Thursday, 8 October 2020

मका व ज्वारी पिकावरील अमेरीकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

             जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) – सद्य:स्थितीत मका व ज्वारी पिकावर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. या किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास येत्या हंगामात पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सर्व तालुक्यात मका पिक क्षेत्राचे सर्व्हेक्षण करुन शेतीशाळा, झुमसभांव्दारे क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत शेतक-यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे उपाययोजनांचा अवलंब करावा. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

            शेताला रोजच्या रोज भेट देवून पिकाचे निरीक्षण करावे, ‍किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच नियंत्रण उपायांचा अवलंब करावा. पिकाच्या पानांवरील अंडीपुज, समुहातील लहान आणि मोठ्या अळ्या हाताने वेचुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात, सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग लिंग प्रलोभन सापळ्यामध्ये आकर्षित करुन मारावेत. त्यासाठी प्रती एकरी 15 लिंग प्रलोभन सापळे लावावेत, तसेच या किडीच्या सर्व्हेक्षणासाठी प्रती एकरी 5 लिंग प्रलोभन सापळे लावावेत. पक्षांव्दारे फॉलआर्मीवर्म किडीचे नैसर्गिक नियंत्रणाच्यादृष्टीने पक्षांना आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. बीजप्रक्रिया केलेल्या बियांण्याचा वापर करावा. सायंट्रेनिलिप्रोल 19.8% + थायामेथॉक्झाम 19.8 टक्के एफएस 6 मिली प्रति किलो बियाणेप्रमाणे बीजप्रक्रीया केल्यास किडीच्या नियंत्रणासाठी 15 ते 20 दिवसांसाठी प्रभावी ठरते. मका पिकाभोवती 3-4 ओळी नेपियर/ संकरीत नेपियर गवत या सापळा लागवड करावी, रेती किंवा माती अ चुनकळी यांचे 9 : 1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे, फेरोमन सापळयामध्ये प्रतिदिन सापळा 1 पतंग आढळून आल्यास सुरवातीस अंडयातील परोपजीवी किटक उदा. टेलेनोमोस रिमस 4 हजार अंडी प्रति एकरप्रमाणे एक आठवडयाच्या अंतराने दोन वेळा प्रसारण करावे. किडीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त असल्यास क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एसी 0.4 मिली प्रति लीटर पाणी, किंवा थायोमेथॉक्झाम 12.6 % +  लॅमडा सायहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेडसी 0.25 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. अथवा पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) सन 2020-21 अंतर्गत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचे अधिकृत डीलरमार्फत 50 टक्के अनुदानावर (रु.56.50/250 मिली पँकींग साईज) आपत्कालीन परिस्थितीत मका पिकांवरील विविध किडींसाठी क्विनॉलफॉस 25% ईसी या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला असुन शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा.

            किडरोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने सर्व शेतक-यांनी  वरीलप्रमाणे उपाय योजना कराव्यात. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                               0000

No comments:

Post a Comment