Tuesday, 31 December 2019

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन


जळगाव, दि. 31 - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 3 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. ईश्वर कातकाडे हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यशाळेस माध्यम प्रतिनिधी, नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
000

अन्न व्यावसायिकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासन प्रशासनाचे आवाहन


जळगाव, दि. 31 - अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांनी परवाना / नोंदणी केली नसेल, त्यांनी foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करावी. असे आवाहन यो. को. बेडकुळे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन, जळगाव या विभागामार्फत 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर, 2019 अखेर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत 17 दुधाचे, 19 खाद्यतेलाचे, 14 मिठाई/खवा, 4 फळांचे व इतर अन्नपदार्थांचे 49 असे एकूण 103 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 7 अन्न नमुने कमी दर्जाचे तर 76 नमुने प्रमाणित /चांगल्या प्रतीचे असल्याचे अन्न विश्लेषक प्रयोग शाळेमार्फत घोषित केलेले आहे.
 अन्न प्रदार्थाचे विश्लेषणात कमी दर्जाचे आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत 9 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून 78 लाखांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनामार्फत 23 प्रकरणी विविध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याचेही श्री. बेंडकुळे यांनी कळविले आहे.
अद्यापही ज्या अन्न व्यावसायिक धारकांनी अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ विभागाच्या foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करुन घ्यावी व पुढील कारवाई टाळावी. असे आवाहनही श्री. बेंडकुळे यांनी केले आहे.
000

ना. गुलाबराव पाटील आज जिल्हा दौऱ्यावर


जळगाव, दि. 31 - राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील हे बुधवार, दिनांक 1 जानेवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे..
बुधवार, दिनांक 1 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 6.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 12859 डाऊन गितांजली एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृह (अजिंठा) कडे प्रयाण. सोयीनुसार शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण, राखीव व मुक्काम.
000

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव, दि. 31 - जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2020 या वर्षातील पहिला लोकशाही दिन  सोमवार दि. 6 जानेवारी, 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
          जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून आपले तक्रार अर्ज सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित लोकशाही दिनात सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
000

Friday, 27 December 2019

अनुसूचित जमातीच्या 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशसाठी 15 मार्च रोजी स्पर्धा परिक्षेचे आयोजन


जळगाव.दि.27 :- आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य निवासी पब्लिक स्कूल, पेठरोड नाशिक, पिंप्रीसद्योदिन ता.इगतपुरी नंदुरबार, अजमेर सौदाणे, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गांतील अनुशेष भरून काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापूरी ता.जामनेर जि.जळगाव या दोन परिक्षा केंद्रांवर स्पर्धा परिक्षा रविवार 15 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.
अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी 2019-2020 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वीत शिकत असून परिक्षेस प्रविष्ठ झालेले असून पुढील वर्षी इयत्ता 6 वी मध्ये आणि याच क्रमाने इयत्ता 7 वी ते 9 वी मध्ये प्रवेश घेणार असतील अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल याच्याकडे 25 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल या कार्यालयाच्या 02585-261432,262035 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीयेस 1 जानेवारी पासून सुरूवात


            जळगाव, दि. 27 - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 2 रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
            इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी  संबंधित विद्यार्थ्याला त्याचे  किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर, 2020 रोजी 6 वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा जन्म  1 ऑक्टोंबर, 2013 ते 30 सप्टेंबर, 2014 दरम्यानचा असावा. तर इयत्ता 2 रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने 2019-2020 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा.
            या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत 1 ली व 2 री च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्डची साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज         1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 2020 या दरम्यान वाटप केले जाणार आहे. पालकांनी परीपूर्ण भरलेला अर्ज 5 मार्च, 2020 पूर्वी सादर करावा.
            इयत्ता 1 ली व 2 रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिवकॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता.यावल येथे उपस्थित रहावे.
            अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या 02585-261432/262035 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000