Friday, 7 February 2020

बाल कलाकारांकडून काम करुन घेताना राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे


            जळगाव, दि. 6 (जिमाका) - सिनेमा, टी.व्हीवरील मालिका तसेच जाहिरातींमध्ये बाल कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाल कलाकारांकडून कामे करुन घेतांना कामाच्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळावे, त्यांच्यावर कोणताही अन्याय होवू नये. याकरीता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी सर्व संबंधितांनी पार पाडणे आवश्यक आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            करमणूक व प्रसार माध्यमे यांच्यामध्ये सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. सिनेमा, टि.व्ही. वरील मालिका, मिडियातील जाहिराती व संगीत यामध्ये मागील काही वर्षात खुप मोठ्या प्रमाणात लक्षवेधी प्रगती झालेली आहे. त्यात बाल कलाकारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. बाल कलाकारांना अशाठिकाणी काम करीत असताना संरक्षण मिळावे, ते बाल हक्कांपासून वंचित राहू नये, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, आदि बाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सन 2010-2011 मध्ये मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
            बालक ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे अथवा काम करणार आहे त्या कार्यक्रमातील घटक/आशय बालकाच्या वयानुसार असावा. आशय फार किचकट स्वरूपाचा नसावा. घटक/आशय बालकाच्या मानसिक, सामाजिक, भावनिक व शारीरिक स्थितीशी अनुरूप असावा. ज्या टि.व्ही. मालिका व रिॲलिटी शो मध्ये बालक सहभागी होणार आहे, त्यात बालकाच्या वयाप्रमाणे कामाचे तास ठरविण्यात यावेत. बालकाला ठराविक कालावधीनंतर विश्रांती मिळेल याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. बालकाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने काम करतेवेळी त्याच्या पालकांपैकी एकतरी व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. बालक मानसिक, भावनिक व शारीरिक दृष्ट्या सुरक्षित राहिल याची सबंधित यंत्रणेने खात्री करावी. सहभागी होणाऱ्या बालकाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांना पुरेसे व वेळेवर मानधन मिळेल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहिल.
            याप्रमाणे विविध विषयांवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने गाईडलाईन फॉर चाईल्ड ॲक्टर (Guidelines for child actor) या सदराखाली मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment