जळगाव, दि. ८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी बँकेपैकी एक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांची १४४ वी जयंती देशभर विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने बँकेच्या वतीने त्यांच्या संपूर्ण सेवा कालखंडात सहकार्य करणाऱ्या भागधारकांचे, ग्राहकांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
बँकेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये
प्रादेशिक प्रमुख श्री. रमेश जठानी यांनी संस्थापक सर पोचखानवाला यांच्या योगदानाची
आठवण करून दिली. त्यांनी बँकेचा गौरवशाली इतिहास, सामाजिक बांधिलकी, आर्थिक समावेशनातील
योगदान आणि नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. ग्राहकहिताला
सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
या विशेष प्रसंगी ग्राहकांसाठी विविध नवीन
योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी ‘सेंट गृहलक्ष्मी’ नावाने खास बचत खाते,
ज्यामध्ये महिलांना विशेष लाभ, सुलभ व्यवहार आणि सेवा शुल्कातील सवलती उपलब्ध करून
दिल्या जात आहेत. ‘सेंट ज्वेलरी’ हे विशेष फायदे असलेले बचत खाते आणि ‘सेंट व्यापार’
हे डिजिटल सुविधांनी सुसज्ज चालू खाते व्यापाऱ्यांसाठी सादर करण्यात आले आहे.
यासोबतच संपत्ती व्यवस्थापनासाठी जीवन विमा,
सामान्य विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, डीमॅट खाते व एसआयपी यासारख्या सेवा एका छताखाली
उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सेंट गृहलक्ष्मी गृहकर्ज
योजना, इलेक्ट्रिक दुचाकीसाठी सेंट ई-डी व्हीलर कर्ज योजना आणि ग्रामीण भागातील महिला
उद्योजकांसाठी रेड अप इंडिया योजना सादर करण्यात आली आहे. या योजनांद्वारे महिलांना
स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जाणार आहे.
देशभरातील ९० समर्पित महिला शाखांमार्फत महिलांना स्वतंत्र, सुरक्षित
व सल्लामूल्य बँकिंग सेवा देण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय सूक्ष्म,
लघु व मध्यम उद्योग (MSME) तसेच वैयक्तिक ग्राहकांसाठी आकर्षक व सुलभ रिटेल कर्ज योजना
देखील राबवण्यात येत आहेत.
या विशेष दिनाचे औचित्य साधून सेंट्रल बँक
ऑफ इंडियाच्या RSETI (Rural Self Employment Training Institute) येथे वृक्षारोपणाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला. योजनांबाबतच्या
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.centralbankofindia.co.in किंवा संपर्क
क्रमांक 7900123123 वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००००००००
No comments:
Post a Comment