जळगाव, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील बनोली, जि. वाराणसी येथून वितरीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिनांक २ ऑगस्ट २०२५ हा दिवस ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे.
या
अनुषंगाने शेतकरी बांधवांमध्ये योजनेच्या पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रांची माहिती
पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच इतर माहिती, शिक्षण आणि संवाद
(IEC) उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
या
दिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री (पाणीपुरवठा) हे भूषविणार असून कार्यक्रमाला सकाळी
१०.०० वाजता सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाचे
उद्घाटन भारत सरकारच्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा
मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचीही प्रमुख उपस्थिती
लाभणार आहे.
या
कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी माहितीपर सादरीकरण, शेतकऱ्यांचे
सुसंवाद व मार्गदर्शन सत्र, शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा व उपाययोजना यांचे आयोजन
करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती देणे, तसेच योजना पारदर्शक
व प्रभावीपणे लागू होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या
कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन
वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद तसेच जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000000000
No comments:
Post a Comment