Tuesday, 28 May 2019

योगाचा प्रसार होण्यासाठी सुर्यनमस्कार चे कॅलेंडर वाटप करावेत - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

                                                                                                                                                                                 जळगाव, दि. 28 - जिल्ह्यात योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना प्रमाणपत्र न देता सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुर्यनमस्कार चे कॅलेंडर वाटप करावेत. अश्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्यात.
     येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जागतिक योगा दिन (21 जून) साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा व पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त्‍ चंद्रकांत खोसे, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. रेहदासनी, जी. एम. फाउंडेशनचे श्री. चव्हाण, पतंजली योग संस्थेचे जिल्हाप्रमूख श्री. महाले, पतंजली मेगा स्टोअरचे श्री. पगारिया,जळगाव जिल्हा योगा असोसिएशनच्या श्रीमती अनिता पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. देवांग, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप पाटील, महानगरपालिकेचे प्रभारी क्रीडाअधिकारी विवेक आळवणी यांचेसह विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच क्रीडा खेळाडू उपस्थित होते.
     यावेळी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन हे  एकाच दिवसापुरते मर्यादित न राहता शहरातील गर्दीच्या ठिकाणी सेवाभावीवृत्तीने योग प्रशिक्षकांमार्फत दैनंदिन प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतल्यास योगाचा प्रचार व प्रसार होण्याबरोबरच नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होईल. सुर्यनमस्कार हा योगाचा अत्यंत साधा व सोपा प्रकार आहे. या प्रकाराची नागरीकांमध्ये गोडी निर्माण व्हावी, सुर्यनमस्कार चे कॅलेंडर बघून नागरीकांना या प्रकार करता यावा यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने सुर्यनमस्कार चे कॅलेंडर छापून घ्यावे व ते  योगादिनी नागरिकांना वाटप करावे अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिल्यात.
     येत्या 21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुलात एक तासाचा योगाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी 7.15 ते 7.30 या वेळेत जिल्हयातील विविध योग संस्थांच्यावतीने योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर पतंजली योगा जिल्हा प्रमुख यांच्यावतीने योगासने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना पिण्याचे पाणी, बिस्कीटे, केळी याबरोबरच इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेडक्रॉस सोसायटी, जी. एम. फाऊंडेशन, पतंजली, जैन इरिगेशन आदि संस्था मदत करणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.
     या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरीक, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी व योगाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
                                                                            000

No comments:

Post a Comment