Thursday, 26 July 2018

जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या प्रारुप याद्या प्रसिध्द जिल्ह्यातील मतदान केंद्रामध्ये 171 ने वाढ, भुसावळ मतदार संघात 42 मतदान केंद्र वाढले तर जळगाव शहर मतदार संघात 17 मतदान केंद्र कमी झाले

        जळगाव, दि. 26 - भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देवून पडताळणी करीत आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरणाचे काम सुरु असून जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या प्रारुप याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील मतदान केंद्रात 171 ने वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
     जळगाव जिल्ह्यातील जी मतदान केंद्र नादुरुस्त झाली होती. तसेच ज्या मतदान केंद्राची मतदार संख्या 1400 मतदारांपेक्षा अधिक झालेली होती. तसेच सुसुत्रीकरण करताना एका कुटुंबाचे सदस्य आणि शेजार व त्याच पत्त्यावर राहणारे मतदार एकाच मतदान केंद्रात समाविष्ट करणे, कुटूंबातील सदस्यांची विभागणी होणार नाही. एका इमारतीतील मतदार एकाच भागात असावेत, कोणत्याही मतदाराचे मतदान केंद्र दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असू नये. या सर्व बाबींचा विचार करुन अशा ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावीत करण्यात आले असल्याने जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदार संघात आता मतदान केंद्रांची संख्या 3531 वर गेली आहे. पूर्वी ही संख्या 3360 इतकी होती. आता यामध्ये 171 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात सर्वाधिक 42 मतदान केंद्र वाढले असून जळगाव शहर मतदार संघातील मतदान केंद्र 17 ने कमी झाले आहे. 
     मतदान केंद्राच्या प्रारुप याद्या निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्ह्यातील सर्व संबधीत विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी तसेच संबंधीत विधानसभा मतदार संघाच्या तालुक्याच्या ठिकाणी मतदारांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या आहे. ही यादी www.jalgaon.nic.in या संकेत स्थळावर सुध्दा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे यांनी दिली आहे.
               जिल्ह्यातील मतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सदर मतदान केंद्राच्या प्रारुप याद्यांवर ज्या कुणाला हरकती किंवा सूचना दाखल करावयाच्या असल्यास त्या त्यांनी लेखी स्वरुपात 27 जुलै, 2018 पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधीत विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी सादर कराव्यात. असे आवाहन तहसीलदार (निवडणूक) सुरेश थोरात यांनी केले आहे.
     जिल्ह्यातील मतदार संघनिहाय अस्तित्वात असलेली मतदान केंद्र संख्या-3360
     (सुसुत्रीकरणाअंती प्रस्तावित मतदान केंद संख्या-3531)
     चोपडा- 302 (318) 16 वाढ, रावेर- 292 (308) 16 वाढ, भुसावळ-265 (307) 42 वाढ, जळगाव शहर-382 (365) 17 कमी, जळगाव ग्रामीण -321 (326) 5 वाढ, अमळनेर - 300 (317) 17 वाढ, एरंडोल- 261 (290) 29 वाढ,चाळीसगाव-327 (339) 12 वाढ, पाचोरा-307 (322) 15 वाढ, जामनेर-299 (321) 22 वाढ, मुक्ताईनगर - 304 (318) 14 वाढ,
                                                                      ०००

No comments:

Post a Comment