Tuesday, 5 August 2025

_रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव_ ▪ तालुकास्तरावर 9 ते 15 ऑगस्टदरम्यान रानभाजी सप्ताहाचे आयोजन

         जळगाव, दि. 5 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव रविवार, दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.

            या महोत्सवाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

            सकस अन्नामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचा समावेश अत्यंत उपयुक्त असतो. या रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारले जात नसल्यामुळे त्या आरोग्यास अधिक लाभदायक ठरतात.

            या महोत्सवामध्ये करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व थेट विक्री होणार आहे. तसेच, रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थही चवीनिशी उपलब्ध असतील.

            या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात दि. 09 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत तालुका स्तरावर रानभाजी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

            या निमित्ताने इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा तपशील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

०००००००००००

 

No comments:

Post a Comment