Wednesday, 11 November 2020

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबरपासून

            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. यातंर्गत दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दिनांक 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले नागरीक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे वंचीत नागरीक पदनिर्देशित ठिकाणी नमुना-6 अर्ज भरुन मतदार महणून नोंदणी करु शकतील.

             तसेच एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना-7 अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे नमुना-8 अर्ज भरुन आपल्या नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल, अथवा नमुना-8 अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघातंर्गत आपला पत्ता बदलता येईल. याबाबतचे दावे/हरकती दिनांक 5 जानेवारी, 2021 पर्यत निकालात काढण्यात येणार असून दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

        यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर एकूण 3 हजार 587 मतदार केंद्रस्तरीय अधिकारी          (BLO) यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या संपर्कासाठी यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नागरीकांना nvsp.in या संकेतस्थळावरुन देखील विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करता येतील.

           तरी या विशेष मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील नागरीकांनी घेवुन युवा मतदार नोंदणी तसेच मतदार यादीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment