जळगाव, दि. 4 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)- धनगर समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सुरू असलेली ही योजना शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्याकरिता थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात आर्थिक मदत पुरवते.
योजना ही ज्या विद्यार्थ्यांनी इ. १२ वी
नंतरच्या विविध तांत्रिक, व्यवसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी
मान्यताप्राप्त महाविद्यालयांत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला
आहे, परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी लागू
आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र, विभागीय शहरे तसेच जिल्हास्तरावरील
व तालुकास्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेत बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी.
अशा पदवी अभ्यासक्रमांमध्ये तसेच एम.ए., एम.एस.सी. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमात
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. हे अर्ज पूर्णपणे
ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दि. १७ ऑगस्ट २०२५
पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. कोणताही अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा कार्यालयात
प्रत्यक्ष जमा केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. दरम्यान,
तांत्रिक व व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र
वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे.
या योजनेच्या संदर्भात अधिक
माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव कार्यालयाशी
संपर्क साधावा, असे आवाहन योगेश पाटील,
सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.
00000000000
No comments:
Post a Comment