Thursday, 17 July 2025

भारतीय डाक विभागात IT 2.0 अप्लिकेशन शुभारंभ २२ जुलैला होणार; मात्र २१ जुलैला टपाल सेवा बंद राहणार

         जळगाव, दि. १७ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत, पुढील पिढीतील अत्याधुनिक APT अप्लिकेशन सुरु करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने आणि नागरिकाभिमुख सेवांच्या विकासाकडे वाटचाल करणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह ठरणार आहे.

            परिवर्तनाचा एक भाग म्हणून, APT प्रणालीचा वापर जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिनांक २२ जुलै २०२५ पासून करण्यात येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे टपाल व्यवहार अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडणार आहेत.

            दरम्यान, प्रणाली स्थलांतर, पडताळणी आणि कॉन्फिगरेशन प्रक्रेच्या अनुषंगाने, २१ जुलै २०२५ रोजी जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये सेवा बंद राहणार असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, जळगाव यांनी दिली. या दिवशी कोणतेही टपाल व्यवहार होणार नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या कामांचे नियोजन योग्य पद्धतीने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            नवीन APT अप्लिकेशन अंतर्गत ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रणालीमुळे सेवा वितरणात गती येणार असून, स्मार्ट आणि भविष्यातील गरजांना पूरक अशा टपाल सेवा नागरिकांना मिळणार आहेत.

            डिजिटल परिवर्तनाच्या या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. हे सर्व पावले अधिक चांगल्या, वेगवान व डिजिटल सेवांच्या वितरणासाठीच उचलण्यात येत आहेत, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

००००००००००

No comments:

Post a Comment