·
वैद्यकीय
शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन
·
25
सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान मोफत आरोग्य पूर्व तपासणी
·
ग्रामीण
भागातील राज्यातील पहिलेच महाआरोग्य शिबिर
·
गरजू
रुग्णांनी शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकरी श्री. निंबाळकरांचे आवाहन
जळगाव, दि. 19 - मानव सेवा हीच ईश्वर
सेवा असून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उपचारासाठी महाआरोग्य शिबिरात घेऊन येणे
ही त्याहीपेक्षा मोठी सेवा आहे. ही सेवा करण्याची संधी आपल्याला महाआरोग्य
शिबिराच्या माध्यमातून लाभणार आहे. यासाठी जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने
स्वयंस्फुर्तीने काम करुन हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करावे. असे आवाहन
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी
वर्षानिमित्त वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून येत्या 2
ऑक्टोबर रोजी मधुकर साखर कारखाना मैदान, फैजपूर, ता. यावल येथे ग्रामीण भागातील
राज्यातील पहिल्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची पूर्व
तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसावळचे उपविभागीय
अधिकारी डॉ. चिंचकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बी. आर. हिवाळे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे
विशेष कार्य अधिकारी संदिप जाधव, शिबिर समन्वयक पितांबर भावसार, अरविंद देशमुख,
डॉ. आनंद जैन, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, चोपडा, जामनेर, भुसावळ, फैजपूर, यावल
तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचेसह विविध विभागांचे
अधिकारी उपस्थित होते.
या भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिरामध्ये
मुंबई, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी करण्यात
येणार असून त्यांचेवर औषधोपचार व शस्त्रक्रिया विनामुल्य केली जाणार आहे. यामध्ये मधुमेह, कर्करोग,
नेत्ररोग, दंतरोग, श्वसन विकास, हाडांचा ढिसूळपणा यांची तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच आवश्यकता भासल्यास पुढील उपचारही करण्यात येणार आहे. या शिबिरात तपासणी
करण्यास येण्यापूवी रुग्णांची येत्या 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या सप्ताहात शासकीय
ग्रामीण रुग्णालय, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, चोपडा, जामनेर, भुसावळ, फैजपूर, यावल
येथे तसेच या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांची माहिती गोळा
करण्यासाठी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे कार्यकर्ते,
शिक्षक, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस यांची मदत घेण्यात
येणार आहे. तर तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हे समन्वयकाचे काम
करणार आहे. पूर्व तपासणी करण्यासाठी ज्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसेल
त्याठिकाणी बाहेरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही बैठकीत
ठरले.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पूर्व
तपासणी झालेल्या रुग्णांना नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबिरात
आजारानुसार तपासणी केंद्र तयार करण्यात येणार असून रुग्णांच्या आजारानुसार त्या
केंद्रात जाऊन, तपासणी करुन घेणे आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक
नेमण्यात येणार आहे. शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी, औषधोपचार व
शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत केली जाणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त
नागरीकांनी लाभ घ्यावा. तसेच यंत्रणेने यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.
000
No comments:
Post a Comment