Friday, 6 November 2020

अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

         जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.6:-   अन्न व औषध प्रशासन  जळगाव या कार्यालयामार्फत दिवाळी सणानिमित्त जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने खादयतेला बाबत प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून  जिल्हयातील खादयतेल मिठाई दुग्धजन्य पदार्थ इत्यादीवर नजर ठेवणे कामी धडक  मोहीम सुरु केली आहे. त्याअनुषंगाने आज 6  नोव्हेंबर,2020 रोजी चाळीसगाव शहरातील मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल  स्टेशन रोड चाळीसगाव येथे अन्न सुरक्षा अधिकारी  विवेक पाटील यांनी धाड टाकून विक्री करिता पॅक केलेले रिफाइन्ड सोयाबीन तेलाचा नमुना घेऊन 15 लिटरचे 49 कॅन्स व 16 बॅरल प्रत्येकी 180 किलो  असा एकूण रु 393310/- एवढया किमतीचा खाद्यतेलसाठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरुन जप्त केलेला आहे.

            तरी नागरिकांनी मिठाई ,खाद्यतेल तसेच इतर अन्न पदार्थ खरेदी करण्यापूर्वी   त्याचा समूह क्रमांक व उत्पादन  तिथी  तपासूनच  खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्याकडून पक्के  खरेदी बिल घ्यावे. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  जळगाव यो. को. बेंडकुळे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                             *******

No comments:

Post a Comment