Monday, 19 October 2020

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

             जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - सप्टेंबरच्या दुस-या पंधरवाडयात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 5 टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तो 10 टक्के झाला. सद्यपरिस्थतीतील वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे, त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील उपाययोजना कराव्यात.

 फेरोमोन सापळयाचा वापर करावा, यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरेमान सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे, फुलावस्थेत दर आठवडयाने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळया ( गुलाबी बोंडअभ्र ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या, 5 टक्के निंबोळी अर्क किंवा  अेंझोडिरेक्टीन 0.03 ( 300 पीपीएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के ( 1500 पीपीएम) 25 मिली प्रति 10 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येकआठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून  निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळयाची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढ-या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ( 5 ते 10 टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॉम किंवा क्विनोलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडीक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवश्यकते नुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लँब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के  5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के +  सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्य 14.5 टक्के + ॲसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मिली  असे विभागप्रमुख किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment