जळगाव, दि. ५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत 'राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे' ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध देशांतील शेती पद्धती, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक यंत्रसामग्री, प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रातील जागतिक बदलांचा थेट अनुभव घेता येणार आहे.
या
योजनेअंतर्गत पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपले
अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांची जिल्हास्तरावर छाननी करून वितरित
लक्षांकानुसार सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड प्रक्रिया पूर्ण
झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड झालेल्या
शेतकऱ्यांना कळविण्यात येईल, व त्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत दौऱ्याचे आयोजन
केले जाईल.
या
योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल
१ लाख रुपये इतके शासन अनुदान दिले जाणार आहे. निवड झाल्यानंतर कृषी विभागाकडून
सूचना प्राप्त झाल्यावरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. अनुदानाची रक्कम
वगळून उर्वरित खर्चच शेतकऱ्यांच्या वाट्याला येईल, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
दौरा
आयोजित होण्यापूर्वी त्यासंबंधीचे सर्व तपशील आणि सूचना जिल्हा कृषी अधिकारी
कार्यालयामार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत
कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणालाही – व्यक्ती, संस्था किंवा प्रवासी कंपनीस कोणतीही
रक्कम अदा करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अलीकडील
काळात सोशल मिडिया आणि अन्य माध्यमांतून या योजनेविषयी चुकीची व दिशाभूल करणारी
माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दौऱ्यासाठी पैसे भरावेत, अशी
भ्रामक माहिती देणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर फिरत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क
राहावे, अशा अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले
आहे.
या
योजनेतील शासकीय प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने
सांगितले आहे. या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान, जागतिक
बाजारपेठेचा अभ्यास आणि नावीन्यपूर्ण शेती पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळणार
आहे, जे शेतीतील प्रगतीस निश्चितच हातभार लावणारे ठरेल.
00000000000
No comments:
Post a Comment