Wednesday, 22 January 2025

खान्देश स्पिनिंग अॅड विव्हिंग मिल्स लिमिडेटच्या माजी कामगारांना व मृतांच्या वारसांना कायदेशीर देणी मिळवण्याकरिता दावा दाखल करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 22(जिमाका)- जळगावातील खान्देश स्पिनिंग अॅड विव्हिंग मिल्स कंपनी लिमिडेट ही कापड गिरणी सन १९८४ मध्ये बंद पडली होती. उच्च न्यायालयाकडून या  गिरणीच्या अनुषंगाने नेमलेल्या अवसायकने (Official Liquidator) एकूण २,५९६ कामगारांच्या रक्कमा निश्चित केलेल्या आहेत. दिलेल्या आदेशानुसार, मे. खान्देश स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स लिमिटेडच्या आस्थापनेचे कामगार हे पूर्ण ९% व्याजदराने कायदेशीर देणी मिळण्यास पात्र आहेत.

             या कामगारांना क्लेम वितरणासाठी सर्वोच्च न्यायालाने सुरुवातीस सहा महिन्यांची मुदत दिलेली होती. तथापि सदर कामगारांनी वेळेत दावे दाखल केलेले नसल्याने त्यानंतरही वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दावा  दाखल करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. मात्र अद्यापही एकूण ४७६ कामगारांनी किंवा त्यांच्यापैकी मयत झालेल्या कामगारांच्या कायदेशीर वारसांनी, राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांच्याकडे त्यांच्या कायदेशीर देणींचा दावा दाखल केलेला नाही.

                कामगारांपैकी जर कोणत्याही माजी कामगाराचे निधन झाले असेल, तर मृत कामगाराचे कायदेशीर वारसदार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळप्रतींसह सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कडे किमान एक महिन्याच्या आत सदर कायदेशीर रक्कमा मिळण्यासाठी दावा (Claim) दाखल करू शकतात.

             तरी या कापड गिरणीत काम करीत असणाऱ्या तमाम कामगार व  मयत कामगारांच्या वारसदार असे एकूण ४७६ माजी कामगारांनी सदर कायदेशीर देणींचा दावा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पहिला मजला, पंचमुखी हनुमान मंदिर- स्वातंत्र्य चौक रोड, जळगाव येथील सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात पुरावे दाखल करावे असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००००००००

No comments:

Post a Comment