Wednesday, 20 August 2025

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई – मिठाईचा रुपये २४,१३०/- चा साठा जप्त

         जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी शिरसोली प्र.न., जळगाव येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या ठिकाणी धाड टाकण्यात आली.

            सदर ठिकाणी पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन कमी दर्जाचे व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांना अपुरे असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित १५१ किलोग्रॅम मिठाईचा एकूण रुपये २४,१३०/- किमतीचा साठा जप्त करून नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.

            ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. आकाश बोहाडे, श्री. योगराज सुर्यवंशी, सौ. आकांक्षा खालकर व सौ. पद्मजा कढरे यांनी सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जळगाव श्री. संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

            जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. संतोष कृ. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000000000

No comments:

Post a Comment