Wednesday, 29 May 2019

जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी कामांचा समावेश करावा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे




            जळगाव, दि. 29 - जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये विविध कार्यान्वियीन यंत्रणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी योजना व उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच करण्यात येणाऱ्या कामांच्या याद्या जिल्हा नियोजन कार्यालयास तातडीने सादर कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत.
            जिल्हा वार्षिक योजनेबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
            यावेळी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतुन ज्या यंत्रणांना निधी प्राप्त होतो. त्यांनी या निधीतून कामांचे नियोजन करतांना लोकोपयोगी योजनांचा जास्तीत जास्त समावेश करुन जनतेच्या हिताची कामे होईल यावर भर द्यावा. तसेच आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन कामांना जून अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन काम पूर्ण करावे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या विभागांकडे सन 2015-16 पासून अखर्चित निधी आहे. त्याची माहिती संबंधितांनी तातडीने सादर करावी. अन्यथा त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला.
जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन 2019-20 अंतर्गत 308 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुद मंजूर असून 102 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त झाला आहे. ज्या विभागांच्या कामांच्या याद्या प्राप्त होतील. त्यांना प्राधान्याने निधीचे वाटप करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीवर शिल्लक असलेला निधी आहरीत करुन ठेवण्यात आला आहे. त्या योजनानिहाय व कामनिहाय याद्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीस सादर कराव्यात व त्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन कामांवर निधी खर्च करावा. त्याचबरोबर वितरीत करण्यात आलेला निधी कोणत्या कामांवर खर्च करण्यात आला याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही डॉ. ढाकणे यांनी बैठकीत दिले.
नाविन्यपूर्ण उपक्रम/योजना सुचवा
            जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम/योजना राबविण्यासाठी निधी राखीव असतो. या निधीमधून जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण कामे व्हावीत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी जिल्ह्याच्या विकासात भर घालण्याबरोबरच जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण ठरतील अशी कामे  सुचवावी. जे विभाग असे नाविण्यपूर्ण उपक्रम/ योजना सुचवतील अशा विभागांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले.
000

ग्रामसस्तरावरील अधिकारी गावात उपस्थित न राहिल्यास होणार कारवाई


            जळगाव, दि. 29 - राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेता सर्व ग्रामसेवकांसह ग्रामस्तरावरील अधिकारी गावात उपस्थित राहतील याची दक्षता घेण्याचे निदेश राज्य मंत्रीमंडळाच्या 28 मे रोजीच्या बैठकीत देण्यात आले आहे.
             ग्रामसेवकांसह गावपातळीवरील संबंधित अधिकारी गावात उपस्थित न राहिल्यास त्यांचेवर कारवाई करावी. ग्रामसेवक व संबंधित अधिकारी गावांमध्ये उपस्थित राहतात अथवा नाही, याची खात्री करणारी यंत्रणा (Tracking System) तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र ई समिक्षा  प्रणालीवर सादर करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेस मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
000

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण

                                                                                                                                                                          जळगाव, दि. 29 -   संघ लोकसेवा आयोग  (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी 8 सप्टेंबर, 2019 रोजी घेण्यात येणा-या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरीता 12 जून, 2019 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जुलै, 2019 अशी आहे. ऑनलईन अर्ज भरणेसाठी  http:/www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेव्दारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.
     कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवुवतीसाठी 18 जून, 2019 ते 31 ऑगस्ट, 2019 या कालावधीत कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
     तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे 13 जून, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट  www.mahasainik.com वरील रिक्रुटमेंट टॅब (Recruitment Tab) ला क्लीक करुन किंवा गुगल प्लस मध्ये पीसीटीसी ट्रेनिंग PCTC Training असे सर्च करुन त्यामधील CDS- 58 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
     अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                          000

Tuesday, 28 May 2019

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न


            जळगाव, दि. 28 - जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त्‍ चंद्रकांत खोसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत यांचेसह समिती सदस्य उपस्थित होते.
            या बैठकीत महानगरपालिका पाणीपट्टी कर व मालमत्ता कर, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नव्याने मेपल फ्लोरींग करणे, संकुलात नव्याने करावायाच्या कामांसाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे, जिल्हा क्रीडा संकुलात स्वयंपाक घर तयार करणे,संकुलातील जुन्या व्यापारी गाळ्यांच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या कोर्ट केस, गाळे हस्तांतरण, व्यापारी गाळ्यांच्या सर्व्हिस टॅक्सबाबत, इन्कम टॅक्स विभागाकडील रक्कमेबाबत, संकुलातील बीएसएनएल टॉवर, कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबत आदि विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
            यावेळी डॉ. ढाकणे यांनी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने करावयाच्या विविध कामांसाठी एकत्रित निविदा काढण्याच्या सुचना क्रीडा विभागास दिल्यात. तसेच जीम प्रशिक्षकांचे मानधन 8 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. क्रीडांगणासाठी  लागणारा रोलर जेम पोर्टलवरुन खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच लेखापरिक्षणासाठी सी. ए. ची नेमणुक करणे, जैन स्पोर्टस ॲकेडमी यांना नियमित सरावासाठी बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देणे, सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाचे देयक अदा करण्यासही बैठकीत मंजूरी देण्यात आली.
            क्रीडा संकुलातील सोयीसुविधांचा आढावा घेणे तसेच आवश्यक ते बदल करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुढील आठवड्यात संयुक्तरित्या क्रीडा संकुलाची पाहणी करण्याचेही बैठकीत ठरले.
000

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

                                                                                                                                                                              जळगाव, दि. 28- सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागसवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.
     विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रवेशासाठी प्रचलित जुन्या पध्दतीनुसार लेखी प्रवेश अर्ज भरुन त्वरीत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
           विद्यालय विभागाच्या अनुसुचित जाती-05, विशेष मागास प्रवर्ग-01, अपंग-01, अनाथ-01 याप्रमाणे जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्या वर्गवारीच्या जागा रिक्त आहे त्याच वर्गवारीच्या विद्यार्थिनींना वसतिगृह गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल,  असेही गृहपाल यांनी कळविले आहे.
                                                                         ०००

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

                                                                                                                                                                   जळगाव, दि. 28 - शासनाच्यावतीने धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासन मान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.
     सन 2019-20 या वर्षाकरीता अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी  www.maharastra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रतापराव पाटील, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
     

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

                                                                                                                                                                              जळगाव, दि. 28 - ज्या मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येते. तसेच ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदानाची आवश्यकता आहे. अशा मदरसांसाठी शासनामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे.
     सन 2019-20 या आर्थिक वर्षात ज्या मदरसांना अनुदान आवश्यक आहे. अशा मदरसांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी मदरसा/मदरसे चालविणा-या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
     जिल्ह्यातील इच्छूक मदरसांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी  कार्यालय, जळगाव येथे 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रतापराव पाटील, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                               ०००

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





     जळगाव, दि. 28 - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
     याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, मिलींद कुलकर्णी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                               000

योगाचा प्रसार होण्यासाठी सुर्यनमस्कार चे कॅलेंडर वाटप करावेत - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

                                                                                                                                                                                 जळगाव, दि. 28 - जिल्ह्यात योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना प्रमाणपत्र न देता सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुर्यनमस्कार चे कॅलेंडर वाटप करावेत. अश्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्यात.
     येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जागतिक योगा दिन (21 जून) साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा व पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त्‍ चंद्रकांत खोसे, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. रेहदासनी, जी. एम. फाउंडेशनचे श्री. चव्हाण, पतंजली योग संस्थेचे जिल्हाप्रमूख श्री. महाले, पतंजली मेगा स्टोअरचे श्री. पगारिया,जळगाव जिल्हा योगा असोसिएशनच्या श्रीमती अनिता पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. देवांग, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप पाटील, महानगरपालिकेचे प्रभारी क्रीडाअधिकारी विवेक आळवणी यांचेसह विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच क्रीडा खेळाडू उपस्थित होते.
     यावेळी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन हे  एकाच दिवसापुरते मर्यादित न राहता शहरातील गर्दीच्या ठिकाणी सेवाभावीवृत्तीने योग प्रशिक्षकांमार्फत दैनंदिन प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतल्यास योगाचा प्रचार व प्रसार होण्याबरोबरच नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होईल. सुर्यनमस्कार हा योगाचा अत्यंत साधा व सोपा प्रकार आहे. या प्रकाराची नागरीकांमध्ये गोडी निर्माण व्हावी, सुर्यनमस्कार चे कॅलेंडर बघून नागरीकांना या प्रकार करता यावा यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने सुर्यनमस्कार चे कॅलेंडर छापून घ्यावे व ते  योगादिनी नागरिकांना वाटप करावे अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिल्यात.
     येत्या 21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुलात एक तासाचा योगाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी 7.15 ते 7.30 या वेळेत जिल्हयातील विविध योग संस्थांच्यावतीने योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर पतंजली योगा जिल्हा प्रमुख यांच्यावतीने योगासने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना पिण्याचे पाणी, बिस्कीटे, केळी याबरोबरच इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेडक्रॉस सोसायटी, जी. एम. फाऊंडेशन, पतंजली, जैन इरिगेशन आदि संस्था मदत करणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.
     या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरीक, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी व योगाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
                                                                            000

Friday, 24 May 2019

जळगाव लोकसभा मतदार संघातून उन्मेश पाटील रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे विजयी



            जळगाव दि. 24 :- लोकसभा निवडणूक 2019 च्या 03 जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उन्मेश भैय्यासाहेब पाटील हे विजयी झाले असून त्यांना  7,13,874 मते मिळाली. तर 04 रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती रक्षा निखील खडसे या विजयी झाल्या असून त्यांना 6,55,386 मते मिळाली, असे 03 जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, 04 रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी घोषित केले आहे.
            03 जळगाव लोकसभा मतदार संघातील इतर उमेदवारांना मिळालेली मते व पक्ष याप्रमाणे.  गुलाबराव बाबुराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 3,02,257,  राहुल नारायण बनसोडे, बहुजन समाज पार्टी, 3,428, ईश्वर दयाराम मोरे, बहुजन मुक्ती पार्टी, 1,262, श्रीमती अंजली रत्नाकर बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी 37,366, संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील, हिंदुस्थान निर्माण दल, 1,295, मोहन शंकर बिऱ्हाडे, राष्ट्रीय समाजवादी पार्टी (सेक्युलर), 670,  शरद गोरख भामरे (सुतार), राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर), 817, अनंत प्रभाकर महाजन, अपक्ष, 6,562,  ओंकार बाबा चेनसिंग जाधव, अपक्ष 3,144, मुकेश राजेश कुरील, अपक्ष, 1,383,  ललीत (बंटी) गौरीशंकर शर्मा, अपक्ष, 1,108,  सुभाष शिवलाल खैरनार, अपक्ष, 1,629 आणि संचेती रुपेश पारसमल, अपक्ष 3,150 मते मते मिळाली आहेत.
            04 रावेर लोकसभा मतदार संघातील इतर उमेदवारांना मिळालेली मते व पक्ष याप्रमाणे. डॉ. उल्हास वासुदेव पाटील, इंडियन नॅशनल कॉग्रेस, 3,19,504,  डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, बहुजन समाज पार्टी , 5,705, अजित नामदार तडवी, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी, 1,425, अडकमोल रोहीदास रमेश, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, 1,679,  नितीन प्रल्हाद कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी, 88,365, मधुकर सोपान पाटील, हिंदूस्थान जनता पार्टी, 1,607,  रोशन आरा सादीक अली, इंडियन युनियन मुस्लिम लीग, 1,103, गौरव दामोदर सुरवाडे, अपक्ष, 985, तंवर विजय जगन, अपक्ष, 1,141, नजमीन शेख रमजान, अपक्ष, 2,581 आणि डी. डी. वाणी (फोटोग्राफर), अपक्ष 4,274 मते मिळाली आहेत.
000