जळगाव, दि. ८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात येणार आहे. यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम चोपडा रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.
कार्यक्रमाचे
उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते
होणार आहे. आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्थांच्या सहभागाने मिरवणुका,
जिवंत देखावे व चित्ररुपी सादरीकरण करण्यात येणार आहेत. या सादरीकरणातून आदिवासी समाजाचे
इतिहास, परंपरा, संघर्ष व शौर्य यांचे दर्शन घडवले जाणार आहे.
राणी दुर्गावती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम
आदिवासी
समाजातील महान योद्धा विरांगणा राणी दुर्गावती यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून, महिला
सक्षमीकरण व सबलीकरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. विरांगणा
राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी नागपूर येथे कविवर्य
सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे दुपारी १२.३० वा. मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावल येथील शासकीय
कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.
जिल्हावासीयांना सहभागाचे आवाहन
यावल येथील मुख्य कार्यक्रमासाठी मा. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी,
आदिवासी सेवक, विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, आश्रमशाळा व वसतिगृहातील
विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पंचक्रोशीतील सर्व आदिवासी बांधव व भगिनी यांना उपस्थित
राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, इतिहास,
संस्कृती आणि योगदानाचे स्मरण करत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल चे प्रकल्प
अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनसामान्यांना सामील होण्याचे आवाहन
केले आहे.
No comments:
Post a Comment