Monday, 20 November 2017

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा



           जळगाव, दि. 20 - क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व्दारा जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक कार्यकर्ता आणि गुणवंत खेळाडू या नावाने जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार सन 2017 साठी 4 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुंनदा पाटील यांनी दिली.
            प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराकरीता 30 जून, 2017 पर्यंतचीच कामगिरी ग्राहय धरली जाणार आहे. सन 2017-18 या वर्षापासून या कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
      जिल्हा व राज्य युवा पुरस्काराकरीता कार्यालयातून अर्ज घेवून जाण्याचा दिनांक 27 ऑक्टोबर 2017 असा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 4 डिसेंबर 2017 असून अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा दिनांक 8 डिसेंबर 2017 असा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीसाठी संजय महिरे, मो. नं.-8552858001, अमित मनोरे, मो. न. - 9175330285, सौ. रेखा पाटील, मो. न. 9421693471 यांचेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Jalgaonsports.in  या वेबसाईटसाठी संपर्क साधावा.
पुरस्काराचे निकष -
गुणवंत खेळाडू :- या पुरस्काराअंतर्गत तीन पुरस्कारचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व दिव्यांग खेळाडू यांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. संबंधित जिल्हयामध्ये खेळाडूने लगतपूर्व ५ वर्षापैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या लगतपूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान) मधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ठ ठरणा-या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. खेळाडूने त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत सादर करावा. खेळाडूने स्पर्धांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत सादर करणे आवश्यक राहील. खेळाडूचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारस करुन सादर करणे आवश्यक राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तीकरित्या अर्ज करु शकतील. पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असले पाहिजे.
क्रीडा मार्गदर्शक :- पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्हयात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व त्याने वयाची ३० वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राहय धरली जाईल. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
गुणवंत संघटक :- पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. क्रीडा संघटक, कार्यकर्त्यांनी सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले पाहिजे व त्याने वयाची ३० वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राहय धरली जाईल. विहीत नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती व इतर माहितीसाठी इच्छूकांनी व्यक्तिश: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए-विंग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी शासन निर्णय क्र. राक्रीधो २०१२/प्र.क्र.१५८/१२/क्रीयुसे-३ दि. १६ ऑक्टोबर, २०१७ चे अवलोकन करावे. तसेच दिलेल्या मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने Jalgaonsports.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज भरुन संबंधीत संपुर्ण कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर सर्व कागदपत्रांसह अर्जाची हार्डप्रत जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
                                                     ०००००

No comments:

Post a Comment