Friday, 12 June 2020

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करावी


            जळगाव, दि.12 (जिमाका) – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) जळगाव जिल्ह्यातील समाविष्ट 460 गावातील शेतकऱ्यांकारीता हवामान अनुकूल कृषी पध्दती या घटकांतर्गत मूलस्थानी जलसंधारण या उपघटकामध्ये रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन ही बाब समाविष्ट करण्यात आली आहे.  या प्रकल्प क्षेत्रातील शेतक-यांनी नोंदणीकृत बीबीएफ यंत्र धारकांकडून पेरणी करुन घेतल्यास प्रति शेतकरी कमाल 2 हे. मर्यादेपर्यंत किंवा गावातील जास्तीतजास्त  25 शेतक-यांना कमाल मर्यादा रक्कम  एक हजार रुपये प्रति हेक्टरी किंवा 400 रुपये प्रति एकर दराने प्रोत्साहनपर अनुदान डीबीटी – पोक्रा या ऑनलाईन पोर्टलव्दारे देय असेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.
            शेती ही मुख्यत: कोरडवाहू असल्याने रुंद वाफा व सरी ( बीबीएफ) टोकन यंत्राचा वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. या यंत्राव्दारे पेरणी केल्यास कमी पावसात सरीमध्ये पाणी साठवून पिकांसाठी ओलावा निर्माण होतो आणि अधिक पावसाच्या कालावधीत अधिकच्या पाण्याचा निचरा शेताबाहेर सुरक्षितरीत्या केला जातो. उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते. आंतरपीक पध्दतीचा अवलंब करुन अधिकचे उत्पन्न मिळते. पावसात खंड पडल्यास किंवा पाणी कमी असल्यास  या पध्दतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. पाऊस जास्त झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते. मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पेरणीसाठी बियाणे कमी लागते. पाण्याची बचत होते. उत्पन्नामध्ये हमखास वाढ होते. पिकाची आंतरमशागत, औषध फवारणी , स्प्रिंकलव्दारे संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पध्दत फायदेशीर ठरते.
            प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावातील शेतकरी बांधवांनी जास्तीतजास्त  बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करुन प्रकल्पांतर्गत देय असलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment