जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा ) - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या
प्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष
प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रभारी समाजकल्याण
अधिकारी विनोद चावरिया, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नंदा रायते, उपयुक्त राकेश
महाजन, राजेंद्र कांबळे, नाट्य कलावंत शंभु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,
रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र, वसतिगृह प्रवेश पत्र यांसह विविध योजनांच्या
लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी व लाभांचे वाटप करण्यात आले.
आमदार
भोळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सामाजिक न्याय धोरण हे गोरगरीबांना न्याय
देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. शाहू महाराजांनी समाजासमोर आदर्श
राज्यकर्त्याचे उदाहरण ठेवले. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार
मांडला. याच भावनेने आपण त्यांच्या जयंती निमित्त एकत्र यावे व ‘एक पेड माँ के
नाम’ अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी
आयुष प्रसाद यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शाहू महाराज हे प्रशासकीय
सुधारणांचे जनक होते. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुधारणा यावर त्यांचा भर होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “जातीमुक्त
समाज” या स्वप्नाची पायाभरणी शाहू महाराजांनी केली. त्यांनी
सांगितले की, मानसिक शक्ती ही यशाचा मुख्य घटक असून व्यसनमुक्त जीवन ही यशस्वीतेची
गुरुकिल्ली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेऊन त्यातून शिकण्याचा
संदेश दिला.
कार्यक्रमात जागतिक अमली पदार्थ
विरोधी दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाची
सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खासदार मा. स्मिता वाघ यांच्या
हस्ते हिरवी झेंडी दाखवून काढण्यात आलेल्या समता दिंडीने झाली. समाजिक समतेचा
संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समारोपाला आली.या वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन
चरित्र्यावर नाट्य कलावंत शंभु पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तर विनोद ढगे
यांच्या चमुने विविध पथनाट्य या वेळी सादर केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी
केले.
या
सामाजिक न्याय दिनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने
यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी,
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले.
समता दिंडीद्वारे सामाजिक समतेचा संदेश
खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडीची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. सामाजिक समतेचा संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समारोपाला आली. या दिंडीमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था, अधिकारी-कर्मचारी, व समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
0000000000000000














No comments:
Post a Comment