Monday, 9 September 2024

राज्यातील विविध भागात जिल्हानिहाय सामाजिक आरोग्य शिबीरे राबविण्यात येणार

             जळगाव दि. 9 ( जिमाका )  - धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, उप मुख्यमंत्री (गृह / विधि व न्याय) कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबीरे (Community Health Camp) राबविण्याबाबत मा.उप मुख्यमंत्री (गृह) महोदयांनी निर्देश दिले आहेत. सदर सामाजिक आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागांची निवड करुन तेथे राबविण्यात येणार आहेत.            या शिबिरांचा कालावधी ०१ सप्टेंबर, २०२४ ते ३१ ऑक्टोबर, २०२४ असा असणार आहे.

सदर सामाजिक आरोग्य शिबिरात रुग्णांचे स्क्रिनीग करणे, रक्त व इतर तपासण्या करणे   आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणे, तसेच रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर विविध शासकीय योजना, धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत.

            सदर सामुदायिक आरोग्य शिबिरे राज्यभर वेगवेगळ्या जिल्ह्यात दोन महिने पार पडणार असून दैनंदिन सुमारे २५० ते ५०० शिबिरे विविध जिल्ह्यामध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार आहेत.  असे कक्ष प्रमुख राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष  रामेश्वर नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000

No comments:

Post a Comment