Wednesday, 13 August 2025

अल्पबचत भवन मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला “हर घर तिरंगा” संगीतमय सोहळा

      जळगाव दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा “हर घर तिरंगा” हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी सायं. 6.30 वाजता अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे.

     या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन जळगावतर्फे करण्यात आली असून संकल्पना नारायण बाविस्कर व हर्षल पाटील यांची आहे. दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे. कार्यक्रमात गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, भूषण गुरव, वरुण नेवे, मुकेश खैरे, डॉ. सोनाली महाजन, अंजली पाटील, रोहित बोरसे, यश महाजन व अक्षय दुसाने हे कलावंत देशभक्तीपर गीतांची मैफल सादर करणार आहेत.

          कार्यक्रम निर्मिती प्रमुख अनिल कांकरिया व अमर कुकरेजा असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. जिल्हावासीयांनी उपस्थित राहून देशभक्तीच्या स्वरांनी मन भारावून टाकण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

                                                              000000000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव, दि. 13 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, बुधवार दिनांक  13 ऑगस्ट, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

       बुधवार दिनांक 13 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी  4.00 वाजता मुंबई येथून निझमुद्दीन एक्सप्रेसने  जळगाव कडे प्रयाण.  रात्री 08.40 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन,  रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

000000000000

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

 















       मुंबई, १३ ऑगस्ट:-पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी आज कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे कुर्ला येथील जामसाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक श्रीमती माधवी सरदेशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार, क्रीडा भारतीचे कोषाध्यक्ष श्री. गणेशजी देवरुखकर, मुंबई अध्यक्ष श्री. मिलिंद डांगे आणि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र श्री. रणजित जाधव उपस्थित होते.

          ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाची मराठमोळे ढोल आणि लेझिमच्या तालावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले की, आजच्या यांत्रिक युगात मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येत आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यानिमित्त मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे तसेच विभागाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदाने उपलब्ध करून  खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विभागाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

           कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिंपिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत. हाच धागा पकडून क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की,  देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभात त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणाही श्री कोकाटे यांनी यावेळी केली.  मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी लाठीकाठी, मल्लखांब आणि तलवारबाजी य साहसी खेळांच्या प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले.  

           ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र श्री. रणजित जाधव यांनी या पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित केल्याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच तरुणांना देशी खेळांकडे आकर्षित करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २२ ऑगस्टपर्यंत क्रीडा महाकुंभ चालणार असून २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांच्या माध्यमाने मैदान गाजवणार आहेत.

०००००००००००००


हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन

          जळगाव, दि.13 ऑगस्ट ( जिमाका वृत्तसेवा ) -  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजना ह्यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागाईतदारांना कळविण्यात येते की, दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीत करीता दि. 1 जुलै, 2025 पासून सुरु होणारा खरीप हंगाम 2025 मध्ये भुसार अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी , भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

                तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं.7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत सायंकाळी 17-45 वाजेपर्यंत देण्यात यावे.

पाणी अर्ज स्विकारण्याच्या शर्ती-

          पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल, बागायतदारांनी आपआपल्या शेतचा-या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी / ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10% जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल, टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदना मध्ये नमूद केलेल्या विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहीरी बाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. असे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                         ००००००००००००

Tuesday, 12 August 2025

वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम ▪ भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल








                जळगाव दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

                ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

                आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, सुमित दादा पाटील, माजी सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान भाऊ पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पनाताई उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

०००००००००००

 

अतिशय अवघड शस्त्रक्रिया जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी येथे यशस्वी

 

                जिमाका जळगाव, दि.12 : - जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (१०० खाटांचे स्त्री रुग्णालय) येथे दाखल एका महिला रुग्णाला दीर्घकाळ पोटदुखी व अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. तपासणीत गर्भपिशवीत चार मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले.

                गाठींचा आकार मोठा असल्याने दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक) शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण होते. तरीसुद्धा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. चंदन गोपाळ महाजन यांनी यशस्वी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे तसेच भूलतज्ञ डॉ. सुनील तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (जळगाव) येथे गर्भपिशवीवरील अशा प्रकारच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी केले आहे.

०००००००००००००


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद – TAIT परीक्षा निकाल लवकरच जाहीर होणार ; अफवांवर विश्वास ठेवू नका – आयुक्त अनुराधा ओक

                 जळगाव, दि. १२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ ते ३० मे आणि २ ते ६ जून २०२५ दरम्यान करण्यात आले होते. राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत प्रतिदिन तीन सत्रांमध्ये एकूण २२८८०८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१९३०८ उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.

                गुणपत्रक किंवा वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे सादर करण्यासाठी कमाल एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र विविध संस्थांचे निकाल वेगवेगळ्या वेळी लागल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होत आहे. डी. एल. एड. परीक्षेचा निकाल ५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला असून, आता TAIT परीक्षेच्या निकालाची कार्यवाही सुरू आहे.

                निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाणार आहे. उमेदवारांनी युट्युब चॅनेल्स किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा आधार घ्यावा, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

                                                                                                     ०००००००००००

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) * तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ* कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

                 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.

                महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजना, ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.

                महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय, निमशासकीय, शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.

                राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजना, बीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजना, तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

                या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटी, आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.  यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

००००००००००००

(विमानचालन विभाग) सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

                सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

                केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे. 

                या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

                                                                                      ००००००००००००००

(अन्न, नागरी पुरवठा विभाग) राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

                 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

                अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.

                या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

०००००००००००००

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. १२ ऑगस्ट, २०२५ मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४) (गृह विभाग) महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

                 महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

                राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी,  पोलीस शिपाई – १० हजार ९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

                भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

                राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

०००००००००००००

Monday, 11 August 2025

फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण

             जळगाव दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन,खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जे. के. चव्हाण, संजय गरुड, प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे,  कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

            गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली असताना पुतळ्याचे अनावरण होताच पावसाने दमदार हजेरी लावली, ज्यामुळे उपस्थितांनी महाराजांचे आगमन लाभदायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार असून पिकांना जीवदान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

            कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ युद्धाचा नसून तो लोककल्याण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मनिरपेक्षतेचा आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केवळ तलवारीच्या बळावर केली नाही, तर प्रजेला न्याय, सुरक्षा आणि स्वाभिमान दिला. आजच्या तरुण पिढीनेही त्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले पाहिजे. या शिवसृष्टीतून भावी पिढीला इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन होईल. शालेय विद्यार्थी, तरुण, नागरिकांनी येथे येऊन महाराजांचा संघर्ष, शौर्य आणि दूरदृष्टी यांचा अभ्यास करावा.

            ते पुढे म्हणाले, गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात उभारलेली शिवस्मारके ही एक ऐतिहासिक चळवळ आहे. ती गावागावात प्रेरणेचे केंद्र बनतील. पुतळा हा केवळ धातूचा नसतो, तर तो आपल्या विचारांचा, संस्कारांचा आणि वारशाचा जिवंत पुरावा असतो. पावसाने आजच्या सोहळ्यावेळी हजेरी लावली ही केवळ योगायोग नसून आपल्या भूमीवरील शिवमहाराजांविषयीचा आशीर्वाद असल्यासारखे वाटते.

            यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. निर्व्यसनी राहून आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. एकजुटीने समाजाच्या सेवेत राहावे. तसेच, जामनेर तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून गावागावात प्रेरणा पोहोचवण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

            शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जामनेर आगमनावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर तोंडापूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, नागरिक, शिवप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००००००००००

भडगाव तालुक्यातील गुढे गावचे शूर जवान सोनवणे स्वप्निल यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू ▪ सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावकडे रवाना

             जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) सोनवणे स्वप्निल सुभाष (क्र. १४०७०१८६५) यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे.

            ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२३ वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली. जवान सोनवणे हे सीमा फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्त करण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून काँक्रिट बेसवर पडले. त्यांना तत्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यासह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सायं. ८.३५ वाजता डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

            मूळ गाव गुढे ता. भडगाव, जि. जळगाव येथे सैनिकी सन्मानाने  मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार असून या संदर्भात पोलीस प्रशासनास सीमा सुरक्षा दलाने सहकार्याची विनंती केली आहे.

शेतकरी व पशुपालक यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन ▪ बिबट्याच्या हल्ल्यात मृतक इंदुबाई पाटील यांच्या वारसांना 10 लाखांचा धनादेश सुपूर्द

             जळगाव दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – देवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी ट्रॅप व पिंजरे लावण्यात आले असून, RRT पथक सतत गस्त घालत आहे. शेतकरी व वनमजूर यांनी शेतात जाताना एकटे न जाता समूहाने जावे, गुरेढोरे बंदिस्त ठेवावीत आणि विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मृतकाच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, एकूण 25 लाखांच्या आर्थिक मदतीपैकी आज 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून, उर्वरित 15 लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येईल. प्रशासन व वन विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घटनेची पार्श्वभूमी

            दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता महरूण परिमंडळातील मौजे देवगाव फुकणी येथे शेतात कपाशी पिकाची निंदणी करत असताना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात 73 वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेत (गट क्र. 55) गिरणा नदीलगत असून, वनपरिक्षेत्र एरंडोल व राजवड यांच्या सीमेजवळ आहे. हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन वन्यप्राणी हुसकावून लावला. पोलिस पाटील यांनी वन विभागाला कळवून घटनास्थळी वनक्षेत्राधिकारी, कर्मचारी, RRT पथक आणि पोलिस विभागाने धाव घेऊन पंचनामा केला.

            घटनेनंतर त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे व पिंजरे बसवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी फुकणी गावाजवळ बिबट्याने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यावरही तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

वारसांना पालकमंत्री यांच्या धनादेश सुपूर्द

            शासन नियमांनुसार एकूण 25 लाख सानुग्रह अनुदानापैकी मृतकाच्या वारसांना आज 10 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर, नायब तहसीलदार राहुल वाघ, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, दिपक सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, सरपंच जितु पाटील, किशोर पाटील, समाधान सपकाळे, योगेश पाटील, दिलीप आगिवाल, गोपाल जिभाऊ, मुरलीधर अण्णा पाटील, प्रमोद सोनवणे, बाला शेठ राठी, गजानन सोनवणे, वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक भरत पवार, अजय रायसिंग, रहीम तडवी, हरेश थोरात, विलास पाटील, राहुल पाटील, गोकुळ सपकाळे, पोलिस पाटील रमेश पाटील तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले, तर आभार पोलिस पाटील रमेश पाटील यांनी मानले.

०००००००००००००

जळगावकरांसाठी पुण्याच्या प्रवासाची जलद व आधुनिक सुविधा; नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ▪ भुसावळ आणि जळगाव रेल्वेस्टेशनवर वंदे भारत गाडीचे जंगी स्वागत

             जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) – जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे.

            भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या. जळगाव स्थानकावर खासदार श्री. उज्वल निकम, खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि आमदार श्री. सुरेश (राजीव मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

            नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एकाच वेळी बेंगळुरू–बेळगाव आणि कटरा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचाही शुभारंभ केला.

            नागपूर (अजनी)–पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचे अंतर जवळपास 12 तासात पूर्ण होईल. गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड स्थानकांवर थांबत पुण्यास पोहोचेल. स्थानके फुलांच्या तोरणांनी, पताकांनी सजवण्यात आली होती आणि प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झाले.

               मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नगर–पुणे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्याचा नगर–दौंडमार्गे होणारा 100 ते 125 किमीचा अतिरिक्त फेरा टाळण्यासाठी नगर–पुणे थेट मार्ग विकसित करण्याचे नियोजन सुरू असून, छत्रपती संभाजीनगर–अहमदनगर–पुणे औद्योगिक पट्टा वेगाने विकसित करण्यासाठी या प्रकल्पाचा विचार ‘राईट ऑफ वे’ अंतर्गत करता येईल, असे ते म्हणाले.

            पुणे–अजनी वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत असून, ट्रेन क्रमांक 26101 पुणे स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6.25 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 26102 अजनी स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 9.50 वाजता पुण्यास पोहोचेल. गाडीत 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) आणि 7 चेअर कार (CC) असून, सर्व डबे वातानुकूलित, स्वयंचलित तापमान नियंत्रणयुक्त, एर्गोनॉमिक आसन व्यवस्था, मोठ्या पॅनोरामिक खिडक्या, बायो–व्हॅक्यूम शौचालये, स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे, सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन संवाद प्रणाली व ड्युअल सस्पेन्शनसह सुसज्ज आहेत.

            'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, ‘एक भारत जोडलेला भारत’ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. या सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

००००००००००००

वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे.

            रात्री 10.45 वाजता भुसावळ येथील निवासस्थानातून रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.  रात्री 11.05 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे प्रयाण.                                  

                                                                     ००००००००००

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन हे रविवारी 10 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून दौरा पुढील प्रमाणे.

            दुपारी 3 वाजता ते जळगाव विमानतळावर आगमन करून मोटारीने तोंडापूर, ता. जामनेर येथे रवाना होतील. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास, तसेच जाहिर सभेस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले, यांच्या समवेत उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

            सायंकाळी 4.40 वाजता तोंडापूर येथून फत्तेपुर येथे आगमन करून शिवसृष्टी उद्घाटन व लोकार्पण सोहळा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रीड अॅन्युटी मॉडेल (HAM-2) अंतर्गत विविध प्रकल्पांच्या ई-भूमीपूजन सोहळ्यास दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतील.

            यानंतर सायंकाळी 5.40 वाजता फत्तेपुरहून जामनेर येथे त्यांच्या खाजगी निवासस्थानी सदिच्छा भेट, तर 6.30 वाजता वीन हेरिटेज शासकीय विश्रामगृह इमारतीची पाहणी करून सायंकाळी 6.50 वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. रात्री 7.20 वाजता ते जळगाव विमानतळावरून पुढील प्रवासासाठी रवाना होतील.

 वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा

००००००००००००

“रानभाजी खा... निरोगी रहा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪ ८० स्टॉलमधून पावसाळी हंगामातील रानभाज्यांची विविधता रसिकांसमोर

             जळगाव, दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा फार मोठा वाटा आहे. आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वडिलोपार्जित रानभाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. रानभाज्या ही खरी निसर्गाची देण असून त्यावर रासायनिक फवारणी नसल्याने त्या सेंद्रिय, सुरक्षित व पोषक असतात. कोरोना काळात याच रानभाज्यांनी अनेकांना आरोग्य लाभवला होता. नव्या पिढीला यांची ओळख करून देणारा हा रानभाजी महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. पावसाळी हंगामात मिळणाऱ्या या भाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ‘रानभाजी खा... निरोगी रहा’ हा मूलमंत्र सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

            जळगाव शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव-पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी गट व महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्यांचे आणि प्रक्रिया उद्योगाचे तब्बल ८० स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधतेचा मेवा रसिकांसमोर मांडला. उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या वेळी विविध रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या तर्फे 75 गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीची दप्तरं वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी महिलांनी रान मेवा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

बहिणींनी बांधल्या पालकमंत्र्यांना राख्या

            पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज रान भाज्या महोत्सवाचे उदघाटन केल्या नंतर या रानभाजी महोत्सवात सहभागी बहिणींनी काल झालेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज पालकमंत्र्यांना राखी बांधून भावा प्रतीचा स्नेह दाखवून दिला. तर पालकमंत्र्यांनी आपल्या या सर्व बहिनींच्या मदतीसाठी कायम तत्पर असल्याचे बोलून दाखविले.

             महोत्सवात यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य व वाद्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. ग्राहकांसाठी रानभाज्यांची विक्रीबरोबरच विविध रानभाज्यांच्या पाककृतींची माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडेल अधिकारी (स्मार्ट)  श्रीकांत झांबरे यांनी केले, तर आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.

            या प्रसंगी आ. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००००००

विरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळावा उत्साहात साजरा

             जळगाव दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याची पराक्रमी व कर्तृत्ववान राणी दुर्गावती यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर विरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रकल्प कार्यालय, यावल येथे करण्यात आले.

            या मेळाव्यास दोन ते तीन हजार आदिवासी महिला उपस्थित होत्या. राज्यातील आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण आदी सर्व क्षेत्रात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत वैयक्तिक लाभासाठी ५० हजार रुपये आणि सामूहिक योजनेसाठी ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यापुढे आर्थिक सहभाग भरण्याची गरज राहणार नाही.

            कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांमार्फत आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत निवड झालेल्या महिलांना लाभांचे वाटप करण्यात आले. आदिवासी कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पारंपरिक व बोलीभाषेतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

            प्रकल्प कार्यालय, यावल येथे झालेल्या स्थानिक कार्यक्रमाचे उद्घाटन  आमदार अमोल जावळे, श्री. धनंजय चौधरी, प्रांताधिकारी बबन काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, मध्यप्रदेशातील महामानव क्रांतीकारक तंट्या भील यांचे वंशज, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

            सामाजिक संस्थांच्या मिरवणुका, जीवंत व चित्ररुपी देखावे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. पंचक्रोशीतील सात ते आठ हजार आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

००००००००००००

 

काही पशुपालकांकडून गाठींचा आजार (Lumpy Skin Disease) झालेल्या गुरांची योग्य काळजी घेतली जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा दुर्लक्षामुळे संबंधित गुरांचा मृत्यू होत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कायदेशीर जबाबदारी व शिक्षा

            •प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act, 1960) च्या कलम 3 नुसार, पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घेणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे.

            •या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास, कलम 11(1) अंतर्गत ही दंडनीय गुन्हा आहे.

प्राण्यांची जप्ती

            •महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम, 1976 (The Maharashtra Animal Preservation Act, 1976) च्या कलम 9 नुसार, ज्यांची योग्य काळजी घेतली जात नाही अशा जनावरांना विनाअनुदान जप्त केले जाईल.

 गंभीर दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्यास

            •भारतीय न्याय संहिता, 2023 (Bharatiya Nyaya Sanhita, 2023) च्या कलम 291 व 325 अंतर्गत, गाठींचा आजार झालेल्या जनावरांची काळजी न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यास एफ.आय.आर. नोंदविण्यात येईल. यामध्ये कैदेची व दंडाची तरतूद आहे.

उपचाराचे पालन आवश्यक

            •जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी बाधित जनावरांवर उपचार करत असून, ते पशुपालकांना लेखी औषधोपचाराची पर्ची देतील.

            •सर्व पशुपालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

सर्व पशुपालकांना आवाहन आहे की, आपल्या गुरांची वेळोवेळी तपासणी करून, गाठींचा आजार झाल्यास त्वरित उपचार घ्यावेत. दुर्लक्ष आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जनावरांची काळजी ही केवळ मानवी जबाबदारीच नाही, तर कायद्याने बंधनकारक कर्तव्य आहे.

०००००००००

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले 10 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव दि. १० (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून), मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोंसले  रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौरा पुढील प्रमाणे.

            दुपारी ०२.०० वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून VT-VRL या खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण करून दुपारी ०३.१० वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी, तोंडापूर, ता. जामनेर येथे प्रस्थान करतील. सायं. ०४.०० ते ०४.१० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व शिवसृष्टी लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर ०४.१० ते ०४.४० पर्यंत तोंडापूर येथेच आयोजित जाहिर सभेला उपस्थित राहतील.

            सायं. ०४.४० वाजता तोंडापूर येथून फतेपूर, ता. जामनेर येथे प्रस्थान करून ०४.५५ ते ०५.०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व शिवसृष्टी लोकार्पण सोहळा कार्यक्रमास हजेरी लावतील. त्यानंतर ०५.०० ते ०५.४० वाजता फतेपूर येथेच आयोजित जाहिर सभा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत विविध कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित राहतील.

            यानंतर ०५.४० वाजता फतेपूर येथून 'नंदादीप' निवास, बजरंगपुरा, ता. जामनेर येथे जाऊन ०६.०५ ते ०६.३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सदिच्छा भेट घेतील. ०६.३० वाजता 'नंदादीप' येथून नवीन हेरिटेज शासकीय विश्रामगृह, जामनेर येथे प्रस्थान करून ०६.३५ ते ०६.५० वाजता इमारतीची पाहणी करतील.

यानंतर ०६.५० वाजता विश्रामगृहातून जळगाव विमानतळाकडे प्रयाण करून ०७.२० वाजता विमानतळावर पोहोचतील आणि ०८.०० वाजता खाजगी विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

                                                                                     0000000000