Tuesday, 11 October 2022

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

             जळगाव, दि.११ (जिमाका वृत्तसेवा) :-  राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे तिन टप्प्यांत आयोजन करण्यात आलेले आहे. त्यातील प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. प्रचार व प्रबोधनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हयातील एकुण २८ नवउद्योजकांनी त्यांच्या नवसंकल्पनांची नोंदणी केलेली असुन, यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरणाच्या दुस-या टप्प्यात सदर नवउद्योजकांसमोर प्रथमतः नवउद्योजकतेबाबत माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तद्नंतर नोंदणीकृत नवउद्योजकांना त्यांच्या नवसंकल्पनांचे उपस्थित पंच सभासद (Jury Members) यांच्या समोर सादरीकरण करावयाचे आहे. पंचांद्वारे नवसंकल्पनांचे मुल्यांकन करण्यात येणार असून त्याद्वारे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीकडून जिल्हास्तरावर एकूण तिन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक रक्कम रु.२५,०००/-, द्वितीय पारितोषिक रक्कम रु.१५,०००/, तृतीय पारितोषिक रक्कम रु.१०,०००/- राहणार आहे.

          सदर दुस-या टप्प्यातील प्रशिक्षण शिबीर व सादरीकरणाचा कार्यक्रम (बुट कॅम्प)         मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०६.०० दरम्यान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांचे), जळगाव येथे नियोजीत करण्यात आलेला असून ज्या इच्छुक नवउद्योजक, नाविन्यपूर्ण संकल्पना असणा-या व्यक्तींना स्पर्धेत/बुट कॅम्पमध्ये भाग घ्यावयाच आहे त्यांनी mahastartupyatra.in या लिंकवर दिनांक १३ ऑक्टोबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत नोंदणी केल्यास त्यांना सादरीकरणामध्ये भाग घेता येईल.

          सर्व जिल्हयांतील सादरीकरण सत्रानंतर एकदिवसीय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी मुंबई येथे आयोजित करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख अनुदान तसेच इन्क्यूबेशन सहाय्यक, बीज भांडवल/ निधीसाठी सहाय्यक, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व सज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफटवेअर क्रेडिटस, क्लाऊड क्रेडिटस सारखे इतर लाभही पुरविण्यात येतील. असे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     00000

No comments:

Post a Comment