Thursday, 3 February 2022

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीयेस 3 फेब्रुवारी, पासून सुरूवात

       जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) :-  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्त 1 ली व 2 रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी  संबंधित विद्यार्थ्याला त्याचे  किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न  1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता 1 ली साठी प्रवेश  घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2022 रोजी 6 वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा  जन्म  1 ऑक्टोंबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 दरम्यानचा असावा. तर इयत्ता 2 रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने 2021-2022 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा. तरी या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत 1 ली च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज 3 फेब्रुवारी 2022 ते 11 मार्च, 2022 या दरम्यान वाटप केले जाणार असून परीपूर्ण भरलेला अर्ज   15 मार्च 2022 पूर्वी सादर करावा.

इयत्ता 1 ली व 2 रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव, तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 22 मार्च 2022 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा शिव कॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 23 मार्च 2022 रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा ता.यावल येथे उपस्थित रहावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment