Friday, 18 July 2025

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस गती : त्रुटीपूर्ण अर्ज तत्काळ सुधारण्याचे आवाहन

         जळगाव, दि. १८ (जिमाका)  – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून त्रुटीपूर्ण अर्जांवरील कार्यवाहीला अडथळा येत असून, अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेवर त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रखडले आहेत. अर्जदारांनी समितीकडून एसएमएस, ई-मेल वा लेखी पत्राच्या माध्यमातून सूचना मिळूनही कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही, असे निरीक्षण समितीकडून नोंदविण्यात आले आहे.

                 या पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सौ. नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन व संशोधन अधिकारी नंदा रायते यांनी स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांनी व पालकांनी तातडीने समिती कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करावी, जेणेकरून समितीला निर्णय घेणे शक्य होईल.

              महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

               १ ऑगस्ट २०२० पासून ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली असून, १२ डिसेंबर २०२० पासून सेवा शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना आपला अर्ज, स्थिती व प्रमाणपत्र कुठेही व कधीही मोबाईलद्वारे पाहण्याची सुविधा आहे. तसेच, समितीकडून निकाल लागल्यानंतर वैध प्रमाणपत्र थेट ई-मेलद्वारे पाठवले जाते.

              विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हेल्पडेस्क, SMS व ई-मेलद्वारे त्रुटींची माहिती देण्यात येत आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता तात्काळ करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment