Wednesday, 13 August 2025

अल्पबचत भवन मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला “हर घर तिरंगा” संगीतमय सोहळा

      जळगाव दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा “हर घर तिरंगा” हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी सायं. 6.30 वाजता अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे.

     या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन जळगावतर्फे करण्यात आली असून संकल्पना नारायण बाविस्कर व हर्षल पाटील यांची आहे. दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे. कार्यक्रमात गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, भूषण गुरव, वरुण नेवे, मुकेश खैरे, डॉ. सोनाली महाजन, अंजली पाटील, रोहित बोरसे, यश महाजन व अक्षय दुसाने हे कलावंत देशभक्तीपर गीतांची मैफल सादर करणार आहेत.

          कार्यक्रम निर्मिती प्रमुख अनिल कांकरिया व अमर कुकरेजा असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. जिल्हावासीयांनी उपस्थित राहून देशभक्तीच्या स्वरांनी मन भारावून टाकण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

                                                              000000000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव, दि. 13 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, बुधवार दिनांक  13 ऑगस्ट, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

       बुधवार दिनांक 13 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी  4.00 वाजता मुंबई येथून निझमुद्दीन एक्सप्रेसने  जळगाव कडे प्रयाण.  रात्री 08.40 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन,  रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

000000000000

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

 















       मुंबई, १३ ऑगस्ट:-पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी आज कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे कुर्ला येथील जामसाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक श्रीमती माधवी सरदेशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार, क्रीडा भारतीचे कोषाध्यक्ष श्री. गणेशजी देवरुखकर, मुंबई अध्यक्ष श्री. मिलिंद डांगे आणि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र श्री. रणजित जाधव उपस्थित होते.

          ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाची मराठमोळे ढोल आणि लेझिमच्या तालावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले की, आजच्या यांत्रिक युगात मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येत आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यानिमित्त मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे तसेच विभागाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदाने उपलब्ध करून  खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विभागाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

           कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिंपिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत. हाच धागा पकडून क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की,  देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभात त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणाही श्री कोकाटे यांनी यावेळी केली.  मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी लाठीकाठी, मल्लखांब आणि तलवारबाजी य साहसी खेळांच्या प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले.  

           ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र श्री. रणजित जाधव यांनी या पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित केल्याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच तरुणांना देशी खेळांकडे आकर्षित करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २२ ऑगस्टपर्यंत क्रीडा महाकुंभ चालणार असून २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांच्या माध्यमाने मैदान गाजवणार आहेत.

०००००००००००००


हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन

          जळगाव, दि.13 ऑगस्ट ( जिमाका वृत्तसेवा ) -  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजना ह्यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागाईतदारांना कळविण्यात येते की, दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीत करीता दि. 1 जुलै, 2025 पासून सुरु होणारा खरीप हंगाम 2025 मध्ये भुसार अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी , भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

                तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं.7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत सायंकाळी 17-45 वाजेपर्यंत देण्यात यावे.

पाणी अर्ज स्विकारण्याच्या शर्ती-

          पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल, बागायतदारांनी आपआपल्या शेतचा-या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी / ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10% जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल, टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदना मध्ये नमूद केलेल्या विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहीरी बाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. असे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                         ००००००००००००

Tuesday, 12 August 2025

वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम ▪ भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल








                जळगाव दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

                ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

                आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, सुमित दादा पाटील, माजी सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान भाऊ पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पनाताई उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

०००००००००००

 

अतिशय अवघड शस्त्रक्रिया जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी येथे यशस्वी

 

                जिमाका जळगाव, दि.12 : - जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (१०० खाटांचे स्त्री रुग्णालय) येथे दाखल एका महिला रुग्णाला दीर्घकाळ पोटदुखी व अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. तपासणीत गर्भपिशवीत चार मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले.

                गाठींचा आकार मोठा असल्याने दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक) शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण होते. तरीसुद्धा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. चंदन गोपाळ महाजन यांनी यशस्वी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे तसेच भूलतज्ञ डॉ. सुनील तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (जळगाव) येथे गर्भपिशवीवरील अशा प्रकारच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी केले आहे.

०००००००००००००


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद – TAIT परीक्षा निकाल लवकरच जाहीर होणार ; अफवांवर विश्वास ठेवू नका – आयुक्त अनुराधा ओक

                 जळगाव, दि. १२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ ते ३० मे आणि २ ते ६ जून २०२५ दरम्यान करण्यात आले होते. राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत प्रतिदिन तीन सत्रांमध्ये एकूण २२८८०८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१९३०८ उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.

                गुणपत्रक किंवा वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे सादर करण्यासाठी कमाल एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र विविध संस्थांचे निकाल वेगवेगळ्या वेळी लागल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होत आहे. डी. एल. एड. परीक्षेचा निकाल ५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला असून, आता TAIT परीक्षेच्या निकालाची कार्यवाही सुरू आहे.

                निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाणार आहे. उमेदवारांनी युट्युब चॅनेल्स किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा आधार घ्यावा, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

                                                                                                     ०००००००००००