाच्या विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये जाऊन अधिक जागृती निर्माण करावी असे आवाहनही केले.

 जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील म्हणाले, लोकशाही मध्ये तुमचं मत हे अत्यंत अमूल्य आहे. या मताच्या स्वातंत्र्यासाठी जगभर अनेक चळवळी झाल्या. अमेरिका , इंग्लड या प्रगत राष्ट्रातील लोकशाही जगातील इतर राष्ट्राच्या तुलनेत बऱ्याच जुन्या आहेत. पण तिथे महिलांना मताचा अधिकार मिळविण्यासाठी चळवळी कराव्या लागल्या. आपल्याकडे मात्र भारत देश प्रजासत्ताक झाला तेंव्हा पासूनच स्त्री, पुरुष दोघांनाही मताचा अधिकार प्राप्त झाला. अशा या आदर्श लोकशाही राष्ट्राचे आपण नागरिक आहोत. त्यामुळे तुमच्या मताचे मूल्य खुप मोठे आहे याची जाणीव ठेवा. आणि ही जाणीव इतरांमध्येही रुजवा.

युवकांचे योगदान देशाच्या विकासामध्ये, लोकशाही बळकट करण्यामध्ये नेहमीच महत्वाचे राहिले आहे. याची जाणीव ठेवून वयाचे 18 वर्षे पूर्ण झाले की मतदानासाठी नाव नोंदणी, मतदानाच्या दिवशी सकाळी अगोदर मतदाना हक्क बजवावा मग दुसरी कामं करावीत. तुम्ही ज्या राष्ट्राचे नागरिक आहात त्याचे नागरिक असण्याचे मूलभूत कर्तव्य मतदान आहे, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन प्रा. डॉ. अजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे यांनी केले तर डॉ. मनोज आर. इंगोले यांनी आभार मानले.

आर जे शिवानी आणि देवा यांनी केलं युवकांना बोलतं

 मतदार यादीत नाव नोंदविण्याचा कंटाळा करू नका, अगदी मतदानाच्या दिवशीच मतदार यादीत नाव शोधत फिरण्यापेक्षा अगोदरच खात्री करून करून घ्या. मतदार नोंदणीसाठी 'वोटर हेल्पलाईन' अँप आहे. घरबसल्या ही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यात आवश्यक ते कागद पत्र भरण्यासाठी अवघे काही मिनिट लागतात. त्यासाठी अजिबात कंटाळा करू नका. त्याच बरोबर तुम्ही सजग नागरिक आहात, निवडणुकीत काही अयोग्य होत असेल तर 'सी व्हिजिल' या अँप मध्ये जाऊन तक्रारही नोंदवा. अशी माहिती दोन्ही आर जें नी सांगितली आणि युवकांनाही बोलते केले. यावेळी  चेतन राखेड, शरद सोनवणे, विनोद शिरसाठ, अमृता सूर्यवंशी  यांनी आपण मतदान जन जागृतीसाठी विविध माध्यमाचा उपयोग करणार असल्याचे सांगितले.

मतदान जागृतीचे प्रभावी पथनाट्य सादर

विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील विद्यार्थी चेतन राठोड,

सौरभ संदांशिव,वैष्णवी कोळी,

नम्रता चव्हाण,विजय सुर्यवंशी

अतुल पटेल,वैभवी खारकर

कल्याणी चौरे,विजयराज जाधव या विद्यार्थांनी मतदार जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर केले. शहरी तसेच ग्रामीण मिश्र बोलीत सादर केलेल्या या नाट्यात मतदानाचे महत्व, ईव्हीएम मशीनचा वापर, मतदार नावनोंदणी, मतदान वेळी केंद्रावर आवश्यक असलेली कागदपत्रे इत्यादी बाबत माहिती सहज सोप्या भाषेत सादर केली.

00000

जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर

                                         जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर

           जळगाव, दि. 30 (जिमाका) :- शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग  विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.


     यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी  स्थानिक सुटी जाहिर केली आहे.

00000

Friday, 29 March 2024

 




जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक -2024 मतदान यंत्रांचे 8 एप्रिल रोजी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष होणार सरमिसळ

 जळगाव दि. 29 ( जिमाका )  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान यंत्रांचे (EVM आणि VVPAT) चे  8 एप्रिल रोजी संगणकृत सरमिसळ (Randomization) करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर तयार असलेले विधानसभा मतदार क्षेत्र निहाय मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. तसेच यावेळी सर्वं राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले असून त्या सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रांचे संगणीकृत सरमिसळ दि.8 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. संगणकृत सरमिसळ झाल्यानंतर तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची माहिती जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. सदरील यादीनुसार विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रे शासकीय गोदाम, तहसील कार्यालय आवार भुसावळ येथून दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून त्या त्या विधानसभा मतदार क्षेत्रातील प्राधिकृत अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.सदर मतदान यंत्राच्या यादीप्रमाणे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नायब तहसीलदार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. प्राधिकृत अधिकारी यांच्यासह स्कॅनिंग साठी नियुक्त केलेले कर्मचारी असे एकूण दहा कर्मचारी मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी पाठविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशात  आहेत. या सोबतच आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे देखील आदेशित करण्यात आले आहे. त्यासोबतच सदरील मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघातील सुरक्षा कक्षा पर्यंत वाहतूक करणे व त्याची सुरक्षा तसेच साठवणूक करणे याबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे.

00000

जळगांव जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान

                    ▪ मतदान केंद्राच्या संख्येत आता 18 ने वाढ,आता जिल्ह्यात 3582 मतदान केंद्र

 

            जळगाव दि.29  ( जिमाका ) :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे.

            जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास  भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, त्यानुसार ज्या मतदानकेंद्रास जोडलेल्या मतदारांची संख्या १५०० पेक्षा अधिक होती तिथे सहायकारी (अतिरीक्त) नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. तसेच मतदान केंद्राच्या ज्या इमारती नादुरुस्त होत्या किंवा त्यांची पडझड झाली होती. अशा मतदान केंद्राऐवजी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित केले होते. प्रस्तावित यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या होत्या व सदर बदलाबाबत राजकीय पक्षांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. मुदतीत कुठलीही हरकत प्राप्त न झाल्याने हे प्रस्ताव मंजुरीकामी भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना जोडलेल्या मतदारांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाल्याने तेथे प्रस्तावित नवीन मतदान केंद्रामुळे जिल्हयातील मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ होवून एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५८२ इतकी झालेली आहे. तर जुन्या व नादुरस्त इमारती असलेल्या ४७ मतदान केंद्रांची इमारत बदलण्यात आलेली आहे.

            या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

00000

Thursday, 28 March 2024

जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांसाठी,शासनाच्या ई-कुबेर प्रणालीची सुविधा

 जळगाव, दि.28  ( जिमाका) :

जळगाव जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.

पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी या कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शन धारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.

तरी ज्या पेन्शन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-2024 या महिन्याचे मासिक पेन्शन हे दिनांक 10 एप्रिल, 2024 पर्यंत जमा होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जळगावचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर - जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

 







जळगाव, दि. 28 ( जिमाका )

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.

या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन वोट कर जळगांव कर या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली.  यावेळी 'रेडिओ जॅकी' शिवानी यांनी वोट कर – जळगांव कर, चुनाव का पर्व देश का गर्व 'माझे मत- माझे भविष्य, मतदार राजा जागा हो -लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी-मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा-मतदानच आहे उद्याची आशा अशा विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी उपस्थित 'रेडिओ जॅकी'देवा यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवलं नसेल तर तात्काळ नाव नोंदवा, इतर मतदारांनाही नाव नोंदणीसाठी प्रेरित करा ,मतदानाप्रती नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून देश हितासाठी मतदान करण्याचे आवाहन  केले. कार्यक्रमात शेवटी सर्व उपस्थितांना लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.

 

00000

Wednesday, 27 March 2024

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु

             जळगाव दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली असून त्यात शस्त्र जप्ती,रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे.

शस्त्र जप्ती

            जिल्ह्यात एकूण 1246 परवनाधारक शस्त्र आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि.26 मार्च रोजी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 05  विनापरवानाशस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत 1 हजार 73 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सी आर पी सी अंतर्गत आतापर्यंत 786 जणांना अटक करण्यात आली आहे.

दारूबंदी

            आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे.

1. एकूण गुन्हे - 78

2. जप्त मुद्देमाल (लिटर)- 33506.18

3. जप्त मुद्देमाल किंमत (रू) - 11,69,825

सार्वजनिक तक्रार निवारण:

            व्होटर हेल्पलाइनद्वारे प्राप्त झालेल्या 53 कॉलचे समाधान करण्यात आले आहे. एकूण 53 कॉल निकाली काढण्यात आले आहेत. वोटर हेल्पलाइन वर प्राप्त होणाऱ्या कॉल्स पैकी बहुतांश तक्रार या मतदान कार्ड न मिळाल्याबाबतीत असल्याने कॉल करणाऱ्या नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.

CVIGIL:

            CVIGIL अर्जाद्वारे 34 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रमुख तक्रारी परवानगीशिवाय पोस्टर्स/बॅनरशी संबंधित आहेत. प्राप्त बहुतांशी तक्रारी या ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर बॅनर्स वॉल पेंटिंग याच्याशी संबंधित असल्याने संबंधित प्राप्त तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांना सुचित करण्यात आले आहे.

मीडिया:

            आता पर्यंत  एकूण 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

एन्कोर (ENCORE) अँप

            ENCORE अंतर्गत  परवानग्यांसाठी 01अर्ज प्राप्त झाला होता तथापि अर्जासंदर्भात त्रुटी पूर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.

00000

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

जळगाव दि.27(जिमाका) :- पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे SEBC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल, 2024 पर्यंत करण्यात येत आहे.

  अंतिम दिनांकापुर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाची पोचपावतीसह अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. असे आवाहन राजकुमार व्हटकर, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई यांनी केले आहे.

                                                                          00000

Tuesday, 26 March 2024

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

             जळगाव दि.26 (जिमाका) :- जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024 पासून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात पहिल्या सोमवारी (01 एप्रिल, 2024) होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर

 

            जळगाव दि.26 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

 जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा

            उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे.  त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला,भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खाजगी संस्था यांच्या मालकीची जागा/ मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमती पत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

 पोस्टर्स झेंडे,कापडी बॅनर

            सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे.  परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावतीआवश्यक आहे.

 खाजगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे

            खाजगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी,व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

प्रचार वाहन परवानगी

            प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.

 उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय

            उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

 हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी

            संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 ध्वनीक्षेपकाची परवानगी

            प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते.त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

 शाळेच्या मैदानावरील सभा

            संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी  उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती

            उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर ( शेवटचे 48 तास ) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे.त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.

फ्लेक्स,बोर्ड,झेंडे,होर्डिंग्स,बॅनर व पोस्टर

            संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे,पोस्टर,बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

  मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोडशो

            उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.

00000

Friday, 22 March 2024

सुधारित भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु; वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका 22 मार्चपासून सुरु होणार

            जळगाव दि.22( जिमाका ) –जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून आरटीओ कोड MH-54 असा असणार आहे. कार्यालय कार्यान्वीत झाल्यानंतर पहिल्या टप्या, 21 मार्च पासून सर्व नविन वाहनांची नोंदणी भडगाव येथील नविन कार्यालयाव्दारे करण्यात येणार आहे.

            येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील हलके / अवजड मालवाहू वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, हलके मोटार वाहन (परिवहनेतर) खाजगी कार / ट्रॅक्टर-टगेलर/कस्ट्रक्शंन इक्युपमेंट व्हेईकल) वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54B.0001 ते 9999 व तीनचाकी परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी   MH54C.0001 ते 9999 पर्यंतची मालिका 22 मार्च, 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी शासकीय शुल्काचा Dy RTO Bhadgaon  यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन श्याम लोहि , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

            तसेच नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गट नं. 84/2/ब/1/ब, मौजे टोणगाव, भडगाव-पाचोरा रोड, आिार्वाद जिनिंग समोर, भडगाव – 424105 ता. भडगाव येथे असून भडगाव, पाचोरा, पारोळी व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आरटीओ संबधित कामकाज हे भडगाव येथेच करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहि यांनी केले आहे.

00000000

होळी आणि धुलीवंदन साजरा करतांना रंगाचा प्राण्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

         जळगाव दि. 22 ( जिमाका ) - आपण सर्व होळी व धुलीवंदन हा सण दिनांक २४ व २५ मार्च २०२४ रोजी साजरा करणार आहोत. होळी व धुलीवंदन सणाचा आनंद घेत असतांना विविध रंगाची उधळण करतांना पाळीव प्राण्यांना त्याची ईजा होणार नाही याची काळजी सर्व नागरीकांनी घ्यावी. धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंग, केमिकल, रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर टाकू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

   पाळीव प्राण्यांच्या अंगावर विशेषतः शहरी भागात पाळीव कुत्र्यावर रासानिक रंग टाकल्यामुळे त्यांना ईजा होवू शकते. जर त्यांच्या डोळयातुन पाणी येत असेल अथवा डोळे लाल झाले असतील तर तात्काळ डोळे स्वच्छगार पाण्याने धुवून घ्यावेत. तसेच तात्काळ पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्रि नंबर १९६२ वर संपर्क करावा. तरी सर्व नागरीकांनी रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर किंवा डोळयात टाकू नये अन्यथा त्यांच्यावर प्राणीक्लेश प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारीआयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

0000000

भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु; वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका 22 मार्चपासून सुरु होणार

         जळगाव दि.22( जिमाका ) –जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून आरटीओ कोड MH-54 असा असणार आहे. कार्यालय कार्यान्वीत झाल्यानंतर पहिल्या टप्या, 21 मार्च पासून सर्व नविन वाहनांची नोंदणी भडगाव येथील नविन कार्यालयाव्दारे करण्यात येणार आहे.

            येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील हलके / अवजड मालवाहू वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, हलके मोटार वाहन (परिवहनेतर) खाजगी कार / ट्रॅक्टर-टगेलर/कस्ट्रक्शंन इक्युपमेंट व्हेईकल) वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54B.0001 ते 9999 व तीनचाकी परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी   MH54C.0001 ते 9999 पर्यंतची मालिका 22 मार्च, 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी शासकीय शुल्काचा Dy RTO Bhadgaon  यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

            तसेच नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गट नं. 84/2/ब/1/ब, मौजे टोणगाव, भडगाव-पाचोरा रोड, आिार्वाद जिनिंग समोर, भडगाव – 424105 ता. भडगाव येथे असून भडगाव, पाचोरा, पारोळी व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आरटीओ संबधित कामकाज हे भडगाव येथेच करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहि यांनी केले आहे.

00000000

पोषक वातावरणात होळी, धुळवड सन साजरी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

         जळगाव ( जिमाका ) दि. 22 –जिल्हयात होळी, धुळवड हे सण दरवर्षी मोठया उत्सवात साजरे केले जातात. सण साजरी करतांना कायद्याचे, नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

               होळी सण साजरा करत असतांना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना गैरवर्तन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सण साजरे करत असतांना कोणाशी गैरवर्तन होणार नाही. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही सण साजरा करत असतांना महिला, मुली, बालक यांचा अनादर होणार नाही, त्यांना चुकीच्यारीत्या स्पर्श होणार नाही. त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावेळी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात येवू नये, जर चुकून असे फोटो क्लिक करण्यात आले तर ते समाज माध्यमांवर प्रसारीत न करता तात्काळ डिलीट करण्यात यावेत. सर्वानी आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत हर्ष आणि उल्हासात होळी खेळतांना मुलींचा, महिलांचा, बालकांचा सन्मान ठेवावा त्यांच्याशी चुकीची वर्तनुक, आक्षेपार्ह स्पर्श होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, महिला, मुली, बालक यांना सुरक्षित वातावरणात, आनंदात सण साजरा करता यावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तरी सर्वांनी मिळून आपली जबाबदारी पार पाडून उत्साहात होळी साजरी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

 

'सिमी' ही बेकायदेशीर संघटना ; त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश

           जळगाव दि.22 ( जिमाका )  केंद्र शासनाने त्यांच्या अधिसूचना क्रमांक S.O. ३५४ (E) दिनांक २९ जानेवारी २०२४ अन्वये बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ कायद्याच्या कलम ३ च्या उप-कलम (१) द्वारे स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) ला 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित केले आहे. तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ कायद्याच्या कलम कलम ४२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना केंद्र सरकारने अधिसूचना क्रमांक S.O. ४७५(E) दि. ५ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम ७ आणि कलम ८ अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणारे अधिकार वापरतील असे निर्देश दिले आहेत.

 केंद्र सरकारच्या उपरोक्त पत्रातील सूचनांच्या अनुषंगाने कायद्याच्या तरतूदीनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करण्यात यावी तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबत तसेच या बंदीबाबत स्थानिक पातळीवर योग्य ती प्रसिद्धी देण्याबाबतही कळविल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000000

लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून नियुक्ती

 जळगाव दि. 22 ( जिमाका ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी घेताना परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत. हे कळावे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी देणारे अधिकारी यांची नावे जाहिर केली आहेत.

             लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात प्रचार तथा निवडणुकी संबंधित विविध बाबी करिता विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यामुळे परवानगी देण्याच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फतच परवानगी मिळणार आहे. पोस्टर्स झेंडे कापडी बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यासाठीस्थानिक स्वराज्य संस्था,महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. खाजगी जागेवर फलक व प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. प्रचार वाहनाच्या परवानगीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजना, तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजनाहे परवानगी देतील.राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना प्रचार वाहन परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव हे परवानगी देणारी अधिकारी असतील. उमेदवाराच्या तात्पुरते प्रचार कार्यालय उघडण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परवानगी देतील. हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवणे करिता अप्पर जिल्हा दंडाधिकारी हे परवानगी अधिकारी असतील.  ध्वनी क्षेपणाची परवानगी देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी हे परवानगी देतील. विविध शाळांच्या मैदानावर सभा घेण्याकरिता ना हरकत दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून मिळेल. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच प्रिंट मीडियावर ( मतदानाच्या पूर्वीचे शेवटचे 48 तास ) प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती तसेच बल्क मेसेजेस यांच्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी हे परवानगी अधिकारी असतील. फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर, पोस्टर व इतर प्रचार साहित्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत परवानगी मिळेल. मिरवणूक,पदयात्रा, रॅली,प्रचार फेरी,रोड शो याकरिता संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे परवानगी अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबतच उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी suvidha candidate App किंवा ENCORE या वेब पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येतील.

                                                                           0000000000

Wednesday, 20 March 2024

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता कार्यवाही जिल्ह्यातील 51 हजार 728 राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवले

            


     जळगाव दि. 21 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार  आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण 31 हजार 562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20  हजार 166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर  आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे.आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर 24 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरातून 55, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 2347, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 407, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 291,  चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2517, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2445 असे एकूण 8062 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 1596, रावेर विधानसभा मतदारसंघातून 831, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 586, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2931, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 42, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून984 असे एकूण 6,934 बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोन शिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.  निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर 48 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 163, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 3923, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1125, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 455, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2766, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 4023 असे एकूण 12,463 विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती असलेले पोस्टर्स,बॅनर्स,झेंडे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 771, रावेर विधानसभा मतदारसंघातून 541, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 649, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2195, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 253, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 734असे एकूण 5125 बॅनर्स, पोस्टर्स,झेंडे फलके हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर 72 तासात जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 222, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 5258, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1197, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 570, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 1408, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2382 असे एकूण 11,037 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 3273, रावेर विधानसभा मतदारसंघातून 491, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 360, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 3266, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 346, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 371, असे एकूण 8107 बॅनर्स,पोस्टर्स, झेंडे, तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

00000

जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर 19 लाख 81 हजार 472 मतदार नोंद तर रावेर मध्ये 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद

दोन्ही मतदार संघातील पुरुष मतदार 19,68,114, स्त्रिया- 18,25,172 तर तृतीय पंथी 137

            जळगाव दि.20 (जिमाका ) जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख,81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

   जळगावं लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 10 लाख 31 हजार 60 एवढी असून स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 83 आहेत. अशी सर्व मिळून 19 लाख 81 हजार 472 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे

            जळगांव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 207019 स्त्रीयांची संख्या-188113, तृतीय पंथी संख्या 32 असे एकुण 395164 मतदार आहेत. जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 1,66330 स्त्रीयांची संख्या- 1,55302 तृतीय पंथी संख्या -03 असे एकुण 321635 मतदार आहेत.

            अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 155220 स्त्रीयांची संख्या-146010 तृतीय पंथी संख्या 3 असे एकुण 301233 मतदार आहेत.

            एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 147479, स्त्रियांची संख्या 138322 तर तृतीय पंथी संख्या 10 असे एकुण 285811 मतदार आहेत.

            चाळीसगांव विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 189801, स्त्रीयांची संख्या- 169851 तृतीय पंथी संख्या -29 असे एकुण 359681   मतदार आहेत.

            पाचोरा विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 165211 स्त्रीयांची संख्या - 152731 तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 317948 मतदार आहेत.

            रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 54 आहेत. अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे

        चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या 164152, स्त्रीयांची संख्या- 156584, तृतीय पंथी संख्या 02 असे एकुण 320738 मतदार आहेत.

            रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या 153883, स्त्रीयांची संख्या- 144447, तृतीय पंथी संख्या-02 असे एकुण 298332 मतदार आहेत.

            भुसावळ (एससी) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या-154058 स्त्रीयांची संख्या-143539 तृतीय पंथी संख्या 37 असे एकुण 297634 मतदार आहेत.

            जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या1,66,837, स्त्रीयांची संख्या- 1,54,519, तृतीय पंथी संख्या -00 असे एकुण 321356 मतदार आहेत.

            मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 151628, स्त्रियांची संख्या 142683, तृतीय पंथी संख्या-07 असे एकुण 294318 मतदार आहेत.

            बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तेथील पुरुष संख्या 146496 स्त्रीयांची संख्या- 133071, तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 279573 मतदार आहेत.

            असे एकत्रित दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकुण पुरुष संख्या 1968114, एकुण स्त्रीयांची संख्या-1825172, एकुण तृतीय पंथी संख्या 137 असे एकुण 3793423 मतदार आहेत.

                                                                   00000 

Tuesday, 19 March 2024

कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

                 जळगाव दि.20 ( जिमाका) –आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता   1 एप्रिल,2024 ते 15 जुलै, 2024 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

                प्रवेशासाठी अटी :-

                उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा,

                वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स,  दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला  इ. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष 10 ते 2 वाजेपर्यंत सपर्क साधावा,

            तसेच  प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल,    मुलाखत दिनांक – 28 मार्च, 2024 राहिल,     संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक – 02584-251906, भ्रमणध्वनी क्रमांक – 8668817893   असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी रावेर, यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.                                                              

000000000

 दिनांक *१९/०३/२०२४

*प्रेस नोट* 

आज रोजी  वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर (प्रादेशिक) यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार, रावेर वनक्षेत्रातील पाल  परिमंडळ मधील पाल राऊंड स्टाफ यांच्यासह क.नं ५६ मधून  मांजर रस्ता गस्त करीत असताना तीन मोटरसायकल क्रमांक पुढील

१)hfDeluxएम.पी१०ME९५१६

२)स्मार्ट हिरो Mp१०mq४४९२

३) हिरो होंडा Mp१०mg 3494 असे असून अवैध डिंक घेऊन जात असताना मिळून आले त्यात साधारण ११८ किलो सलाई व २० किलो धावडा डिंक जप्त  केला. सदर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन प्रसार झाला आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही तरी वन गुन्हा क्र. 0२/२०२४ दिनांक-१९/०३/२०२४ चा जारी केला.या डिंकाची नुकसानी किंमत सलाई ११८की.लो ×११० = १२९८० रू.धावडा २०की.लो × 200 =४०००रू इतकी आहे. तसेच तीन मोटरसायकल ची किंमत ही बाजार भावा प्रमाणे १३३००० इतकी आहे एकूण सर्व मिळून नुकसानी किंमत १४९९८० इतकं आहे. सदर कार्यवाहीत श्री अजय बावणे वनक्षेत्रपाल रावेर, श्री डी.जी. रायसिंग वनपाल पाल श्री.एम.एम तडवी वनरक्षक व कायम वनमजूर यांचा सहभाग होता.  सदर कार्यवाही ही म. वनसंरक्षक धुळे माननीय ऋषिकेश रंजन सो ,म.जमीर शेख उपवनसंरक्षक यावल, म प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन गुन्ह्याबाबत पुढील तपास वनपाल पाल यांचे मार्फत सुरू आहे.

                                                                00000000

Sunday, 17 March 2024

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव दि.17 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

    दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.

   अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.

    दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.

                                                                          000000000000

 महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?


पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक (9), नागपूर(10), भंडारा गोंदिया(11), गडचिरोली-चिमूर(12), चंद्रपूर(13)


दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा(05), अकोला(06), अमरावती(07), वर्धा(08), यवतमाळ – वाशिम(14), हिंगोली(15),  नांदेड(16), परभणी(17)

तिसरा टप्पा 7 मे – रायगड(32), बारामती(32), धाराशीव(40), लातूर(41), सोलापूर(42), माढा(43), सांगली(44), सातारा(45), रत्नागिरी- सिंधुदुर्ग(46),  कोल्हापूर(47), हातकणंगले(48)

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार(01), जळगाव(03), रावेर(04), जालना(18), छत्रपती संभाजीनगर(19), मावळ(33), पुणे(34), शिरुर(36), अहमदनगर(37), शिर्डी(38), बीड(39)

पाचवा टप्पा 20 मे – धुळे(02), दिंडोरी(20), नाशिक(21), पालघर(22), भिवंडी(23), कल्याण(24), ठाणे(25), मुंबईतील सहा मतदारसंघ(26-31)

                                                                        00000000

सुधारित: लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू





 नवी दिल्ली, 16 मार्च :  देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते.  निवडणूक कार्यक्रमांच्या या  घोषणेमुळे  देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान

             महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या  टप्प्यात राज्यातील एकूण  ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे  रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी  राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

            लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या २६ जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

देशात सात टप्प्यात मतदान

देशात 19 एप्रिल रोजी  पहिल्या  टप्प्यात 21 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी  उमेदवारी  अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 26 एप्रिल रोजी  दुस-या  टप्प्यात 13 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 89 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी  उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

 देशात 7 मे रोजी  तिस-या  टप्प्यात 12 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 94 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी  १२ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 13 मे रोजी चौथ्या  टप्प्यात 10 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ३ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 देशात 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  २९  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 देशात 1 जून रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ७ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

ठळक मुद्दे

  1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते

  18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार

  देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार

 100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार

 85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान

 12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार

निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाण

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करण्याबाबत

बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. 

                                                                           ********