जळगाव,
दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) - राज्य शासनाच्या 22 ऑगस्ट, 2017 च्या निर्णयानुसार 1
जानेवारी ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम
2000 चे नियम 5 (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापरावर
श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज
इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2020 वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून
सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार
पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी जानेवारी ते डिसेंबर या काळात जळगाव जिल्ह्यात
सालाबादप्रमाणे सण व उत्सव साजरे होणार असल्याचे कळविले आहे. त्याप्रमाणे
यावर्षातील खालील साजरे होणारे सण आणि उत्सवांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी
डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
रात्री
12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सव आणि
त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल, महाराष्ट्र दिवस-1मे, गणेशोत्सव पाचवा
दिवस-26 ऑगस्ट, गणेशोत्सव सातवा दिवस- 28 ऑगस्ट, अनंत चतुर्दशी-1 सप्टेंबर,
नवरात्रोत्सव अष्टमी/नवमी-24ऑक्टोबर, विजयादशमी/दसरा-25 ऑक्टोबर, दिपावली -14
नोव्हेंबर, ईद-ए-मिलाद-30ऑक्टोबर, ख्रिसमस-25 डिसेबर, वर्षअखेर-31 डिसेंबर.
याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
ध्वनीक्षेपक
व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देतांना मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी
प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व मा.
न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सुट राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू
नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहिल.
घ्वनीक्षेत्रक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सूट दिल्यानंतरि ध्वनी प्रदूषण (नियमन व
नियंत्रण ) नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. या नियमातंर्गत
स्थापन केलेल्या प्राधिरणाने त्यांचेकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाने
16 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवित पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक
आहे.
तरी
जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सूटचा लाभ
घेतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment